सी-सेक्शन झालेल्या आयांबद्दलची ३ सत्यं जी उघडपणे सांगितली जायला हवी

आपण सी-सेक्शन डिलिव्हरीजना एक सोपा पर्याय असं संबोधणं खरंच थांबवलं पाहिजे. ती एक शस्त्रक्रिया सुद्धा आहे.

निकोल मोने

सी-सेक्शन झालेल्या सर्व आयांसाठी...

बाळांच्या जन्मांची फोटोग्राफर म्हणून एका कुटुंबाचे अत्यंत महत्वाचे असे क्षण कॅमेऱ्यात कैद करण्याची विनंती मला केली जाते. बाळाचा जन्म जिथे होणार असतो तिथे मी जाते आणि तिथे उलगडणारे लहानमोठे क्षण कॅमेऱ्याने टिपते. मी त्यांच्या मुलाच्या किंवा मुलीच्या ह्या जगातल्या प्रवेशाची गोष्ट फोटोद्वारे सांगते. ती धडपड, भीती, वेदना आणि आनंद.

ह्या गोष्टी खूप सुंदर आहेत.

पण बाळांच्या जन्माच्या या जगात, मला असं दिसतं की एका विशिष्ट प्रकारचा जन्म हा आदर्श मानला जातो आणि माझ्या कामामध्ये मी असे अनेक जन्म कॅमेऱ्यात कैद केले आहेत. “मुलाच्या जन्माची पहिल्या क्रमांकाची (काल्पनिक) ट्रॉफी” ही नेहमी नैसर्गिक अशा 'व्हजायनल बर्थ' ला दिली जाते जिथे बाळाचे आईवडील सक्रिय असतात आणि डॉक्टर्स किंवा नर्सेस त्यात कसलीही आडकाठी आणत नाहीत.

कालच रात्री मी बाळाच्या जन्माची एक आश्चर्यकारक कहाणी वाचली ज्यामध्ये बाळाच्या आईने नकळत बाळाला घरीच बाथ टब मध्ये जन्म दिला. तिच्या पतीने बाळाला उचलून धरलं कारण त्यावेळी घरी इतर कुणीच नव्हतं. ते बाळाला घेऊन घरी सोफ्यावर बसले आणि नवजात बाळाचं कौतुक करण्यात रमले. बाळाच्या जन्माची ती एक भन्नाट कहाणी होती...आणि मला नक्की माहितीय ती पुन्हापुन्हा सांगितली जाईल.

फेब्रुवारी मध्ये मी फोटोग्राफी केलेल्या एका पायाळू बाळाच्या आश्चर्यकारक जन्माबद्दल तुमच्यापैकी काही जणांनी वाचलं असेल. त्या आईच्या इमर्जन्सी सी-सेक्शनची तयारी चालू असताना तिला बाळ बाहेर येत असल्याचा एवढा तीव्र आवेग जाणवला की ऑपरेटिंग टेबलवर पाय प्रथम अशा अवस्थेत तिची मुलगी जन्माला आली. ही बाळाच्या जन्माची आणखी एक आश्चर्यकारक कहाणी आहे ज्यामुळे असंख्य स्त्रिया त्यांच्या बाळाच्या उत्तम अशा जन्मासाठी प्रेरित झाल्या.

पण हल्ली माझ्या मनात वरचेवर त्या स्त्रियांचा विचार येतो ज्यांच्या धाडसी डिलिव्हरीचं कुणी कौतुक करत नाही. बाळाच्या जन्माच्या त्या कहाण्यांचा माझ्या मनात विचार येतो ज्यांना प्रोत्साहन मिळत नाही, ज्यांचा कुणी आनंद मानत नाही आणि ज्या फेसबुकवर शेअरही केल्या जात नाहीत. मी सिझेरियन सेक्शन पद्धतीने झालेल्या बाळांचा विचार करतेय आणि त्या धाडसी स्त्रियांचा विचार करतेय ज्या आपल्या बाळाला इतक्या ताकतीने आणि सुंदररीत्या जन्म देतात.

