डिलिव्हरी रूम मध्ये जाण्याआधी ह्या ५ गोष्टी प्रत्येक स्त्रीला माहीत असल्या पाहिजेत

जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आई बनणार असता तेव्हा तुमच्या मनात खूप सारे प्रश्न निर्माण होतात. या प्रश्नांना तुम्हाला मोकळेपणाने सामोरं जावं लागेल कारण या काळात तुम्हाला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. प्रसूती होणार असते तेव्हाची वेळ सर्वात महत्त्वाची असते कारण यावेळी स्त्रिया सर्वात जास्त घाबरलेल्या आणि चिंताग्रस्त असतात. तसंच त्यांच्या मनात खूप प्रश्न येत असतात, की डिलिव्हरी रूम मध्ये आपल्यासोबत काय काय होणार आहे. खाली काही गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत ज्या तुम्ही डिलिव्हरी रूम मध्ये जाण्याआधी जाणून घ्या ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. या गोष्टी खालील प्रमाणे आहेत-

प्रसववेदना

प्रत्येक गरोदर स्त्रीने प्रसववेदनेसाठी मनाची तयारी केली पाहिजे, की या वेदनेतूनच पुढे जायचं आहे. कारण नॉर्मल डिलिव्हरीच्या दरम्यान तुम्हाला प्रसववेदना अनुभवावी लागते, जी काही तास किंवा त्याहून कमी वेळासाठी होते. ही वेदना कमी व्हावी म्हणून डॉक्टर तुम्हाला दीर्घ श्वास घ्यायला सांगू शकतात. त्याव्यतिरिक्त लोकल किंवा इन्ट्रावेनस औषधांद्वारे किंवा इंजेक्शन देऊन तुमच्या वेदना कमी केल्या जाऊ शकतात.

डॉक्टरवर विश्वास ठेवा

या वेळी तुम्ही आपल्या डॉक्टरवर सर्वात जास्त विश्वास ठेवला पाहिजे कारण ते तुमच्या समस्या सहजगत्या सोडवू शकतात. एवढंच नाही तर डॉक्टर या गोष्टीचा देखील अंदाज लावू शकतात की तुमची नॉर्मल डिलिव्हरी होणार की सिझेरियन. त्यासाठी सुद्धा तुम्ही आधीपासूनच तयार राहिलं पाहिजे. कारण बऱ्याचदा डॉक्टर नॉर्मल डिलिव्हरीचा सल्ला देतात पण ऐन वेळी जेव्हा बाळाच्या हृदयाचे ठोके मंदावू लागतात किंवा मग इतर काही परिस्थितींमध्ये डॉक्टर ऑपरेशनचा सल्ला देतात, जेणेकरून आई आणि बाळ दोघेही सुरक्षित असतील.

तुमचं गुप्तांग पाहिलं जाणं

जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आई बनणार असता तेव्हा तुम्हाला अजिबात माहिती नसतं की डिलिव्हरी रूम मध्ये काय काय होणार आहे. यात एक सर्वात महत्त्वाची लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की लेबर रूम मध्ये डॉक्टर किंवा नर्स तुमचा योनीमार्ग वारंवार तपासू/ बघू शकतात. असं करून, ते बाळ कोणत्या स्थितीमध्ये बाहेर येईल हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून त्यात लाज वाटून घेऊ नका कारण ही गोष्ट प्रत्येक गर्भवती स्त्रीच्या बाबतीत घडते.

स्वतःवर विश्वास ठेवा

या सगळ्यात एक गोष्ट खरी की यावेळी इतर लोक काय म्हणतात त्यापेक्षा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवलात तर सगळं सोपं होऊन जाईल. कारण जेव्हा तुम्ही लेबर रूम मध्ये जाता तेव्हा तुम्हाला खूप भीती वाटत असते, आणि मनात नको नको ते विचार येत असतात. पण तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवलात आणि हिमतीने गोष्टींना सामोऱ्या गेलात तर तुम्ही कुठल्याही अडचणींवर सहज मात करू शकता.

आपल्या होणाऱ्या बाळाविषयी विचार करा

या वेळी तुम्ही स्वतःचा विचार करण्याऐवजी येणाऱ्या बाळाचा विचार जास्त केला पाहिजे. कारण तुम्ही पूर्ण नऊ महिने कष्टाचे घालवलेले असतात, मग आता प्रसूतीच्या वेळी तुम्ही असा विचार केला पाहिजे की आता फक्त थोडा वेळ कळ काढायची आहे आणि मग आपलं आयुष्य आणि बाळ आपल्या हाती आहे.

या सगळ्या व्यतिरिक्त, या वेळी जेवढं आनंदी राहता येईल तेवढं राहा कारण यानंतर तुमचं आयुष्य पूर्णतः बदलणार आहे आणि तुम्हाला मातृत्वाची भेट मिळणार आहे.

 

Translated by Anyokti Wadekar

loader