लग्नाच्या जुन्या लेहेंग्याचा असा वापर करा

लग्नात वधू सर्वात जास्त खर्च कशावर करत असेल तर तो लेहेंग्यावर. होय, लेहेंग्याची खरेदी करताना वधू आपलं बजेट विसरून जाते, कारण तिला वाटतं की लग्न आयुष्यात एकदाच होतं, आणि लग्नात तिला सगळ्यांहून जास्त सुंदर दिसायचं असतं. पण नंतर हाच लेहेंगा तुमच्या कपाटात पडून राहतो आणि त्याचा पुन्हा वापर होत नाही. परंतु आज आम्ही तुम्हाला तुमचा जुना लेहेंगा ‘रिसायकल’ कसा करावा हे सांगणार आहोत.

ओढणीचा असा वापर करा

 

तुमचा लेहेंगा कुठल्याही रंगाचा असो, त्याची ओढणी वेगवेगळ्या स्टाईल्समध्ये वेगवेगळ्या कपड्यांसोबत घाला. ही ओढणी स्ट्रेट-फिट सूट, अनारकली किंवा पतियाळा सलवार-कमीजवर घेऊ शकता. जर तुमची लग्नातल्या लेहेंग्यावरची ओढणी नेट किंवा टिशूची असेल तर ती फक्त त्याच रंगाच्या रॉ सिल्क सूट किंवा वेल्वेट अनारकलीसोबत वापरा. जर ओढणी जॉर्जेटची असेल तर ती क्रेप किंवा कॉटनच्या सलवार-कमीजसोबत वापरा.

चोळीपासून ब्लाऊज बनवा

 

लग्नाच्या लेहेंग्याच्या चोळीसोबत एक्सपेरिमेंट करा आणि ती चोळी कुठल्याही साडीसोबत घाला. जसं की जर तुमच्याकडे एम्ब्रॉयडरीवाली क्रेपची चोळी असेल तर ती साध्या क्रेपच्या साडीसोबत घाला. वेल्वेटची चोळी नेटच्या साडीसोबत किंवा वेल्वेटच्या साडीसोबत घाला. अशाने कुणाला कळूनही येणार नाही की तुम्ही साडीसोबत आपल्या लग्नातली चोळी घातली आहे. मित्रमैत्रिणींच्या लग्नाला जायचं असेल किंवा इतर कुठल्या समारंभाला जायचं असेल तेव्हा एखादा साधासा लेहेंगा विकत घ्या आणि तो लग्नाच्या लेहेंग्याच्या ओढणी व चोळीसोबत घाला. असं केल्याने तुमचे पैसेही वाचतील आणि तुमचा लग्नाचा लेहेंगाही वापरला जाईल.

या प्रकारे लेहेंगा ड्रेप करा -

 

क्रिएटिव्ह व्हा आणि आपल्या लेहेंग्याचा लुक पूर्ण बदलून टाका, कारण फॅशनचा अर्थ आहे एक्सपेरिमेंट करणं आणि त्यातून काही खास बनवणं. तुम्ही तुमचा लेहेंगा वेगवेगळ्या प्रकारे ड्रेप करू शकता. जसं की, साडी स्टाईल, गुजराती लेहेंगा स्टाईल किंवा रिस्ट स्टाईल (ज्यामध्ये ओढणीचा एक कोपरा आपल्या मनगटावर बांधतात). तुम्ही लेहेंग्याच्या रंगाच्या विरोधी रंगाची एक स्वतंत्र ओढणी सुद्धा लेहेंग्यासोबत स्टाईल करू शकता.

एक्सपेरिमेंट करा -

लग्नाच्या वेळी तुम्ही लेहेंग्याचा रंग, डिझाईन, एंबेलिशमेंट हे सगळं नीट पारखून घेता, पण मग तो लेहेंगा फक्त एकदाच घालून फुकट का घालवायचा? पुन्हा एकवार एका नव्या लुकसाठी आपला हेवी लेहेंगा बँडो किंवा कॉर्सेटसह घाला. साधं, हलक्याश्या नक्षीचं कॉर्सेट भारी-भरकम अशा लेहेंग्यावर खूप छान दिसेल. याव्यतिरिक्त तुम्ही तुमचा लेहेंगा शीअर जॅकेटसोबत सुद्धा घालू शकता. यावर्षी ब्रायडल वेअर मध्ये रॅम्पवर खूप सारे जॅकेट लेहेंगे सादर करण्यात आले. म्हणून, हे जॅकेट लेहेंगे विकत घेण्याऐवजी आपल्या लग्नाच्या लेहेंग्याला जॅकेट लेहेंगा बनवा. आपल्या आवडीचं कापड आणि एम्ब्रॉयडरी निवडून डिझाईन करून घ्या.

लेहेंग्याला बनवा अनारकली -

 

तुमच्या ओळखीचा कुणी चांगला टेलर असेल तर तुम्ही तुमच्या लेहेंगा किंवा चोळीची अनारकली देखील बनवून घेऊ शकता. वरच्या भागासाठी साधं कापड लेहेंग्याच्या घेरासोबत शिवून घ्या. त्याचप्रमाणे चोळीची अनारकली बनवायची असल्यास त्याखाली एखाद्या चांगल्या कापडाच्या घेरदार कळ्या जोडून घ्या.

 

Translated by Anyokti Wadekar

loader