दुर्दैवाने, गरोदर स्त्रीकडे पाहण्याचा भारतीयांचा दृष्टिकोन असा आहे!

एखाद्याच्या शरीराच्या प्रकारावरून त्याची थट्टा/ अपमान करणं हे एरव्हीही होत असतं. हे तुमच्या बाबतीत घडण्यासाठी तुम्ही गरोदर असण्याची गरज नाही. खरंच सांगायचं झालं तर एखाद्याच्या शरीराच्या प्रकारावरून त्याची थट्टा किंवा अपमान करणं हे बऱ्याच भारतीयांचं विरंगुळ्याचं साधन असतं. एक आई आपल्या शरीरात एका बाळाला वाढवत असताना तिच्या शरीरावरून तिची थट्टा/ नालस्ती करण्याचा जणू आपल्याला हक्कच आहे, अशी या लोकांची वागणूक असते. काही लोकांना हे समजतच नाही की गरोदरपणात वजन वाढणं हे योग्यच आहे, किंबहुना हा एका स्त्रीच्या आयुष्यातला एकमेव असा काळ असतो जेव्हा किलोच्या किलोंनी वजन वाढणं हे रास्तच असतं. असं असलं तरी, संवेदनाशून्य अशा टीकेपासून आणि टोमण्यांपासून गरोदर स्त्रियांची सुटका नसतेच. भारतातील स्त्रियांना त्यांच्या शरीरावरून ह्या प्रकारे लज्जित किंवा अपमानित केलं जातं.

 

तुझं खूप लवकर खूप जास्त वजन वाढलंय

तू एखाद्या फुग्यासारखी फुगलीयेस हे म्हणायची ही एक सौम्य पद्धत आहे. मी जेव्हा दुसऱ्यांदा गरोदर होते तेव्हा माझ्या ऑफिसमधली एक ज्येष्ठ अधिकारी मला म्हणाली, 'माझं एवढं पोट मी सहा महिने गरोदर असताना वाढलं होतं. तुझं तीन महिन्यांतच खूप जास्त पोट वाढलंय.' मी फक्त माझी भुवई उंचावली आणि तिच्याकडे पाहत राहिले. मला तिच्या गरोदरपणाबद्दल काहीच खरंच जाणून घ्यायचं नव्हतं. पण आई होऊ घातलेल्या स्त्रियांच्या बाबतीत हे खूपदा होतं.

बाळंतपणानंतर तू हे वजन कसं काय घटवशील

ज्यांना खरोखरंच तुमच्याबद्दल आस्था असते ते लोक असं कधीच म्हणणार नाहीत आणि तुमच्या गर्भार शरीराबद्दल तुम्हाला वाईट वाटायला लावणार नाहीत. प्रामाणिक, अस्सल मित्रमैत्रिणी आणि हितचिंतक तुमचं वजन आरोग्यपूर्ण पद्धतीने वाढावं असं चिंततील आणि तुम्हाला तुमच्या आहार-व्यवस्थापनात आणि तुमचे डोहाळे पुरवण्यात मदतच करतील. होय, अजूनही तुमच्या अवतीभवतीचे काही लोक देवदूतासारखे तुमच्या मदतीला असतात. पण ज्यावेळी तुमचं सगळं लक्ष तुमच्या बाळाच्या पोषणाकडे आणि त्याच्या वाढीकडे असायला हवं, तेव्हा काही लोक तुमच्या बाळंतपणानंतर वजन कसं घटवायचं याबाबतीत तुम्हाला एकदम अस्वस्थ करून सोडतील. अशा प्रकारच्या टीका-टिप्पणीमुळे आई होऊ घातलेली ती स्त्री अस्वस्थ आणि तणावग्रस्त होते आणि तिच्या स्वतःच्या शरीराबद्दलच्या तिच्या भावना असुखकारक अशा होतात.

'आता तुला दोघांचं जेवण जेवायचंय' ही म्हण फारशी मनावर घेऊ नकोस

सर्व टोमण्यांमध्ये हा टोमणा फारच घणाघाती असतो. खरंतर, लोकहो, मी हे तुम्हाला सर्व आयांच्या वतीने सांगतेय की आम्हाला आधीच हे माहितेय की "दोघांसाठी जेवणं" ही एक कल्पित गोष्ट आहे आणि जरी आम्ही दोघांचं जेवण जबरदस्तीने गळ्याखाली उतरवायचा प्रयत्न केला तरी "दोघांचं जेवण जेवणं" निव्वळ अशक्य आहे. खरंतर गरोदरपणातला आहार म्हणजे एक अग्निपरीक्षाच असते. म्हणून जर तुम्ही एखाद्या होऊ घातलेल्या आईला ती तिच्या गरोदरपणाच्या महिन्याच्या मानाने स्थूल दिसते म्हणून फार न खाण्याचा सल्ला देत असाल, तर कृपया असं करू नका! याचा त्या स्त्रीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि ती तिची स्वतःची आणि बाळाची उपासमार करणं सुरु करू शकते.

तू पुरेसा व्यायाम करतेस का

ठीक आहे, ह्या कॉमेंटमागे तुमचा काही हितकारक विचार आहे यावर मी विश्वास ठेवेन. तुम्हाला कदाचित खरंच असं वाटत असेल की तिने व्यायाम करावा आणि निरोगी राहावं. पण हे सांगताना तुमच्या नजरेत असे भाव असतील - जे सांगतात की तुम्ही तिच्या आरोग्यापेक्षा तिच्या दिसण्याबाबत जास्त चिंतित आहात, तर मग तुमचा हेतू नक्की काय आहे हे उघडच आहे.

ज्यात फॅट्स कमी असतील असे अन्नपदार्थ तू खाल्ले पाहिजेस

जे लोक हा सल्ला देतात त्यातल्या बऱ्याच जणांना फॅट्सच्या कमीजास्त प्रमाणानुसार कोणते अन्नपदार्थ निवडायचे हे माहीत देखील नसतं, पण त्यांना ‘डाएट' बद्दल तुम्हाला सल्ले देण्याची ही खवखव येते, कारण या काळात तुमचे डाएटिशियन बनणं हा बरेच जण आपला हक्क मानतात. अर्थातच अशा बाष्फळ कॉमेंट्समुळे अन्नातल्या फॅट्सच्या प्रमाणाबद्दल, होणाऱ्या आईला चिंता वाटू लागते आणि बऱ्याचशा स्त्रिया त्यामुळे कठीण कवचाची फळं आणि बिया खाणं सुद्धा सोडून देतात. ज्यामध्ये खरंतर विद्राव्य प्रकारचे फॅट्स भरपूर प्रमाणात असतात आणि ते बाळासाठी चांगले असतात. गरोदर स्त्रीने तिच्या बाळाच्या भल्यासाठी समतोल असा आहार घ्यायला हवा.

तू सैल कपडे घातले पाहिजेस

जर शरीरावरून थेट थट्टा किंवा निंदा करता नाही आली तर मग असे लोक होऊ घातलेल्या आईच्या पेहरावावर टीकाटिप्पणी करतात. आणि त्यातलाच एक प्रकार म्हणजे तिला सैल कपडे घालायला सांगणं. हे कुणालाही कळत नाही की होऊ घातलेल्या आईला स्वतःच्या बदललेल्या शरीराशी जुळवून घेण्यासाठी वेळ लागतो आणि अशा कॉमेंट्समुळे ते काम आणखीनच कठीण होऊन बसतं.

 

फीचर इमेज स्रोत: thehealthsite.com

Translated by Anyokti Wadekar

loader