एकच मूल असण्यातली समस्या

आपल्या काकी, मामी, आत्या, मावश्या सगळ्यांनाच हे ठरवायचं असतं की आपलं आयुष्य कसं असलं पाहिजे. पण त्यांना कधीही हे ठरवू देऊ नका. 

मला वाटलं होतं आयुष्याच्या या टप्प्यावर आता अनाहूत सल्ले शेवटी संपतील:

"तुला लग्न करायचं नाही का?" (जेव्हा मी ३० वर्षांची असताना अजूनही लग्न केलं नव्हतं). 

"ठरलं एकदाचं! मग आता लग्न कधी आहे?" (जेव्हा माझा साखरपुडा झाला). 

"मग बाळ होणारे का तुला?" (लग्नाच्या जवळजवळ दुसऱ्याच दिवशी). 

"तुला असं वाटतं का की काहीतरी प्रॉब्लेम आहे?" (चार वर्षांनंतर मी अजूनही गरोदर राहिले नव्हते तेव्हा माझ्या पाठीमागे). 

मग मला बाळ झालं आणि ह्या सगळ्या साळकाया माळकाया त्यांच्या-त्यांच्या आयुष्यात व्यग्र झाल्या असतील आणि आता माझ्या तोंडावर कुठलेही प्रश्न फेकले जाणार नाहीत असं मला वाटू लागलं. 

पण मला जे वाटलं ते चुकीचं होतं. 

बाळ झाल्यापासून प्रश्न आणि कॉमेंट्स पुन्हा सुरु झाल्यायत. 

"तुझं हे एकच, एकुलतं एक मूल नसणार आहे, बरोबर?"

"तुझ्या वयामुळे तू आणखी एक मूल लगेचच प्लॅन केलं पाहिजेस हे तुला कळतंय ना?"

हो. सर्वत्र आढळणारी ही "एकाच मुलाची चर्चा" म्हणजे एक मूल असलेल्या पालकांसाठी ओळखीचा प्रांत आहे. स्त्रियांची आणि त्यांच्या गर्भाशयाची लोकांना खूपच जास्त काळजी लागून राहिलेली असते. ज्यांना मुलं होऊ शकत नाहीत त्यांची त्यांना दया येते, ज्यांना खूप मुलं असतात त्यांची नालस्ती केली जाते, आणि ज्यांना मुलं नकोच असतात त्यांच्याकडे तुच्छतेने पाहिलं जातं. ह्या सगळ्यात आपण स्त्रिया जिंकूच शकत नाही. आणि मग माझ्यासारख्या स्त्रिया असतात - ज्यांना बाळ झालंय, आणि एकदा का बाळ होऊन एक वर्ष झालं, की दुसरं मूल केव्हा होणार ह्याबाबतच्या प्रश्नांचा भडीमार केला जातो. 

"एकुलती एक असलेली मुलं खूप अंतर्मुख असतात". (खरं तर याच्या अगदी उलट असतं)

"भावंड असलं की मुलं कमी स्वार्थी बनतात" (ही मुक्ताफळं उधळणाऱ्या स्त्रीला हा विरोधाभास कळून येत नव्हता, की ती मला हे बोलत असताना तिची स्वतःची मुलं तिच्या मागे उभं राहून एका जुन्यापुराण्या खेळण्यातल्या माशासाठी जीव जाईपर्यंत भांडत होती. मला बोलून आसुरी आनंद घेणाऱ्या हे स्त्रिये, तुझी स्वतःची मुलं बघ किती स्वार्थी आहेत). 

"तुझ्या मृत्यूनंतर तुझ्या मुलाला फार एकटं वाटेल". (काहीही?! मी अशी आशा बाळगते की त्याला भरपूर मित्रमैत्रिणी असतील, कदाचित एक कुटुंब असेल आणि त्याचं स्वतःचं असं एक छान आयुष्य असेल, पण तुम्ही जे कुजकटासारखं बोललात त्याबद्दल धन्यवाद!) 

मी गेल्या १२ महिन्यांत खूप काही ऐकलंय; माझा मुलगा स्वार्थी, एकलकोंडा, बिघडेल, आक्रमक, हुकुमत गाजवणारा, मित्रमैत्रिणी नसलेला आणि कदाचित एक मनोविकृती असलेली व्यक्ती बनेल. खरंच, माझ्या इवल्याश्या, हसऱ्या, आनंदी बाळाबद्दल कोणीतरी ‘मनोविकृत’ असं म्हटलं. 

एखाद्याला किती मुलं होतात किंवा होत नाहीत यावर सवाल उठवणं का योग्य नाही त्याची पुष्कळ कारणं आहेत. 

शिवाय, एकुलतं एक मूल पाहिलं की संशय घेणाऱ्या तुम्हा सर्वांसाठी माझ्याकडे एक बातमी आहे; एकच मूल असलेलं कुटुंब हा आता अपवाद राहिलेला नाही. 

ते आता सर्वमान्य झालं आहे आणि पुढेही तसंच राहणार आहे. एकुलत्या एक मुलांबद्दलच्या बऱ्याच काळापासून चालत आलेल्या सर्व काल्पनिक कथा निष्फळ ठरल्या आहेत - एकुलती एक मुलं सामाजिकदृष्ट्या अपात्र नसतात; ती स्वावलंबी आणि आत्मनिर्भर असतात. त्यांची इतरांशी घट्ट मैत्री होते आणि एकुलते एक असल्याने त्यांचे पालक किंवा आजीआजोबा त्यांना जो जास्तीचा वेळ देऊ शकतात, त्याचा त्यांना बऱ्याचदा फायदाच होतो. 

पण मी असं म्हणत नाहीये की एकुलत्या एक मुलांना भावंड नसेल तर ते बरंच आहे (असं बोलून मी आग लावणार नाही!) पण एक कुटुंब कसं असलं पाहिजे त्याबाबतीतले आपले आदर्श आपण आपल्या मुलांवर लादता कामा नये. 

तुम्ही स्वतः जर, दोन, तीन, चार किंवा त्याहून जास्त मुलांपैकी एक होता तर तुम्हाला असं वाटेल की तेवढ्या संख्येची तुकडी म्हणजे एक आदर्श कुटुंब. पण प्रत्येक मुलाला ते ज्या परिस्थितीत जन्मलंय तीच फक्त माहीत असणार - आणि तीच त्याच्यासाठी 'नॉर्मल' असणार. 

तुम्हाला एक मूल असो किंवा दहा मुलं असोत, चांगलं पालकत्व हा कुटुंबाचा अगदी महत्वाचा असा पाया असतो. 

आणि जर तुम्हाला दहा मुलं आहेत, तर मग, इकडे या आणि आम्हा सगळ्यांना तुमच्याबद्दल पूर्वग्रह बनवू द्या.....

स्रोत: द एम वर्ड 

Translated by Anyokti Wadekar

loader