आयांनो, तुमची सी-सेक्शन शस्त्रक्रिया झाल्यावर ह्या लक्षणांबाबत सावध राहा! (त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका)

बाळाच्या डिलिव्हरीनंतर पूर्ववत होणं ही कुठल्याही स्त्रीसाठी खूप सोपी गोष्ट नसते. ती एक खूप वेळखाऊ प्रक्रिया असते आणि जर तुमचं सी-सेक्शन झालं असेल तर मग ती प्रक्रिया आणखीनच कठीण होऊन बसते. तुम्ही नुसतंच बाळंतपण आणि डिलिव्हरीतून बाहेर येत नसता, तर तुमचं शरीर सुद्धा एका मोठ्या शस्त्रक्रियेनंतर हळूहळू पूर्ववत होत असतं. त्यामुळे तुमचं शरीर हळूहळू पूर्ववत होत असतानाच, इन्फेक्शनची लक्षणं माहीत असणं खूपच महत्त्वाचं आहे. 

तुम्ही जरी सर्वसाधारण लक्षणांच्या बाबतीत माहिती मिळवली असली, तरी पुढील ६ सूक्ष्म लक्षणं अशी आहेत जी तुम्हाला माहीत नसतं की, सी-सेक्शन इन्फेक्शनची लक्षणं आहेत. 

१. ताप 

अपुरी झोप, थकवा किंवा नुकत्याच झालेल्या शस्त्रक्रियेमुळे अस्वस्थ वाटणं यांसारख्या बऱ्याच वेगवेगळ्या कारणांमुळे ताप येऊ शकतो. परंतु, जर तुमचा ताप १०४ डिग्रीच्या वर गेला तर त्याकडे कदापि दुर्लक्ष करू नका. संशोधनाअंती असं आढळून आलं आहे की, सी-सेक्शन शस्त्रक्रिया झाल्यावर सतत येणारा ताप हा इन्फेक्शनचं लक्षण असू शकतो. 

२. दुर्गंधी 

तुमच्या पोटावर जिथे चीर दिली गेली होतो तिथून अस्वाभाविक आणि असह्य अशी दुर्गंधी येत असेल तर डॉक्टरकडे जा. 

३. फ्लू 

एक खूप मोठी शस्त्रक्रिया झाल्यावर अस्वस्थ वाटणं अत्यंत स्वाभाविक आहे. पण जर तुम्हाला सर्दी, खोकला झाला आणि होणाऱ्या वेदना या 'फ्लू' च्या लक्षणांशी जुळू लागल्या तर कदाचित तुम्हाला इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. थंडी वाजणं, थकवा, अंगदुखी आणि डोकेदुखी ही सर्व त्या पोटावरच्या चिरेत इन्फेक्शन झाल्याची लक्षणं आहेत. 

४. पोटावरच्या चिरेच्या ठिकाणी स्पर्श केल्यास गरम लागतं!

जर तुमच्या पोटावरच्या चिरेच्या ठिकाणी स्पर्श केल्यावर तो भाग हाताला गरम लागत असेल तर नक्कीच काहीतरी अयोग्य असं झालंय. लालसरपणा, दुखरेपणा किंवा स्पर्शाला ती जागा सतत गरम लागणं याचा अर्थ असा होतो की डॉक्टरला जाऊन हे सर्व दाखवण्याची वेळ आली आहे. 

५. चिरेतून होणाऱ्या स्रावाचा रंग बदलणं 

पोटावर चीर दिलेल्या ठिकाणी थोडाफार स्राव होणं स्वाभाविक आहे पण ह्या स्रावाचं प्रमाण वाढलं आणि वेदना, सूज आणि लालसरपणा होऊ लागला तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. 

६. सूज 

सर्वात शेवटी, पोटावर चीर दिलेल्या ठिकाणी किंवा पायांवर सूज येणं हे सुद्धा इन्फेक्शनचं लक्षण असू शकतं!

सी-सेक्शन झालेल्या स्त्रियांपैकी १० ते ३०% स्त्रियांना गर्भाशयाचं इन्फेक्शन ज्याला 'एंडोमेट्रायटिस' म्हणतात, ते होतं. यामध्ये सहसा पोटात दुखणं, रक्ताळलेला किंवा पिवळसर हिरव्या रंगाचा स्राव व्हजायनामधून होणं, ओटीपोट टणक होणं किंवा ताप, ह्या गोष्टी दिसून येतात. लघवी करताना सातत्याने जळजळ होणं किंवा पाठदुखी ही सुद्धा इन्फेक्शनची लक्षणं आहेत. 

सी-सेक्शन नंतर इन्फेक्शन होणं हे सर्वसाधारण असलं तरी तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. पोटावरच्या चिरेचा भाग स्वच्छ ठेवणं आणि आपल्या आरोग्याची काळजी घेणं या दोन गोष्टींद्वारे तुम्ही इन्फेक्शनचा प्रतिबंध करू शकता. 

फीचर इमेज स्रोत: bundoo.com 

Translated by Anyokti Wadekar

loader