ही लक्षणं ठामपणे सांगतात की तुमचं पालकत्व चुकलंय! तुम्ही असे पालक आहात का?

पालक म्हणून आपल्या सगळ्यांनाच असं वाटत असतं की आपल्या मुलांचं उत्तम प्रकारे संगोपन व्हावं आणि त्यांची वर्तणूक नेहमी चांगली असावी. पण आपल्याला हे समजत नाही की आपल्या स्वतःच्या कृतींचा आणि शब्दांचा मुलांवर फार मोठा परिणाम होऊ शकतो. होय, पालकांनो, तुमचे विचार, शब्द, कृती आणि वागणं या सर्वांचा तुमच्या मुलाच्या संगोपनावर कायमचा ठसा पडत असतो. या मानसिक समस्यांचा सरळ सरळ अर्थ चुकीचं पालकत्व असा होतो!

१. अॅंग्झायटी आणि डिप्रेशन

जे पालक आपल्या मुलाच्या प्रत्येक गोष्टीवर सतत बारीक लक्ष ठेवतात आणि त्यांच्यावर टीका करत राहतात त्यांच्यामुळे मुलाला अॅंग्झायटी आणि डिप्रेशन होतं. मुलांची अति काळजी करणं आणि त्यांच्यावर टीका करत राहणं यामुळे मुलाच्या मनात त्याच्या स्वतःबद्दल आणि त्याच्या क्षमतांबद्दल शंका निर्माण होते, ती सगळ्या गोष्टींना भिऊ लागतात आणि आत्मनिर्भर बनू शकत नाहीत.

२.  स्थिर किंवा चिंतामुक्त राहण्यातली असमर्थता

जेव्हा पालक "सिरीयस हो" किंवा "टवाळ्या बंद कर" ही वाक्य नियमितपणे वापरतात तेव्हा मुलाला असं वाटू लागतं की ते रिलॅक्स राहू शकत नाही. सगळ्या लहान मुलांना मस्ती करायला आवडते पण जेव्हा पालक सतत मुलांना "शहाण्यासारखं वाग" किंवा "छोट्या बाळांसारखं वागायचं नाही" असं म्हणत राहतात तेव्हा मुलांना असं वाटायला लागतं की ती जशी आहेत तशी चांगली नाहीयेत. ती सतत साशंक आणि अस्वस्थ राहू लागतात आणि मोठं झाल्यावर त्यांना सतत ह्या गोष्टीची चिंता सतावते की इतर लोक त्यांच्याबद्दल काय विचार करतात.

३. हानिकारक व्यसनं

पालक जर सतत आपल्या मुलाला हे सांगत राहिले की मुलामुळे त्यांना किती त्रास होतो तर मुलं त्यातून बहुधा असा निष्कर्ष काढतात की सगळ्यांचं त्यांच्याविना चांगलं चालेल. यामुळे त्यांची वागणूक स्वयं-विघातक बनू लागते जसं की व्यसन करणं आणि धोकादायक खेळ खेळणं. मूल जाणूनबुजून स्वतःला धोकादायक परिस्थितीमध्ये ढकलू लागतं कारण त्याला वाटू लागतं की त्याला या जगात काहीच किंमत नाही.

४. ढासळता आत्मसन्मान

प्रत्येक वेळी पालक जेव्हा त्यांच्या स्वतःच्या मुलाची तुलना इतर मुलांशी करतात तेव्हा ते मुलाचा आत्मसन्मान ढासळवत असतात. "तुला परीक्षेत तुझ्या बहिणी सारखी 'ए' श्रेणी का नाही मिळत? किंवा "टिनू ने मागच्या गेम मध्ये २ रन्स काढले आणि तुला एकही काढता आला नाही!" ही सगळी बोलणी मुलाच्या मनात न्यूनगंड निर्माण करतात. असं मूल मोठं होताना त्याचा आत्मसन्मान ढासळत जातो, ते सतत स्वतःची इतरांशी तुलना करत राहातं आणि त्याला असं वाटत की ते एक चांगली परिपूर्ण व्यक्ती नाही.  

