तुमचा नवरा कुणावर जास्त प्रेम करतो – तुमच्यावर की तुमच्या आईवर? ह्या लहानश्या टेस्ट द्वारे शोधून काढा!

संताप आणणारी पण प्रेम करणारी. कठोरपणे काम करून घेणारी पण हळुवार हृदयाची.

अशक्य तरीही दयाळू. सर्व काही सहन करणारी पण कुणापुढे न वाकणारी.

कष्टाळू पण थोडी एकाकी. मृदू स्वभावाची पण तरीही पोलादासारखी कणखर.

आयांची किती सारी रूपं असतात. तुमच्या आईचं रूप कोणतं आहे? ती एक विलक्षणरीत्या बुद्धिमान स्त्री आहे का? कुठेही कुठलीही मंडळी जमा झालेली असली तरी त्यातल्या कोणाचा मूड बदललाय, कुणाचा प्रेमभंग झालाय, कुणामध्ये आत्मविश्वासाचा अभाव आहे हे भावभावना खूप चांगल्या प्रकारे ओळखणाऱ्या आईच्या लगेच लक्षात येतं. आपल्या आया उत्तम आरोग्यविषयक सल्ला देतात आणि मायाळू आणि उदार असतात आणि भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबरोबर त्या अगदी दयाळूपणे वागतात.

माझी आई अगदी अशीच आहे. म्हणून जेव्हा माझ्या प्रियकराची माझ्या आईशी ओळख करून देण्याची वेळ आली तेव्हा मला असा विश्वास होता की त्या दोघांचं नक्की पटेल. आणि तसंच झालं. त्यांची एकमेकांशी खूप छान मैत्री झालीय आणि ते एकमेकांचं सतत कौतुक करत असतात.

त्यांची ओळख होऊन आता १० वर्षं झाली आणि त्यांचं एकमेकांचं कौतुक करणं १०० पटींनी वाढलंय!

ही तुम्हाला तुमचीच गोष्ट वाटते का? ह्या छोट्याश्या चेक-लिस्ट द्वारे तुम्हाला कळू शकतं की तुमच्या पतीचं तुमच्यापेक्षा तुमच्या आईवर जास्त प्रेम आहे का. पुढील प्रश्नांपैकी तीन पेक्षा जास्त प्रश्नांचं तुमचं उत्तर 'हो' असं असेल तर तुमचा निष्कर्ष खरा आहे!

१. तुमचा पती तुमच्या आईचे कपडे/ स्वयंपाक/ जीवनशैली ह्या सर्वांची तुलना तुमच्याशी करतो का - तुमच्या आईचं उदाहरण देऊन तुम्हाला तिचं अनुकरण करायला सांगतो का?

बऱ्याचदा आपले पती आपली तुलना आपल्या आयांशी करतात जे अन्यायकारक आहे. उदाहरणार्थ, माझ्या स्वयंपाकाची तुलना माझ्या आईच्या स्वयंपाकाशी करणं हे तर अक्षरशः पाप झालं की! ती स्वयंपाकाच्या बाबतीत माझ्याहून कित्येक पावलं पुढे आहे आणि तिला जेवण बनवायला आवडतं. उलट मी एक फक्त गरजेसाठी स्वयंपाक बनवणारी व्यक्ती आहे आणि स्वयंपाकाच्या बाबतीत मला माझ्या आईची उंची गाठणं जमणारच नाही.

आमचा सल्ला? अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या पतीला, एका स्वतंत्र देशात, जिथे प्रत्येकाची व्यक्तिगत अशी आवडनिवड असते, तिथे राहण्यामागचं मुख्य तत्त्व समजावून सांगितलं पाहिजे. त्याला सांगा की माणसं ही स्वतःहून काही निवडी करतात आणि स्वयंपाकाकडे आवड म्हणून न पाहता गरज म्हणून पाहणं ही तुम्ही केलेली निवड आहे. ह्या संभाषणात तुम्ही तुमची बाजू ठामपणे मांडा आणि मग अर्धी लढाई जिंकल्यासारखंच आहे.

