१० गोष्टी ज्या जन्म देण्याबद्दल तुम्हाला “कुणीही” सांगत नाही (तुमचे डॉक्टरही नाही)

मुझे कैसे पता चलेगा कि मैं लेबर के लिए तैयार हूँ ?

जेव्हा मी गरोदर राहिले, तेव्हा मी वाचू लागले. मला हाताला सापडेल ते मी वाचू लागले, ज्यांना बाळ झालं होतं अशा माझ्या मैत्रिणींशी मी बोलले, माझ्या गायनॅकोलाॅजिस्टला वारंवार भरपूर प्रश्न विचारू लागले. पण माझ्या असं लक्षात आलं की कमीत कमी आठ तरी गोष्टी अशा होत्या ज्या मला कुणीच सांगितल्या नाहीत - माझ्या डॉक्टरने नाही, माझ्या मित्रमैत्रिणींनी नाही, आणि जिच्यावर माझा सर्वात जास्त विश्वास आहे अशा माझ्या आईनेही नाही.

म्हणून मग माझ्या डिलिव्हरीनंतर मी माझ्या काही मैत्रिणींशी बोलले आणि अशा १० गोष्टी शोधून काढल्या ज्या तुम्हाला, जन्म देण्याबद्दल आणि गरोदरपणाबद्दल कुणीही सांगणार नाही.

स्तनपानासाठी तयार होणं

तुम्ही बाळ या जगात आल्यावरच स्तनपानाची सुरुवात करत असलात तरी पुढील बऱ्याच महिन्यांसाठी (किंवा कधी कधी काही वर्षांसाठी) तुमच्या स्तनांवर जो भडीमार होतो त्यासाठी तुमच्या स्तनांना कुणीही तयार केलेलं नसतं. सुदैवाने, माझ्या डॉक्टरने मला पहिल्या त्रैमासिकाच्या पहिल्या दिवसापासून रोज रात्री झोपण्याआधी स्तनांना मसाज करायला सांगितलं. तिने मला माझ्या निपल्सना जेवढं ओढत येईल तेवढं ओढून पाहायलाही सांगितलं जेणेकरून पुढे बाळ जेव्हा तोंडात घेऊन निपल्स ओढेल तेव्हा त्रास होणार नाही. माझ्या दोन मैत्रिणी ज्यांना त्यांच्या डॉक्टर्स कडून असा सल्ला मिळाला नाही त्यांना स्तनपानाच्या वेळी खूपच त्रास झाला (निपलला इजा, बाळाच्या तोंडात निपल नीट न जाणं, आणखी बरंच काही) - अर्थात, मला ठामपणे असं म्हणता येणार नाही की अशा सल्ल्यामुळे माझं स्तनपान खूपच सोपं झालं, पण तुम्ही कृपया ह्याबद्दल तुमच्या डॉक्टरशी नक्की बोलून घ्या.

सुरुवातीपासूनच स्ट्रेच मार्क्स क्रीम लावा

होय हे खरंय की तुम्हाला चौथा महिना लागल्याशिवाय तुमचं पोट स्ट्रेच होत नाही, पण त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यासाठी तयारी करू नये. तुमचं शरीर एका मोठ्या बदलातून जाणार असतं आणि तुमच्या त्वचेवर खूप ताण पडणार असतो म्हणून सुरुवातीपासूनच रोज रात्री तुमच्या पोटावर भरपूर तेल किंवा क्रीम लावणं चालू करा.

प्रसूतीच्या वेळी अंगावरून जाणारं पाणी हे नेहमीच धबधब्यासारखं नसतं

तुम्ही जर पुरेशा हॉलीवूड फिल्म्स पहिल्या असतील ज्यामध्ये गरोदर स्त्रीच्या अंगावरून पाणी जातं, तर त्यामध्ये नेहमी असं दाखवतात की पाण्याची खूप मोठी चिळकांडी जमिनीवर पडते. मला अशी भीती वाटायची की माझ्यासोबत देखील तसंच होणार आहे आणि म्हणून मी माझं धरण हे असं फुटताना लोकांना दिसू नये म्हणून माझ्या शेवटच्या महिन्यात सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळू लागले. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे असं काहीही झालं नाही. प्रसूतीच्या वेळी पाणी जाणं हे मासिक पाळीच्या स्रावासारखंच असू शकतं. तो एक छोटा, संतत स्राव असू शकतो जो हळूहळू वाढत जातो. आणि तो काही नायगारा फॉल्स सारखा धबधबा वगैरे नसतो.

ते तुमची व्हजायना शेव्ह करतात

जेव्हा माझं पाणी गेल्यावर मी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाले तेव्हा नर्सने मला पाय फाकवायला सांगितलं. मला आठवतंय, तेव्हा माझ्या मनात विचार आला, "इतक्या लवकर बाळ कसं बाहेर येईल? कॉन्ट्रॅक्शन वगैरेचं काय मग?" पण तरीही मी माझे पाय फाकवले. आणि मी पुरती गोंधळून गेले आणि मला धक्का बसला जेव्हा त्यांनी इलेक्ट्रिक रेझर बाहेर काढला. आणि मी जेव्हा विचारलं "तुम्ही ह्याचं काय करणार आहात?" तेव्हा मला फक्त एवढंच उत्तर मिळालं "मी तुला शेव्ह करणार आहे." ठीक आहे मग. करा शेव्ह. कदाचित ही येणाऱ्या बाळासाठी तयारी चालली असेल. पण बाळाला काय पडलंय त्याचं? बहुतेक, शेव्ह करण्यामुळे इन्फेक्शनचा धोका टळतो (कसा काय?), पण हे संशोधनाने सिद्ध झालेलं नाही. काही असलं तरी शेव्हिंग साठी तयार राहा.

