बाळाची मुंज करण्यामागचं ‘खरं’ कारण हे आहे!

माझा मुलगा नुकताच एक वर्षाचा झाला आणि मी त्याच्या पहिल्या वाढदिवसाबाबत खूपच खूश होते. असं असलं तरी त्याच्या मुंजीबद्दल आमच्यात बराच वाद झाला. त्याला तुम्ही मुंज, मोत्तई किंवा चूडाकरण म्हणा - त्या सर्वांचा अर्थ तुमच्या मुलाचं पहिल्या वेळी केशकर्तन करणं असा होतो. भारतात जवळजवळ सर्वच समाजांत ही परंपरा पाळली जाते आणि ती मंदिरात, पवित्र वातावरणात केली जाते. 

पण मी ह्या प्रथेबाबत तितकीशी खूश नव्हते कारण माझ्या मुलाचे केस जन्मतःच इतके सुंदर होते की कुठच्याही पालकाला त्यांचा हेवा वाटावा आणि मला माझ्या मुलाचे केस अजिबात कापायचे नव्हते. वडीलधाऱ्यांना खूश करायचं म्हणून म्हणा, दैवी शक्तीची भीती म्हणा किंवा शास्त्रीय कारण खरं मानून म्हणा, तो अटळ दिवस शेवटी आला. माझ्या मुलाने टाहो फोडला आणि तो किंचाळू लागला आणि मी तिथे उभी राहून हतबलपणे, माझे अश्रू पुसत हा प्रकार पाहत होते.  

असं असलं तरी आपल्या पैकी बऱ्याच जणांना मुंजीमध्ये बाळाचं मुंडण करण्यामागचं शास्त्र आणि अर्थ क्वचितच माहीत असतो. माझ्यासाठी तरी मुंज कौटुंबिक परंपरेचा एक भाग होती. म्हणून इथे तुम्हाला मुंजीच्या प्रथेबाबत ‘जरतर’, ‘परंतु’, ‘म्हणजे काय’ अशा सर्व प्रश्नांची उत्तरं देत आहोत. 

मुंज म्हणजे काय? 

मुंज म्हणजे बाळाच्या डोक्यावरील केसांचं पहिल्यांदाच मुंडण करणं आणि ते पवित्र अशा परिसरात केलं जातं. मुंज करण्यामागे धार्मिक आणि शास्त्रीय कारणं आहेत आणि ती सहाव्या महिन्यात, पहिल्या वर्षी, तिसऱ्या वर्षी किंवा पुढे अशा विविध वयांत केली जाते. 

मुंज का केली जाते?

मुंज ही धार्मिक आणि शास्त्रीय अशा दोन्ही कारणांसाठी केली जाते:

१. बाळाच्या भोवतीच्या नकारात्मक लहरी नष्ट करणारा असा हा सोहळा मानला जातो. त्यामुळे त्याची/ तिची एक नवीन सुरुवात होते. 

२. काही कुटुंबामध्ये बाळ एक वर्षाचं झाल्याचं घोषित करण्यासाठी म्हणून हा सोहळा करतात. 

३. प्रत्यक्षात, बाळाचं मुंडण केल्यामुळे त्याला तात्पुरता आराम मिळतो आणि सर्दी खोकला होत नाही. ह्याच कारणासाठी बरेच लोक बाळाचं मुंडण उन्हाळ्यात करणं पसंत करतात. 

४. बाळाचं मुंडण केल्यामुळे त्याला नवीन येणाऱ्या दातांच्या समस्यांपासून आराम मिळतो असंही मानलं जातं. 

५. या प्रथेची आणखी एक बाजू अशी की मुंडण केल्याने बाळाच्या बुद्धिमत्तेला चालना मिळते आणि त्याच्या ज्ञानी प्रवृत्तीमध्ये भर पडते. 

बाळाचं मुंडण केलं पाहिजे का? 

सर्वसाधारणपणे हा प्रश्न विचारला जातो की मुंज केलीच पाहिजे का. हे पूर्णपणे पालकांवर आणि ते पाळत असलेल्या रूढी आणि प्रथांवर अवलंबून आहे. ह्या बाबतीत कठोर असे काही नियम नाहीत. 

मुंज का करावी: बऱ्याच कुटुंबांमध्ये मुंज ही, प्रथा पाळण्याच्या उद्देशाने आणि वडीलधाऱ्यांना खूश करण्याच्या उद्देशाने केली जाते. 

मुंज का करू नये: बाळाचं मुंडण केल्याने त्याच्या केसांच्या वाढीवर काहीही फरक पडत नाही. तसंच बाळाचं अनावर असं रडणं आणि एकूणच सगळा तमाशा टाळण्याच्या दृष्टीने काही पालक मुंज करत नाहीत. 

आनंदी अशा मुंजीसाठी काही टिप्स 

१. नवीन रेझर आणि ब्लेड वापरा. त्यामुळे सगळं काही निर्जंतुक असेल आणि बाळाला कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन होण्याची शक्यता राहणार नाही. 

२. बाळ सहा महिन्यांचं होण्यापूर्वी मुंज करून घेण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे बाळाला फारसं काही कळून येणार नाही आणि काही त्रास न देता ते मुंडण करू देईल. 

३. मुंडण झाल्यावर बाळाला गरम पाण्याने आंघोळ घाला. 

४. बाळाला कुठे जखम झालेली लक्षात आल्यास अँटिसेप्टिक लावा. जुन्या प्रथेनुसार हळदीची किंवा चंदनाची पेस्ट लावतात. 

५. शेवटचं म्हणजे, मुंडण होत असताना बाळाचं लक्ष विचलित करायचा प्रयत्न करा. त्याचं आवडतं खेळणं बरोबर न्या किंवा त्याचं आवडतं बालगीत गाऊन दाखवा.  

Translated by Anyokti Wadekar

loader