सी-सेक्शन डिलिव्हरी टाळण्यासाठी स्त्रिया ह्या पाच आश्चर्यकारक गोष्टी करतात!

तर तुमची प्रसूतीची तारीख भरभर जवळ येतेय आणि तुम्हाला शांत आणि संयत राहाणं कठीण जातंय? आम्हाला माहितीय ती धाकधूक, उत्सुकता आणि भीती जी अशा वेळी वाटते! सी-सेक्शन डिलिव्हरीच्या संख्येत भयंकर वाढ झालेली असल्याने, प्रत्येक होणाऱ्या आईला नैसर्गिक पद्धतीने जन्म देण्याबद्दल नक्कीच खूप ताण येत असणार. सी-सेक्शन हे कोणत्याही प्रकारे धोकादायक नसलं, तरी कुठल्याही स्त्रीला १० तासांच्या प्रसववेदनेनंतर स्ट्रेचर वर ओढून नेलं जाऊन, तिचं पोट कापून उघडलं गेलेलं आवडणार नाही.

म्हणून जर तुम्ही नॉर्मल डिलिव्हरी साठी मनोमन प्रार्थना करत असाल, तर एकदा का प्रसववेदना सुरु झाल्या, की ह्या गोष्टी लक्षात ठेवा!

१. तुमच्या प्रसववेदना आपोआप सुरु होऊ द्या

तुमचा नवरा कामानिमित्त प्रवास करणार असला किंवा तुमचे डॉक्टर सुट्टीवर जाणार असले, तरी कृत्रिमरीत्या प्रसववेदना चालू करून कधीच घेऊ नका. त्या क्षणी ते ते कारण वास्तविक वाटलं तरी नंतर तुम्हाला त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते.

पहिल्यांदा आई बनणाऱ्या स्त्रियांवर केलेलं संशोधन असं दाखवतं की ज्या स्त्रियांमध्ये कृत्रिमरीत्या प्रसववेदना चालू केल्या जातात त्यांच्यापैकी ४४ टक्के स्त्रियांचं सी-सेक्शन करावं लागतं पण ज्या स्त्रियांच्या प्रसववेदना आपोआप सुरु होतात त्यांच्यापैकी केवळ ८ टक्के स्त्रियांचं सी-सेक्शन होतं. तसंच, बऱ्याचदा गर्भाशयग्रीवा (सर्व्हिक्स) तयार असण्याच्या खूप आधीच स्त्रीच्या प्रसववेदना कृत्रिमरीत्या सुरू करणं निरुपयोगी ठरतं, आणि मग त्यामुळे सी-सेक्शन करण्याची गरज उद्भवते.

२. तुमची गर्भाशयग्रीवा (सर्व्हिक्स) अंदाजे ३ सेंमी पर्यंत रुंदावेपर्यंत, प्रसववेदनेच्या दरम्यान घरीच राहा

हे मान्य करायलाच हवं! प्रसूतीसाठी का असेना, कुणालाही हॉस्पिटलमध्ये राहाणं आवडत नाही. भारंभार डॉक्टर आणि विचित्र सामग्री आणि भयावह सुया घेऊन इकडून तिकडे पळणाऱ्या नर्सना पाहूनच तुमचं मनोधैर्य ढळू लागतं, तुमच्या प्रसववेदना मंदावतात आणि त्यामुळे तुमचं सी-सेक्शन करावं लागतं.

म्हणून, तुमची गर्भाशयग्रीवा (सर्व्हिक्स) ३ सेंमी पर्यंत रुंदावेपर्यंत घरच्या आरामदायक वातावरणातच राहाणं नक्कीच जास्त चांगलं ठरेल. असं असलं तरी, तुम्हाला जर असं वाटलं की हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज आहे, तर निःशंकपणे तसं करा.

३. खूप लवकर एपिड्युरल अॅनस्थिशिया घेऊ नका

एकदा का आकुंचनं अनुभवायला सुरुवात झाली, की प्रत्येक स्त्रीचं लक्ष ह्याकडे असतं की तिला केव्हा एपिड्युरल अॅनस्थिशिया दिला जातोय. पण जरा थांबा! खूप आधीच एपिड्युरल घेतल्यामुळे प्रसववेदना मंदावू शकतात किंवा कधीकधी थांबूही शकतात. त्यामुळे मग तुमच्या बाळाच्या हृदयाच्या ठोक्यांचा वेग मंदावतो आणि इमर्जन्सी सी-सेक्शन करावं लागतं. एपिड्युरल घेण्यासाठी जेवढा जास्त वेळ तुम्ही थांबाल, तेवढी तुमचं सी-सेक्शन करावं लागण्याची शक्यता कमी होईल.

४. असा डॉक्टर निवडा जो कमीत कमी सी-सेक्शन्स करण्यासाठी जाणला जातो

तुम्हाला हे आवडो अथवा न आवडो, काही डॉक्टर सी-सेक्शन डिलिव्हरीसाठी ओळखले जातात. हाताच्या बोटांवर मोजण्याइतके खूप थोडे डॉक्टर असे असतात जे तुमच्या प्रसववेदना सुरू होईपर्यंत किंवा 'पाणी' जाईपर्यंत थांबतात. म्हणून, तुमच्या डॉक्टरशी त्यांच्या सी-सेक्शन करण्याच्या प्रमाणाबाबत चर्चा करायला कचरू नका. तुम्ही ह्याबाबतीत ऑनलाईन रिसर्च करू शकता किंवा पूर्णपणे खात्री करून घेण्यासाठी अशा लोकांशी बोला ज्यांनी त्या डॉक्टरच्या सेवेचा अनुभव घेतलाय.

५. तुमच्या डॉक्टरशी बोला

सर्वात शेवटी पण सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या सर्व गरजा आणि इच्छांबद्दल तुमच्या गायनॅकोलाॅजिस्टला सांगताय ह्याची खात्री करून घ्या. तुम्हाला जर नॉर्मल डिलिव्हरी हवी असेल तर तुमच्या डॉक्टरला तसं सांगा आणि त्यासाठी काय करावं लागेल ह्याबद्दलच्या टिप्स देखील विचारून घ्या. असं करणं ह्यासाठी महत्वाचं आहे की बऱ्याचदा, तुम्हाला जे हवं असतं त्याच्या अगदी उलट असं डॉक्टर करू शकतात. म्हणून, ह्या सर्व गोष्टींची आगाऊ चर्चा केलेली नेहमीच बरी.

Translated by Anyokti Wadekar

loader