तुमचं पहिलं मूल येण्याआधी तुम्ही ह्या ३ गोष्टींसाठी तयार असलं पाहिजे

ज्या दिवशी तुम्ही तुमच्या गरोदरपणाची न्यूज जाहीर करता त्या दिवसापासून सगळे, मग ती अंधश्रद्धाळू म्हातारी माणसं असोत किंवा विज्ञाननिष्ठ माणसं, सगळे तुम्हाला एकच गोष्ट सांगतात ती म्हणजे ही की, आता तुमचं आयुष्य खूप मोठ्या प्रमाणावर बदलणार आहे (एक छोटंसं गुपित: तुमचं आयुष्य खूप काही बदलत नाही - ते बदलतं खरं, पण बहुतकरून ते आधीसारखंच राहतं, तुम्हाला जर तेच हवं असेल तर).

खासकरून एका स्त्री साठी होणारे बदल हे आजूबाजूच्या वातावरणातच नसतात तर तिच्या शरीरात आणि मनात देखील होत असतात. हे बदल अर्थातच खूप मोठे असतात आणि आपल्या परंपरागत रीतीरिवाजांद्वारे त्याची काळजी घेतली जाते. कशाची काळजी घेतली जात नसेल तर त्या आहेत अशा काही गोष्टी ज्याबद्दल कुणाला बोलणंही आवडत नाही. खरंतर अशा तीन गोष्टी आहेत ज्याबद्दल कुणीही बोलत नाही आणि ह्या लेखात तुम्ही त्याच गोष्टींबद्दल वाचणार आहात.

१. घरातली जागा:

माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा की तुमचं घर कसंही असलं आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत उपलब्ध असली तरी तुमचं घर हे पूर्वीसारखं राहणार नाही. जर तुम्ही माझ्यासारख्या असाल तर तुम्हाला तुमचं घर एका ठरावीक पद्धतीतच ठेवलेलं हवं असतं. टेबलावर काही सटरफटर गोष्टी नसल्या पाहिजेत, सोफा हा ४५ अंश कोनातच असला पाहिजे, भिंतीपासून दुसऱ्या लादीच्या पुढे कार्पेट गेलं नाही पाहिजे...तुमच्या लक्षात आलंच असेल. पण एकदा का बाळाचं आगमन झालं की तुम्हाला तुमच्या घराची काळजी घ्यायला आणि घर हवं तसं ठेवायला वेळच मिळणार नाही.

तुमच्या बाळाची वेगळी खोली असली तरी तुमच्या बेडरूममध्ये सर्वत्र बाळाच्या वस्तू येणार आहेत. जर तुम्ही स्वतः स्वयंपाक करत नसलात तर तुमचं किचन ही एक अशी जागा आहे जी जशीच्या तशी राहील. जर तुम्ही स्वयंपाक स्वतःच बनवत असाल तर स्वतःवरच्या अपेक्षांचं ओझं थोडं कमी करून किचन तेव्हाच साफ करा जेव्हा तुम्हाला वेळ असेल. सूर्यप्रकाशाची गरज असलेल्या आणि वाळत घालायच्या अशा बाळाच्या वस्तूंनी तुमची बाल्कनीही भरून जाईल. एकदा का तुम्ही बाळाबरोबर बिझी झालात की शक्य आहे की तुम्ही ड्रॉईंग रूम मध्ये फारसं जाणार नाही.

पूर्ण घराला एक वेगळाच वास येऊ लागेल, तुमच्या शरीरालाही एक वेगळाच वास येऊ लागेल. घराचं तापमान आणि उजेडाची प्रखरता ही बाळाच्या सोयीनुसार ठेवली जाईल. तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींची सवय करून घ्यावी लागेल आणि होणाऱ्या बदलांच्या बाबतीत मोकळा दृष्टिकोन ठेवणं ही एक चांगली गोष्ट आहे. त्यामुळे जेव्हा ते बदल होतील तेव्हा ते तुम्ही जास्त चांगल्या प्रकारे स्वीकाराल.

२. अर्थकारण:

ही एक खूप मोठी गोष्ट आहे. बाळ झाल्यावर हॉस्पिटलचा जो काही खर्च येईल त्याव्यतिरिक्त, होणारे पालक किंवा त्यांची फॅमिली पैशाच्या बाबतीत काही बोलत नाहीत. मला त्या सर्वांना हलवून जागं करायचंय आणि म्हणायचंय की, ऐका अहो आदर्शवादी तरुणांनो, तुम्हाला यापुढे खूप पैसा खर्च करावा लागणार आहे, म्हणून बाळ येण्याआधीच तुमचे निर्णय घ्या. आणि पैशाच्या बाबतीतही आधीच प्लॅनिंग करा.

उदाहरणार्थ, सहा महिन्यांनंतर तुम्हाला बाळाच्या अन्नावर खूपच जास्त खर्च करावा लागेल. तेव्हा फक्त पॅकेज्ड बेबी फूड वापरायचं की फक्त घरी बनवलेलं बेबी फूड वापरायचं की सोयीसाठी दोन्हीचं मिश्रण वापरायचं हे ठरवा. ह्या गोष्टीचं आधीच प्लॅनिंग केल्यामुळे बाळाची सवय होण्याबरोबरच तुम्हाला तुमचं बजेट सांभाळणंही सोपं जाईल.