आणि म्हणून मी तुम्हाला सी-सेक्शन झालेल्या आयांबद्दलची ही ३ सत्यं वाचून त्यांचा तुम्ही पुरस्कार करावा असं सांगते.

१. ज्यांचं सी-सेक्शन होणार असतं त्या स्त्रिया धाडसी असतात

सी-सेक्शन साठी एका स्त्रीला जसं तयार केलं जातं ती म्हणजे काही खूप सोपी गोष्ट नाही. बऱ्याचदा, एपिड्युरल अॅनस्थेशिया दिल्याशिवाय आणि ऑपरेटिंग रूम मधल्या प्रत्येकाने आपापली "जागा घेतल्याशिवाय" त्या स्त्रीच्या पतीला ऑपरेटिंग रूम मध्ये प्रवेश दिला जात नाही. म्हणजे डॉक्टर्स आणि नर्सेस जेव्हा डिलिव्हरीसाठी ऑपरेटिंग रूम तयार करत असतात, इकडून तिकडे फिरत असतात (कदाचित दुपारच्या जेवणाची चर्चा करत किंवा त्यांनी वीकेण्डला कुठली फिल्म पाहिली त्याबद्दल बोलत) तेव्हा एक कणखर अशी गरोदर स्त्री थंड ऑपरेटिंग टेबल वर पुढे काय होणार त्याचा विचार करत पडून असते - ती बऱ्याचदा घाबरलेली असते आणि तिला खूप एकटं वाटत असतं.

आणि अशा क्षणी जिचं सी-सेक्शन होतंय ती स्त्री आपल्या बाळाबद्दल तिला जे अपार, उत्कट प्रेम वाटतं त्या प्रेमभावनेला धरून ठेवते. ती आधी खूप घाबरते, आणि मग हळूहळू तिची भीती सरते. तिला माहीत असतं की ह्या क्षणी, सी-सेक्शन हेच तिच्या बाळासाठी सर्वात उत्तम ठरणार असतं, जरी ह्या "सर्वात उत्तम" चा अर्थ खऱ्याखुऱ्या जखमा आणि व्रण मागे सोडणारी एक मोठी शस्त्रक्रिया असा असला तरीही. जरी ह्या "सर्वात उत्तम" चा अर्थ तिने गेले नऊ महिने बाळाच्या जन्माचं जे स्वप्न किंवा जी प्रतिमा उरी बाळगली होती ती विसरणं, असा असला तरीही.

तुमचं जरी सी-सेक्शन झालं नसलं तरी मी तुम्हाला असं सांगेन ह्या क्षणांचं जे उघड सत्य आहे ते तुमच्या मनात निचरू द्या - तुम्ही स्वतःला तिच्या जागी ठेवून पाहा. घाबरत, वाट पाहत त्या टेबलावर पहुडलेली. तुम्ही जेव्हा स्वतःला तिच्या जागी ठेवून पाहाल तेव्हा तुम्हाला लगेच कळेल की ज्यांचं सी-सेक्शन होणार असतं त्या स्त्रिया किती हिमती असतात.

२. ज्यांचं सी-सेक्शन होणार असतं त्या स्त्रिया कणखर असतात

अशा खूप कमी आया असतील ज्या असं म्हणतील की त्यांनी जेव्हा बाळाला जन्म देण्याची कल्पना केली तेव्हा त्यांच्या डोळ्यांसमोर सी-सेक्शन आलं. आदर्श परिस्थितीमध्ये सी-सेक्शन ही एक वैद्यकीय गरज असते; आणि वाईटात वाईट केसेस मध्ये डॉक्टरच्या कालबाह्य प्रॅक्टिसेसमुळे ते करावं लागतं किंवा ते डॉक्टरांना सोयीचं पडतं म्हणून ते करतात.