५. विश्वास ठेवण्याच्या बाबतीतल्या समस्या

तुमचं मूल लहान असताना "अनोळखी व्यक्ती म्हणजे धोका" असं शिकवणं उपयोगी असलं तरी कुणावरही विश्वास ठेवू नये असं सतत तुमच्या मुलाला सांगत राहिल्याने त्यांच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होतो. त्यांचा कुणी कधी गैरफायदा घेणार नाही हे खरंय पण त्यांच्यामध्ये विश्वास ठेवण्याच्या बाबतीतल्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात ज्यामुळे त्यांच्या नात्यांवर गंभीर आणि वाईट असे परिणाम होतात.

६. प्रतिभेचं दडपलं जाणं आणि पुढाकार घेऊ न शकणं

सगळ्या मुलांना स्वप्नं पाहायची मुभा असली पाहिजे. जेव्हा पालक आपल्या मुलाला असं सांगतात की त्याची स्वप्नं अवास्तववादी आहेत, तेव्हा मग मूल स्वप्नं पाहणं सोडून देतं. मुलाला मदत करायला नकार देणं किंवा त्याच्या स्वप्नांची खिल्ली उडवणं यामुळे त्याची प्रतिभा दबली जाते, ते स्वप्नं पाहणं सोडून देतं आणि आपल्याला लोक हसतील ह्या भीतीने भविष्यात कुठल्याही गोष्टीत पुढाकार घ्यायचं टाळतं.

७. डिप्रेशन आणि अपराधीपणाची भावना

बरेच पालक त्यांच्या मुलांसाठी खूप गोष्टींचा त्याग करतात. पण जे पालक त्यांच्या मुलाला त्याच्यासाठी केलेली त्यागाची सतत आठवण करून देत राहतात त्यांच्यामुळे मुलांमध्ये अपराधीपणाची भावना आणि डिप्रेशन निर्माण होतं. त्या लहान मुलाला असं वाटायला लागतं, की आपण एक समस्या आहोत आणि आपल्याला मिळणारं शिक्षण, चांगलं घर, कपडे हे सर्व मिळण्याची आपली लायकी नाही. ही आपण अपात्र असल्याची भावना पुढे प्रौढ आयुष्यातही कायम राहू शकते.

८. भावना दाबून ठेवणं

जेव्हा पालकांमध्ये संवेदनशीलतेचा अभाव असतो किंवा ते आपल्या भावना लपवतात, तेव्हा बहुतकरून मूल त्यांच्या वागण्याचं अनुकरण करतं. "रडणं थांबव" किंवा "तक्रारी करणं थांबव" असं सातत्याने मुलाला सांगितलं गेलं की मुलाला असं वाटू लागतं की त्याच्या भावभावना योग्य नाहीत. त्यामुळे मुलं बुजऱ्या स्वभावाची होतात आणि त्यांच्या भावना दाबून ठेवू लागतात, ज्यामुळे त्यांच्या संपूर्ण आयुष्यात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

९. आत्मनिर्भरतेचा अभाव

काही पालक आपल्या मुलांची अति काळजी घेणारे आणि त्यांच्यावर खूप जास्त ताबा ठेवणारे असतात. आपल्या मुलांची अति काळजी करणाऱ्या पालकांची मुलं मोठी होऊन बेजाबदार, बालिश होतात आणि त्यांच्यात  आत्मनिर्भरतेचा अभाव असतो. मुलाला सतत स्वतःबरोबर ठेवणं आणि त्याला त्याच्या/ तिच्या मित्रमैत्रिणींबरोबर गंमतीजंमतीचं आणि रोमांचक असं काही न करू दिल्यामुळे मुलं खुरटतात. ती दुसऱ्यावर अवलंबून राहू लागतात, कुठल्याही बदलाला भितात आणि आपल्या आयुष्यातले निर्णय घेताना बेजबाबदार होतात.

Translated by Anyokti Wadekar

loader