१ वर्षाहून लहान बाळांना शिकवायच्या काही आवश्यक गोष्टी

सहसा तुम्ही पाहिलं असेल की लहान बाळं ४ महिन्यांची झाल्यानंतर स्वतःच्याच भाषेत काही ना काही बोलण्याचा प्रयत्न करतात, जे तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करता. बाळं बोलायचा प्रयत्न करतात, कारण तीसुद्धा तुमचा आवाज ऐकू शकतात. पण इतक्यात बोलण्यासाठी ती पूर्णपणे सक्षम झालेली नसतात. अशात, तुम्ही बाळाची मदत करू शकता, एवढंच नाही तर आपल्या ६ महिन्यांपासून १ वर्षाएवढ्या बाळाला काही आवश्यक आणि प्राथमिक गोष्टी तुम्ही शिकवू शकता, या गोष्टी खालीलप्रमाणे आहेत-

बोलायला शिकवा

 

जेव्हा बाळं ४ पेक्षा जास्त महिन्यांची होतात तेव्हा ती मामा, पापा, बाबा सारखे शब्द उच्चारू लागतात. कारण हे शब्द उच्चारायला सहज व सोपे असतात. घरातल्या वडीलधाऱ्या मंडळींचं असं मानणं असतं, की जेवढं जास्त तुम्ही लहान बाळासोबत बोलत राहाल, तेवढंच लवकर ते बोलायला शिकेल. कारण जेव्हा तुम्ही बाळाशी बोलता, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हसून प्रतिसाद देण्यासोबतच बाळ काही ना काही आवाज देखील काढतं. अशात तुम्ही बाळाशी काही ना काही बोलत राहायला हवं.

आत्मनिर्भर बनवा

 

६ महिन्यांनंतर बाळाला आईच्या दुधाव्यतिरिक्त इतर खाद्य-पदार्थ देखील दिले जाऊ लागतात. अशा वेळी आई बाळाला बाटलीने दूध पाजणं पसंत करते, किंवा काहीजणी बाळाला चमच्याची सवय लावतात. ज्यावेळी तुम्ही बाळाला बाटलीने दूध पाजत असाल, तेव्हा असा प्रयत्न करा की बाळ स्वतः हातात बाटली घेऊन दूध पिईल. तसंच, तुम्ही ६ महिन्यांपेक्षा जास्त वयाच्या बाळाला वॉकरमध्ये किंवा खाली जमिनीवर ठेवून त्याच्यासमोर खाण्याची वस्तू ठेवलीत, तर बाळ स्वतःहून ते उचलून खाण्याचा प्रयत्न करेल. मग भलेही, बाळ, सुरुवातीच्या काही दिवसांत खाता खाता अन्न तोंडातून बाहेर फेकत फेकत खाईल. पण हळूहळू त्याची ही सवय देखील नाहीशी होईल.

अॅक्टिव्ह बनवा

तुम्ही पाहिलं असेल की लहान बाळांची श्रवणशक्ती फार तीक्ष्ण असते, बारीकसा आवाजदेखील त्यांना लगेच ऐकू येतो. अशा वेळी, जेव्हा बाळ ५ महिन्यांचं होईल तेव्हा त्याचं नाव तुम्ही घरातल्या वेगवेगळ्या ठिकाणांहून पुकारून पाहा. तुम्हाला असं दिसेल की ज्या दिशेने नाव पुकारलं जातं त्या दिशेकडे बाळाचं लक्ष जातं. याचा अर्थ असा, की बाळाला आपलं स्वतःचं नाव ओळखता येऊ लागलं आहे. अशात, तुम्ही बाळाचं नाव वरचेवर पुकारत राहा. यामुळे बाळाची बुद्धी तल्लख होईल.

खेळ खेळा

 

जेव्हा तुमचं बाळ ७ - ८ महिन्यांचं होईल तेव्हा त्याच्यासोबत बॉलने खेळू शकता आणि खेळताना बाळाला बॉल तुमच्याकडे ढकलायला/ भिरकावायला सांगा. तसंच या गोष्टीकडे लक्ष ठेवा की बाळाला बॉल सहजरीत्या पकडता येतो आहे की नाही, की त्याचं लक्ष आणखी कुठे आहे. यामुळे बाळाची एकाग्रता वाढेल आणि बाळ बरंच अॅक्टिव्ह होईल.

या सगळ्या व्यतिरिक्त, बाळाला आंघोळ घालताना देखील त्याच्याकडून काही आवश्यक हालचाल (उदाहरणार्थ पाण्याच्या टबमध्ये खेळणी टाकून वगैरे) नक्की करून घ्या.

 

Translated by Anyokti Wadekar

loader