ही ६ लक्षणं दिसताच आपल्याला किडनीचा आजार आहे हे त्वरित ओळखा

किडनीची समस्या कुठल्याही व्यक्तीला होऊ शकते पण जर ती योग्य वेळी ओळखली गेली नाही तर ती तुमच्या शरीरासाठी घातक ठरू शकते. असं असलं तरी थोडंसं लक्ष दिलं तर लोक किडनीच्या आजाराला लगेच ओळखू शकतात. खाली अशी काही लक्षणं सांगितली आहेत ज्यांच्याकडे लक्ष दिल्यास तुम्ही किडनीच्या समस्येला ओळखू शकता आणि लवकरात लवकर आपला इलाज करून घेऊ शकता.

किडनी खराब झाल्याची सुरुवातीची लक्षणं काय असतात?

किडनी खराब झाल्याची सुरुवातीची लक्षणं खालीलप्रमाणे आहेत, ती ध्यानात ठेवणं गरजेचं आहे-

लघवी संबंधी समस्या

किडनी खराब झाल्याचं सर्वात पहिलं लक्षण लघवी संबंधी समस्या हे आहे, ज्यामध्ये वारंवार लघवी होण्यापासून लघवीच्या दरम्यान वेदना आणि जळजळ यांसारख्या समस्या दिसून येतात. एवढंच नाही तर तुम्हाला किडनी संबंधित कोणतीही समस्या असेल तर तुमच्या लघवीमध्ये रक्त किंवा फेस दिसून येऊ शकतो. अशा वेळी अशी समस्या दिसून आल्यास लगेच डॉक्टरना संपर्क करा. कारण यामुळे पुढे त्रास होऊ शकतो.

त्वचा कोरडी होणं

जेव्हा एखाद्या व्यक्तीला किडनी संबंधित कुठली समस्या असते तेव्हा तुमची त्वचा नुसतीच कोरडी होत नाही तर त्वचेला खाज देखील सुटते. कारण किडन्यांचं मुख्य काम तुमच्या शरीरातून टाकाऊ पदार्थ आणि अतिरिक्त द्रव पदार्थ बाहेर टाकण्याचं असतं. त्यासोबतच तुमच्या शरीरात लाल रक्त पेशी निर्माण करण्यात देखील किडन्या मदत करतात. अशा वेळी जर किडन्या नीट काम करत नसतील तर या प्रकारच्या समस्या निर्माण होतात.

डोळ्यांच्या आसपास सूज

लघवीमध्ये प्रोटीनचं प्रमाण अस्तित्वात असणं हे एक सुरुवातीचं लक्षण मानलं जातं. ज्याचा सरळ अर्थ असा होतो की किडनी फिल्टर करण्याचं काम करण्यास सक्षम नाही. ज्यामुळे तुम्हाला वारंवार लघवीची समस्या उत्पन्न होते. अशा वेळी, डोळ्यांच्या आसपासची सूज हे दर्शवते की तुमच्या लघवीमध्ये प्रोटीनचं प्रमाण खूप जास्त आहे. म्हणून तुमच्या डोळ्यांच्या आसपास अशा प्रकारची कुठली समस्या दिसून आली तर तुमच्या लघवीतल्या प्रोटीनच्या प्रमाणाची टेस्ट करून घेऊ शकता.

शरीरावर सूज

किडनीचं काम तुमच्या शरीरातून वाईट आणि टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचं असतं. पण जेव्हा किडनी हे काम चांगल्या प्रकारे करत नाही तेव्हा तुम्हाला शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर सूज आलेली दिसून येते. किडनी योग्य प्रकारे काम करत नसल्याने तुमच्या शरीरातलं सोडियमचं प्रमाण वाढू शकतं ज्यामुळे तुमच्या पायांवर आणि खोटेच्या वरच्या बाजूस असणाऱ्या गाठींवर सूज येऊ शकते. याव्यतिरिक्त शरीराच्या खालच्या भागात सूज, हृदयरोग, यकृताचे आजार किंवा नसांच्या समस्या देखील होऊ शकतात.

कमी भूक लागणं

हे एक खूपच सामान्य लक्षण आहे कारण जेव्हा तुम्हाला किडनी संबंधित कुठलीही समस्या असते तेव्हा तुम्हाला भूक न लागण्याची समस्या होऊ शकते.

पूर्णवेळ थकवा जाणवणं

जेव्हा तुमच्या शरीरात किडनीची समस्या असते तेव्हा किडनी ‘एरिथ्रोपोईटीन’ नामक प्रोटीन बाहेर काढण्यात सक्षम नसते. त्यामुळे तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता उत्पन्न होऊ लागते आणि त्यामुळे हॉर्मोन्सची पातळी कमी होऊ लागते. कदाचित याच कारणामुळे शरीरात कमजोरीबरोबरच थकवा सुद्धा अनुभवास येतो.

किडनीच्या समस्येपासून वाचण्यासाठी कोणते उपाय आहेत?

खालील गोष्टी ध्यानात ठेवल्यास तुम्ही या समस्येपासून स्वतःला वाचवू शकता-

- दिवसभरात कमीत कमी ३ ते ४ लिटर पाणी प्यावं जेणेकरून किडनीमध्ये संक्रमण व्हायचा धोका राहणार नाही.

- धूम्रपान करू नका कारण जेव्हा तुम्ही धूम्रपान करता तेव्हा तुमच्या रक्तनलिकांमधला रक्तप्रवाह मंदावतो. त्यामुळे किडनीमध्ये कमी रक्त जातं आणि तिची कार्यक्षमता कमी होते. म्हणून धूम्रपान आणि तंबाखूचं सेवन चुकूनसुद्धा करू नका.

- खूप वेळपर्यंत लघवी रोखून ठेवू नका, कारण जेव्हा तुम्ही खूप वेळपर्यंत लघवी रोखून ठेवता तेव्हा तुमच्या किडनीवरचा दबाव वाढतो आणि त्यामुळे तुमची किडनी खराब होऊ शकते.  

- कुठल्याही प्रकारच्या औषधांचं सेवन खूप जास्त प्रमाणात करू नका, खासकरून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय. कारण पेनकिलर्सचा थेट तुमच्या किडनीवर प्रभाव पडतो.

सहसा किडनीच्या आजाराबद्दल खूप काळानंतर कळून येतं, म्हणून याला 'सायलेंट किलर' असं देखील म्हणतात. अशा वेळी, वर सांगितलेली लक्षणं ध्यानात ठेवून तुम्ही हा आजार सहजगत्या ओळखू शकता.

मॉर्डर्न मोना- मदर लाइफस्टाइल! हे एक दैनंदिन सदर आहे जिथे स्त्रियांसंबंधित पूर्ण माहिती दिली गेली आहे. जसं की- आरोग्य, फॅशन, फिटनेस, मुलांचं संगोपन, मनोरंजन, सेक्स इत्यादीच्या माहितीबद्दल तुम्ही तुमचे प्रश्न https://zenparent.in/community या ईमेल वर पाठवू शकता.

 

फीचर इमेज स्रोत: www.verywell.com

 

Translated by Anyokti Wadekar

loader