ज्यांचं सी-सेक्शन होणार असतं अशा काही स्त्रियांना त्यांच्या प्लॅनमध्ये जो बदल होतो त्याची मानसिक तयारी करण्यासाठी काही आठवडे मिळतात, पण बऱ्याच स्त्रियांना त्यासाठी फक्त काही दिवस, तास किंवा मिनिटं मिळतात. अशा स्त्रीने तिच्या बाळाला प्रथम पाहतानाची जी प्रतिमा मनात उभी केलेली असते ती अचानक बदलते. तिच्या बाळाच्या जन्माबददलचे तिने जे काही प्लॅन्स बनवलेले असतात ते सारे फसतात. तिच्यापुढे एक शस्त्रक्रिया उभी ठाकते. तिला माहीत नसतं की बाळाच्या जन्मानंतर बाळाला कवेत घ्यायला तिला किती वेळ वाट पाहावी लागेल.

अचानकपणे काही बदल घडून आला की आपण माणसं त्या बदलाशी जुळवून घेऊ शकत नाही. पण ज्यांचं सी-सेक्शन होणार असतं त्या स्त्रिया त्यांचा अहंभाव सोडून त्यांच्या अंतःस्थ शक्तीशी संवाद साधत ऑपरेटिंग रूम मध्ये प्रवेश करतात आणि बाळाला जन्म देतात.

आणि मग प्रत्यक्ष शस्त्रक्रिया होते. खरोखरचं पोट कापलं जाणं आणि टाके घातलं जाणं. शरीर पूर्ववत व्हायला बऱ्याचदा काही महिने लागतात. एका खूप मोठ्या शस्त्रक्रियेनंतर आपल्यापैकी बऱ्याच जणांना आईस्क्रीम खात आणि भरपूर फिल्म्स बघत पडून राहायला आवडेल, पण सी-सेक्शन झालेल्या आया त्याच्या अगदी उलट असं काही करतात. ज्यांना त्यांची गरज असते अशा त्यांच्या गोंडस बाळाची काळजी घेण्यात, त्याला प्रेम देण्यात आणि त्याच्याशी एक नातं निर्माण करण्यात त्या व्यग्र होतात.

भावनिक आणि शारीरिक पातळीवर ह्या स्त्रिया खूपच कणखर असतात. आणि ही कणखरता फक्त डिलिव्हरीच्या दिवशी आवश्यक नसते; तर पुढे कित्येक आठवडे, महिने आणि वर्षं त्याची गरज लागते. त्यांचं शरीर आणि आत्मा पूर्वपदावर येताना आणि त्यांच्या लहानग्याला कवेत घेऊन नवीन स्वप्नं पाहताना.

३. सी-सेक्शन झालेल्या आया सुंदर असतात

आई बनण्याची प्रक्रिया आपल्यावर व्रण सोडून जाते. त्यातले काही व्रण भावनिक असतात; तर काही शारीरिक. सी-सेक्शन झालेल्या आयांना बऱ्याचदा ह्या दोन्ही प्रकारचे व्रण मिळतात. आणि तरीही आपल्या बाळाला ह्या जगात आणताना त्यांनी जो कणखरपणा आणि जे धाडस दाखवलं त्याची जबरदस्त आठवण हे व्रण करून देतात.

एका जगातून दुसऱ्या जगात येताना त्यांच्या बाळांनी ज्या दारातून प्रवेश केला ते दार म्हणजे हे व्रण.

प्रत्येक व्रण किती वेगळा असतो हे पाहून मी अचंबित होते - प्रत्येकाचं टेक्श्चर, लांबी आणि जागा वेगळी. प्रत्येक व्रण जसा एकमेवाद्वितीय असतो, तशीच सी-सेक्शनने झालेल्या जन्माची हरेक कहाणीही एकमेवाद्वितीय असते. हे व्रण काळाबरोबर कसे बदलतात, कसे फिके होतात, कसे वाढतात, कसे भरून येतात हे पाहून मी भारावून जाते. हे व्रण सुंदर असतात आणि आपण ते आनंदाने शरीरावर वागवले पाहिजेत.

सी-सेक्शन झालेल्या आयांना लाजेने झाकून ठेवण्याऐवजी आपण त्यांना त्यांच्या कणखरतेचं आणि धाडसाचं प्रतीक असलेले हे व्रण जगाला दाखवून द्यायला प्रोत्साहित केलं पाहिजे.   

स्रोत: युअरटॅंगो डॉट कॉम

Translated by Anyokti Wadekar

loader