२. तुमचा पती तुम्हाला तुमच्या आईसारखं बनायला सांगतो का?

किंवा तुम्ही त्याला असं बोलताना ऐकलंय का, "तू तुझ्या आईसारखी का नाहीयेस?" हे खूप दुखावणारं आहेच पण सहसा हे असं होतं कारण तुमच्या पतीने त्याच्या स्वतःच्याही नकळत तुमच्या आईला असं एक प्रमाण मानलेलं असतं ज्या प्रमाणावर तो तुमची प्रत्येक कृती जोखतो.

अशावेळी काय करावं? त्याला हाताची दोन बोटं दाखवा आणि म्हणा - दोन वेगवेगळ्या व्यक्ती - म्हणजे दोन वेगवेगळी मनं. तुम्ही तुमच्या आईसारख्या बनू शकत नाही ह्याचं मुख्य कारण हे की तुम्ही म्हणजे तुमची आई नाही!

३. तुमचा पती मित्रमैत्रिणींमध्ये तुमच्या आईचा उल्लेख खूपच आदराने करतो का?

तुमच्या आईचं भरभरून कौतुक करणं, तिच्या आवडीनिवडींची स्तुती करणं आणि तुमची आई म्हणजे सर्व सद् गुणांचं मूर्तिमंत उदाहरण असं नेहमीच बोलणं ही सगळी ह्या गोष्टीची लक्षणं आहेत की तो खरंच आपल्या सासूवर प्रेम आणि तिचा आदर करतो. ह्याबद्दल तुम्ही धुसफूस करू नका.

काळजी घ्या - मुलगी म्हणून तुम्हाला माहीत असलेल्या तुमच्या आईबाबतच्या नकारात्मक गोष्टी उघड करण्याचा मोह टाळा. त्यामुळे तुम्ही तुच्छ ठराल आणि तुमच्या अंतःकरणाला कायमची रुखरुख लागून राहील.

४. तुमचा पती त्याच्या घरी जाण्याऐवजी तुमच्या माहेरी वरचेवर जाण्यासाठी कारणं शोधतो

तुमच्या असं लक्षात आलंय का की तुमचा प्रिय नवरा त्याच्या आईवडिलांच्या घरी जाण्याऐवजी तुमच्या माहेरी जाण्यासाठी जास्त उत्सुक असतो? ह्याची अनेक कारणं असू शकतात - तुमची आई खूप चांगलं आदरातिथ्य करते किंवा तुमची आई उत्तम स्वयंपाक बनवते. मग तुमच्यासाठी उलट ठीकच आहे हे, नाही का?

५. तुमचा पती तुमच्या आईसाठी अत्यंत महागडी गिफ्ट्स खरेदी करतो

तुमच्या आईचा वाढदिवस असो किंवा तुमचा पती प्रवासावरून परतलेला असो, तो नेहमीच तुमच्या आईसाठी सर्वोत्तम गिफ्ट्स निवडतो का? सहसा, ह्याचा सरळसरळ अर्थ असा होतो की तुमचा नवरा तुमच्यापेक्षा जास्त तुमच्या आईची आराधना करतो.

कारण? गिफ्ट्स खरेदी करणं हे किचकट काम आहे आणि खासकरून कामाच्या निमित्ताने प्रवास करत असू तर गिफ्ट खरेदी साठी पैसे आणि प्रयत्न दोन्ही लागतात. जर तुमच्या पतीने तुमच्या आईसाठी सर्वोत्तम गिफ्ट राखून ठेवलं असेल, तर तो नक्कीच तुमच्या आईचा भक्त आहे!

काळजी करू नका. खरं तर तुम्ही खूश व्हायला पाहिजे. कारण ह्या सर्व गोष्टींमुळे हेच सिद्ध होतं तुम्ही दोघेही आपसांत, जगातल्या सर्वोत्कृष्ट व्यक्तीवर - आईवर - प्रेम करता!

Translated by Anyokti Wadekar

loader