प्रसववेदनेदरम्यान एपिड्युरल घेतल्याने होणारे ११ भयानक साईड इफेक्ट्स

आराम. वेदनांपासून मुक्ती. औषधी द्रव्याने मिळालेला परमानंद. जेव्हा एपिड्युरलची बात येते तेव्हा कोणतंही वरदान छुपं नसतं, फक्त उघड आणि ठळकपणे दिसणारी वरदानं असतात. हे वाचून थोड्या वेळासाठी असं वाटलं की नाही, की भगवंताने अव्वेला, एका सर्पाला तिला फूस लावू दिल्याबद्दल जो शाप दिला होता तो निष्फळ ठरला की काय. हाय! पण भगवंताला फसवणं एवढं सोपं नाही. एपिड्युरल्स म्हणजे आपल्याला हवा होता तसा वेदनामुक्तीचा मार्ग नाही. तुम्ही जेव्हा डॉक्टरकडे एपिड्युरलसाठी विनवणी करता तेव्हा कोणत्या ११ भयानक साईड इफेक्ट्सचा तुम्हाला अंदाज नसतो, त्याची यादी क्युअरजॉय मधल्या एका लेखात प्रसिद्ध केली गेली आहे. पण सर्वात आधी, एपिड्युरल म्हणजे काय? 

गरोदरपणात एपिड्युरल:

प्रसववेदनेच्या आणि बाळाच्या जन्माच्या वेळी ज्या वेदना होतात त्यापासून आराम मिळवण्याचा एपिड्युरल हा सर्वांत सर्वसाधारण आणि प्रभावी मार्ग आहे. ही पद्धत सामान्यतः अमेरिकेतल्या हॉस्पिटल्समध्ये आढळून येते. सर्वसामान्यपणे, ह्या प्रक्रियेसाठी एक लोकल अॅनस्थेटिक वापरलं जातं. हे अॅनस्थेटिक एपिड्युरल स्पेसमध्ये, म्हणजे मज्जारज्जूचं रक्षण करणारी जी टणक आवरणं असतात त्यांच्या आजूबाजूला इंजेक्शनने सोडलं जातं जेणेकरून वेदनेचे संकेत ठप्प होतात. 

एपिड्युरलची खरंच गरज असते का?

ह्या प्रश्नाचं प्रमाणभूत असं काही उत्तर नाही. प्रत्येक व्यक्तीची वेदना सहन करण्याची क्षमता वेगवेगळी असते. तुमच्या प्रसववेदनेच्या दरम्यान कधीही तुम्हाला जर असं वाटलं की तुम्ही जी आकुंचनं अनुभवताय ती असह्य होऊ लागलीयत तर तुम्ही एपिड्युरल तंत्राचा पर्याय निवडू शकता. 

प्रसववेदनेदरम्यान एपिड्युरल - ते कसं काम करतं?

एपिड्युरल प्रक्रिया एका लोकल अॅनस्थेटिक प्रमाणेच काम करते - तुमच्या गर्भाशय-ग्रीवा आणि गर्भाशयाकडून मेंदूकडे वेदनांचे संकेत पोहोचवणाऱ्या मज्जातंतूंना तात्पुरतं ठप्प करण्याचं काम एपिड्युरल करतं. तुम्हाला पाठीच्या खालच्या भागात इंजेक्शन दिलं जातं ज्यामुळे तुमच्या शरीराच्या खालच्या भागाच्या सर्व संवेदना बधिर होतात. हे द्रव्य तुमच्या शरीरात जाऊन त्याचा तुमच्या शरीरावर परिणाम दिसायला लागला, तरी तुम्ही मात्र पूर्ण शुद्धीवर असता.  

प्रसववेदनेदरम्यान दिलेल्या एपिड्युरलचे साईड इफेक्ट्स:

एपिड्युरलसचे काही फायदे असले तरी त्याचा प्रसववेदनेवर आणि डिलिव्हरीवर वाईट परिणाम देखील होऊ शकतो. एपिड्युरलचा संबंध खालील गोष्टींशी असतो असं मानलं जातं: 

१. एपिड्युरलमुळे बाळाचं तोंड तुमच्या पोटाच्या बाहेरच्या बाजूच्या दिशेने असण्याची शक्यता ४ पटींनी वाढते आणि त्यामुळे बाळाचा स्वाभाविक व्हजायनल बर्थ होण्याची शक्यता घटते. 

२. तुम्हाला सिथेंटिक ऑक्सिटोसिन द्यावं लागण्याचा धोका तिपटीने वाढतो. 

३. तुमचं सी-सेक्शन करावं लागण्याचा धोका अडीचपट वाढतो. 

४. तुमची व्हजायना आणि गुदद्वार यामधील जागा खूप जास्त फाटण्याचा धोका तिपटीने वाढतो. 

५. तुमच्या प्रसववेदनेचा काळ लांबतो. 

६. एपिड्युरलमुळे डिलिव्हरीमध्ये खूप गुंतागुंत निर्माण होण्याचा धोका वाढतो आणि 'फोरसेप्स' सारखी उपकरणाच्या साह्याने केली जाणारी डिलिव्हरी करण्याची गरज उद्भवू शकते. ह्यामुळे जखमा, इपिजिआॅटमी, व्हजायनाचं फाटणं, बाळाच्या चेहऱ्याला इजा, बाळाच्या कवटीतली हाडं सरकणं आणि त्याच्या टाळूमध्ये रक्त साकळणं हे सगळं होण्याचा धोका वाढतो. 

७. बाळाच्या जन्मानंतर तुमच्या पेल्विक फ्लोर मध्ये समस्या निर्माण होण्याचा धोका वाढू शकतो. 

८. एपिड्युरलनंतर झालेल्या बाळाच्या जन्मानंतर बाळाच्या हृदयाच्या ठोक्यांचा वेग मंदावलेला दिसून येतो. कारण प्रौढांपेक्षा बाळांना त्यांच्या शरीरातून हे द्रव्य पूर्णपणे बाहेर टाकण्यास जास्त वेळ लागतो. 

९. एपिड्युरलमुळे आईला ताप येण्याचा आणि त्याचा बाळावर देखील परिणाम होण्याचा धोका वाढतो. 

१०. ज्या स्त्रियांना एपिड्युरल दिलं जातं, त्या त्यांच्या बाळाबरोबर कमी वेळ व्यतीत करतात असं आढळून आलं आहे. असं म्हटलं जातं की एपिड्युरलचा डोस जेवढा जास्त असेल तेवढाच कमी वेळ आई तिच्या बाळाबरोबर एक नातं निर्माण करण्यासाठी देते. 

११. प्रसववेदनेच्या दरम्यान ज्यांनी एपिड्युरल वापरलं त्या स्त्रिया एपिड्युरल न वापरलेल्या स्त्रियांपेक्षा दुपटीने जास्त स्तनपान थांबवतात. 

तुम्ही जर पहिल्यांदा आई होणार असाल आणि एपिड्युरल घ्यावं की नाही ह्याबाबत गोंधळून गेल्या असाल तर तुमच्या हेल्थकेअर प्रोव्हायडर किंवा स्त्रीरोगतज्ञाकडे जा. प्रसववेदनेदरम्यान एपिड्युरल घेण्यातल्या धोक्यांचं अनुमान लावण्यासाठी तुमचा डॉक्टर ही योग्य व्यक्ती आहे.  

Translated by Anyokti Wadekar

loader