एनेमा

बरोबर. तुम्हाला डॉक्टर कडून गोळी दिली जाते जेणेकरून तुमची आतडी मोकळी होतील, आणि मग तुम्ही ती डिलिव्हरीच्या टेबलवर मोकळी करणार नाहीत. मुळात, जेव्हा तुम्ही जन्म देत असता तेव्हा तुमच्या पोटात एवढा ताण येतो की तुम्हाला संडासला होऊ शकतं आणि असं झालं तर आपण कल्पना करू शकतो की ते बाळाच्या जन्मासारख्या एका सुंदर गोष्टींमध्ये किती विचित्रपणाचं ठरेल. म्हणून बाळाचा जन्म ही एक सुंदर गोष्टच राहावी म्हणून, डॉक्टर तुम्हाला तुमचं पोट साफ व्हावं याकरता एनेमा देतात.

जन्म देण्याचा चमत्कार...हा हळूहळू होतो.

पुन्हा, हॉलीवूड (आणि बॉलीवूड) फिल्म्स आठवतात. एकदा का पाणी गेलं की नटनट्या नुसत्या इकडून तिकडे धावत असतात, जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी, कारण "अरे देवा! बाळ बाहेर येतंय!" ...शांत व्हा! पाणी गेल्यानंतर प्रत्येकीची दोन मिनिटात डिलिव्हरी होत नाही. ती एक मोठी, लांबलचक प्रक्रिया असते आणि एकदा तुमची काँट्रॅक्शन्स चालू झाली की तुम्हाला असं वाटेल की तुम्ही खूप वेळापासून हॉस्पिटलमध्येच पडून आहात. मी १४ तास प्रसूतीवेदनेमध्ये होते आणि त्यानंतर मग शेवटी बाळाची बाहेर येण्याची वेळ झाली. कधी कधी त्या प्रक्रियेला खूप वेळ लागतो, तर कधी ती पटकन होते. म्हणून जेवढं आरामशीर राहता येईल तेवढं राहा. ह्या प्रक्रियेला वेळ लागतो.

खूप साऱ्या अंतर्गत तपासण्या

शेव्हिंग वाईट आहे असं तुम्हाला वाटलं असेल तर पुन्हा विचार करा. बाळ कोणत्या स्थितीमध्ये आहे हे बघण्यासाठी अंतर्गत तपासण्या केल्या जातात पण मला तर वाटतं की तुम्ही तुमच्या आयुष्यात लोकांशी जे वाईट वागलात त्याबद्दल देवाने तुम्हाला केलेली ती शिक्षा असते. माझ्या संपूर्ण डिलिव्हरीमध्ये माझी सहा वेळा अंतर्गत तपासणी झाली आणि ह्या तपासण्या नेमक्या तेव्हाच केल्या जातात जेव्हा तुम्ही आकुंचन अनुभवत असता, त्यामुळे तर ह्या तपासण्या अजूनच भयानक वाटतात. तुम्ही या तपासण्यांना नकार देऊ शकता का? दुर्दैवाने, नाही. पण तुम्ही तसा प्रयत्न करू शकता का? हो नक्कीच.

तुम्हाला काहीही खायची परवानगी दिली जाणार नाही

एकदा का तुमच्या प्रसूतिवेदना सुरू झाल्या की तुम्हाला डॉक्टर आवश्यक असल्याशिवाय कोणताही घनपदार्थ खायची परवानगी देणार नाहीत. म्हणून तुमच्या प्रसूतीवेदनेचा काळ जेवढा कमी असेल तेवढं तुमच्यासाठी बरं. नाहीतर मग अनंतकाळासाठी उपाशी राहण्याची तयारी ठेवा. या सगळ्यात मी एकच विचार करून स्वतःला दिलासा द्यायचे की, "बरंय, माझं वजन घटवण्याचा प्रवास सुरु झाला म्हणायचा!"

इपिजिआॅटमी

ही एक इमर्जन्सी सर्जिकल प्रोसीजर असते ज्यामध्ये तुमच्या व्हजायनाचा काही भाग कापला जातो जेणेकरून ती अजून जास्त उघडून त्यातून बाळ सहजपणे बाहेर यावं. ह्यात स्पष्ट करण्यासारखं अजून काही नाही.

‘लाल नदी’चं पुनरागमन

तुम्हाला असं वाटलं असेल की जन्म दिला की झालं. आता फक्त रात्रीची जागरणं, तुमचे स्तन सुन्न होईपर्यंत स्तनपान आणि सतत लागणारी भूक. पण असं नाहीये. निसर्ग त्याच्या आणखी एका गुप्त शस्त्राने तुमच्यावर वार करील. से हॅलो टू तुमची जुनी मैत्रीण, म्हणजेच तुमची मासिक पाळी! तुम्ही बाळाला स्तनपान देता की फॉर्म्यूला फूड भरवता यानुसार, तुम्हाला डिलिव्हरीनंतर कमीत कमी दोन महिनेपर्यंत रक्तस्राव (खूप जास्त नाही पण बराचसा) होईल.

Translated by Anyokti Wadekar

loader