स्तनपानानंतर शरीरात कोणकोणते बदल होतात?

आई बनणं ही एक खूप मोठी गोष्ट आहे, कारण त्यामुळे स्त्रीला परमानंद मिळतो. भलेही या काळात स्त्रीला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला असेल, पण मातृत्वाचा क्षण त्यांच्यासाठी खूप खास असतो. हे सगळं खरं असलं तरी काही अशा आवश्यक गोष्टी आहेत ज्या स्त्रियांनी नीट लक्षात ठेवायला हव्या, जेणेकरून त्या बाळासोबत स्वतःची देखील काळजी घेऊ शकतील. आणि ह्या गोष्टी स्तनपानाशी निगडित आहेत. कारण स्त्रिया स्तनपानाच्या वेळी तर स्वतःची काळजी घेतात जेणेकरून बाळ भुकेलं राहू नये. पण जेव्हा त्या स्तनपान बंद करतात, तेव्हा मग जणू काही त्या स्वतःला विसरूनच जातात.

आज आम्ही तुम्हाला स्तनपानाशी संबंधित काही गोष्टी सांगत आहोत ज्या तुम्हाला माहीत असणं खूप आवश्यक आहे. या गोष्टी खालील प्रमाणे आहेत-

स्तनपानानंतर शरीराच्या बनावटीत बदल

स्तनपानानंतर स्त्रीच्या शरीरात बरेच बदल घडून येतात आणि त्यापैकी एक बदल म्हणजे शरीर ढिलं पडणं. कारण खूपशा स्त्रियांना ब्रेस्टफीडिंग नंतर शरीराच्या आकाराच्या बाबतीत बऱ्याच समस्या उद्भवतात ज्या वेळीच दूर केल्या पाहिजेत नाहीतर मग पुढे खूप त्रास होऊ शकतो. म्हणून पुढे होणाऱ्या त्रासापासून वाचण्यासाठी हे खूप आवश्यक आहे की तुम्ही योग्य आहाराद्वारे आपलं शरीर काटक ठेवलं पाहिजे. अशा वेळी रोज अंडी खा, हिरव्या पालेभाज्या खा आणि सूप प्या.

वजन वाढणं

स्तनपान बंद केल्यानंतर तुमचं वजन अचानक वाढू शकतं. कारण स्तनपान बंद केल्यावर देखील तुमच्या शरीरात अतिरिक्त चरबी साठून राहू शकते, ही चरबी  स्तनपानाच्या दरम्यान ऊर्जेच्या स्रोताचं काम करत असते. परंतु शरीराचा आकार आणि वजन याकडे पाहून निराश होऊ नका. हा आकार शरीराला येण्यासाठी गर्भावस्थेचे पूर्ण नऊ महिने लागले तर मग शरीराला पूर्वीचा आकार प्राप्त होण्यासाठी देखील इतकाच वेळ लागेल. योग्य आहारासोबत नियमित व्यायाम केल्यामुळे तुम्हाला वजन घटवण्यात मदत होऊ शकते. हळूहळू तुमचं शरीर पूर्ववत होऊ लागेल.

मासिक पाळीमध्ये समस्या

स्तनपानाचा एक फायदा हाही असतो की यामुळे तुमची मासिक पाळी पुन्हा उशिराने सुरु होते. पण ज्यावेळी तुम्ही स्तनपान बंद करवता तेव्हा तुमची मासिक पाळी चालू होते. या काळात तुम्हाला खूप जास्त रक्तस्राव किंवा मासिक पाळीमध्ये अनियमितता अनुभवास येऊ शकते. तुमचं बाळ जेवढं स्तनपान करेल, तेवढाच उशीर तुमची मासिक पाळी पुन्हा सुरु व्हायला होईल.

अतिरिक्त कॅलरीचे सेवन

ज्याक्षणी तुम्ही स्तनपान बंद करता त्याक्षणी तुमचं शरीर अधिक प्रमाणात कॅलरीज घेणं चालू करतं. कारण यावेळी तुम्हाला खूप जास्त भूक लागते. त्यामुळे तुम्ही पोट भरण्यासाठी कार्बोहायड्रेट्स, भात इत्यादींचं सेवन करू लागता. जर तुम्ही या काळात हे पदार्थ खात असाल तर मग नियमित व्यायाम देखील करा.

वर सांगितल्या गेलेल्या गोष्टी जर तुम्ही ध्यानात ठेवून वागलात तर स्तनपानानंतरच्या समस्यांपासून तुम्हाला मुक्ती मिळेल.

 

Translated by Anyokti Wadekar

loader