बाळाच्या झोपेच्या बाबतीत प्रत्येक आईकडून हमखास होणाऱ्या ५ चुका (आणि त्या कशा टाळाव्यात)

तुम्ही नव्याने आई बनल्यावर तुम्हाला खूप साऱ्या समस्यांशी लढावंच लागतं. योनीतून रक्तस्राव होणं, स्तनपानासाठी बसण्याची योग्य पद्धत शोधून काढणं, बाळ का रडतंय हे समजून घेणं ह्या सर्व गोष्टी नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्याचा एक भाग आहेत. असं असलं तरी, ह्या सगळ्या परिस्थितींशी तुमचं जुळवून घेऊन  झालं, तरी तुम्हाला आणखीन एक मोठी लढाई लढायची असते. आणि प्रिय मातांनो, ती लढाई म्हणजे दुसरं काही नसून तुमच्या बाळाच्या झोपेचं वेळापत्रक योग्य प्रकारे पाळणं ही आहे.

घड्याळात कितीही वाजले असले तरी तुमच्या बाळाला झोपणं, खाणं, शू आणि शी करणं हे सर्व करायचं असतं! आणि तुमच्या बाळाच्या झोपेचं वेळापत्रक पाळणं म्हणजे तुमच्या स्वतःच्या झोपेचं खोबरं होणं. इतकं की ८ तासांची झोप भूतकाळात जमा होते. पण जरा थांबा आयांनो, बाळाच्या झोपेच्या बाबतीत ह्या सर्वसाधारण चुका टाळल्यास तुमच्या अर्ध्या चिंता संपून जातील असं आम्ही तुम्हाला सांगितलं तर? ऐकून बरं वाटतंय? मग पुढे वाचा!

१. बाळाची खोली खूप जास्त सजवणं

प्रत्येक आईला असं वाटत असतं की तिच्या बाळाची खोली स्वप्नातल्या सारखी असावी. एका आईची तिच्या बाळाच्या खोलीसाठी अत्यावश्यक वस्तूंची यादी ही शोभिवंत वॉलपेपर्स, लाईट्स, नाईट लॅम्प्स आणि खास बाळांसाठीच्या गोधड्या...अशी न संपणारी असते. असं असलं तरी, तुम्ही चुकताय आयांनो! कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो आणि हे तुमच्या बाळाची खोली सजावण्याच्या बाबतीतही खरं आहे. बाळाच्या खोलीत खूप साऱ्या लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी असल्याने बाळाला खूप झोप आलेली असूनही ते झोपायला बघत नाही. म्हणून बाळाच्या खोलीतली सजावट कमीत कमी ठेवा आणि फिकट, सुखदायक रंगांचा वापर करा.

२. नित्यक्रमाचा अभाव

नित्यक्रम हा फक्त प्रौढांसाठीच नाही तर त्या लहानग्या बाळांसाठी देखील महत्वाचा आहे. म्हणजे असं की तुम्ही रात्रीच्या जेवणात ब्रेकफास्टचे पदार्थ खाल का? विचित्र वाटतं ना? बाळांच्या बाबतीतही तसंच आहे. बाळाच्या झोपेसाठी एक ठरावीक वेळ निवडा आणि कमीतकमी एक किंवा दोन आठवडे ती वेळ पाळा आणि तुमच्या असं लक्षात येईल की रोज त्याच वेळेला तुमच्या बाळाला झोप येऊ लागलीय!

३. बाळाला झोपेसाठी तयार न करणं

बाळाबरोबर प्रवास करताना जशी खूप तयारी करावी लागते, तशीच बाळाला झोपवतानाही आधी काही तयारी करावी लागते. सर्वात आधी बाळाचे कपडे बदलून त्याला आरामदायक कपडे घाला, त्याचा लंगोट बदला आणि त्याला नाईट क्रीम लावा. हे झालं की लाईट्स मंद करा आणि एखादं शांत करणारं अंगाईगीत लावा किंवा स्वतः म्हणा. झोपेच्या वेळी गोष्टीची पुस्तकं वाचून दाखवणं ही सुद्धा एक चांगली कल्पना आहे. ह्या सर्व गोष्टींमुळे बाळाच्या मनाला इशारा मिळतो की आता झोपायची वेळ झाली.

४. बाळाला खूप उशिरा पर्यंत जागं राहू देणं

बाळाला खूप उशिरा पर्यंत जागं राहू दिल्यामुळे बाळ चिडचिड करू लागतं आणि मग त्याला सांभाळणं कठीण होऊन बसतं. घरी पाहुणे आलेले असताना बाळाला जागं राहू देण्याचं तुमचं कारण समजू शकतं, पण असं बघा की, तुम्हाला खूप झोप आलीय आणि कुणाला तरी तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत तर तुम्ही जाग्या राहाल का? नक्कीच नाही! मग आपण एवढ्या लहान बाळाकडून तशी अपेक्षा कशी काय करू शकतो? बाळाला झोपवायचंय असं पाहुण्यांना नम्रपणे सांगा आणि तुमचं वेळापत्रक पाळा. डोळ्यांवर झापड येणं, जांभया देणं आणि चिडचिड ही तुमच्या बाळाला झोप आल्याची काही लक्षणं आहेत. अशा वेळी बाळाला झोपायला नेण्यामुळे त्याला स्वतःहून वेळेवर झोपायची सवय लागते.

५. बाळ रडायला लागलं की लगेच त्याला उचलून घेणं

हे ठरलेलंच आहे की बाळ रडायला लागलं की आपण लगेच त्याच्याकडे धाव घेतो. पण थांबा! असं केल्यामुळे बाळाला वाटतं की ते रडायला लागलं की त्याला उचलून घेतलं जाईल आणि त्यामुळे शेवटी झोप-रडणं-उचलून घेणं-झोपणं असं न संपणारं चक्र चालू होतं. मोठ्या माणसांना जशी रात्रीच्या झोपेतून अनेकदा जाग येते, तशीच बाळांनाही येऊ शकते. असं असलं तरी, बाळ आपोआप पुन्हा झोपतंय का हे काही मिनिटं थांबून पाहा.

मग मातांनो, झोपण्याच्या वेळेला युद्धक्षेत्र बनवू नका! इथे सांगितलेले सोपे नियम पाळा आणि तुमच्या बाळाला वेळेवर झोपवणं अगदी सोपं होऊन जाईल! शुभेच्छा!

Translated by Anyokti Wadekar

loader