पहिल्या काही महिन्यात तुमचा सर्वात जास्त खर्च डॉक्टरकडे जाण्यावर आणि/ किंवा लॉंड्री आणि डायपर्स वर होईल. तुम्ही जर फक्त कापडी लंगोट वापरणार असाल, तर तुमचा वॉशिंग मशीनचा वापर वाढेल आणि त्याबरोबरच इलेक्ट्रिसिटी आणि बाळाच्या कपड्यांसाठी स्पेशल डिटर्जंटचा वापर देखील वाढेल.

तुम्ही जर तुमच्या बाळासाठी रात्रीच्या वेळी डिस्पोजेबल डायपर्स वापरायचं ठरवलंत तर तुमचा खर्च थोडा कमी होईल, आणि बरेचसे पालक आता तसं करतही आहेत. माझ्या मते ही चांगली कल्पना आहे, कारण दिवसा तुम्ही सहजगत्या बाळाचे खराब झालेले लंगोट बदलू शकता, पण रात्री एकदम लहान असं डायपर बाळासाठी आदर्श ठरेल. मी असंसुद्धा सुचवेन की पहिल्या चार आठवड्यांसाठीचे डायपर्स तुम्ही एकत्रच खरेदी करून ठेवा.

भारतीय पालक (दर दिवसाला सरासरी तीन डायपर्स प्रमाणे) प्रत्येक महिन्याला रु. ९०० ते रु. १४०० पर्यंत बाळाच्या डायपर्स वर खर्च करतात, आणि पुढे फक्त डिस्पोजेबल डायपर्स वापरू लागल्यावर हा खर्च अजून वाढतो. हॉस्पिटलमध्ये असतानाच पहिल्या आठवड्यासाठी एखादा ट्रायल पॅक खरेदी करून बघा जेणेकरून कोणता ब्रँड तुमच्यासाठी चांगला आहे याचा तुम्हाला अंदाज येईल. आणि एक प्रामाणिक सल्ला देऊ? खूपच स्वस्तातली डायपर्स घेऊ नका.

एक चांगलं डायपर हे आई आणि बाळ दोघांसाठीही वरदान असतं. आणि तुम्ही कमीत कमी दोन वर्षासाठी तरी डिस्पोजेबल डायपर्स चा वापर करणार असल्यामुळे एकच ब्रँड वापरणं ठीक राहील आणि दर महिन्याला तुमच्या बजेटचा बराचसा भाग त्यासाठी काढून ठेवा. खरोखर, जेव्हा पैशाच्या व्यवहाराची नीट काळजी घेतली जाते तेव्हा नव्याने झालेल्या पालकांमध्ये सगळं काही आलबेल आणि सोपं होऊन जातं.

३. लक्ष केंद्रित करण्याची क्षमता आणि एकाग्रता:  

हे तुम्हाला कुणीही सांगत नाही पण होणाऱ्या आई - आणि वडिलांना - माहीत असायला हवी अशी ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. तुमच्या लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेची आणि एकाग्रतेची पातळी, फक्त काही आठवड्यांसाठी नव्हे तर जवळजवळ दोन वर्षांसाठी, खूप कमी होणार आहे. तुमच्या मनात सतत बाळाचे आणि ज्या गोष्टी उरकायच्या आहेत त्याचे विचार असणार आहेत. म्हणून मग तुम्ही एखादं चांगलं पुस्तक आरामात बसून वाचू शकत नसाल, किंवा टीव्ही वर एखादा कार्यक्रम बघत असताना तुमचं लक्ष भरकटत असेल, तर तुमचं काहीतरी चुकतंय असं समजून काळजी करायला लागू नका!

मला नेहमीच असं वाटतं की माझ्या पहिल्या मुलाच्या वेळी जर मला कुणी हे सांगितलं असतं, तर मी स्वतःच्या बाबतीत इतकी कठोर राहिले नसते; मी स्वतःला या सर्व गोंधळात हरवून जाण्याची थोडी मुभा दिली असती आणि मग हळूहळू गोष्टींकडे लक्ष केंद्रित करण्याकडे वळले असते. मी तुम्हाला हेही सांगितलं पाहिजे की एक बेबी बुक बाळगणं ही चांगली कल्पना आहे. कारण तुम्हाला असं वाटतं की सारे अनमोल क्षण तुमच्या कायमचे लक्षात राहतील, पण अचानक तुमचं मूल सहा वर्षांचं होतं आणि ते पाच महिन्यांचं असताना कसं होतं ते तुम्हाला आठवत नाही कारण तेव्हा तुमच्या मेंदूवर गरोदरपणाचा प्रभाव होता!

एखादं बेबी बुक किंवा जर्नल ठेवा किंवा तुमच्या बाळाच्या आवडलेल्या सगळ्या गोष्टींची तुमच्या फोनमध्ये नोंद करून ठेवा. ह्यामुळे तुमची लक्ष केंद्रित करण्याची क्षमता आणि एकाग्रताही पुन्हा मार्गावर येईल.

मी काही सुचवू का? तुमचं घर एका आदर्श घरापासून अनादर्श घरात बदलण्याआधीच स्वतःला माफ करून टाका. पैशाचा बारीक तपशीलवार हिशोब ठेवा. तुम्हाला लक्ष केंद्रित करायला जमत नसेल तर त्याबद्दल फारशी चिंता करू नका, पण बाळाच्या येण्यानंतर एकदा का नित्यक्रमावर ताबा मिळवलात की मग लक्ष केंद्रित करा. या सगळ्यासाठी तुम्हाला शुभेच्छा!

Translated by Anyokti Wadekar

loader