या कारणांमुळे बहुतेक बाळं रात्री वारंवार झोपेतून जागी होतात

रात्री नवजात बाळ झोपेतून वारंवार उठणं ही खूपच सर्वसाधारण गोष्ट आहे. काही बाळं तर अशी असतात, जी आपल्या मांडीवर असताना तर झोपतात पण बेडवर ठेवल्यावर मात्र लगेच उठतात. अशा वेळी काळजी न करता बाळाला रात्री कसं झोपवता येईल याकडे लक्ष द्यावं. सहसा बाळ रात्रीच्या वेळी जागं राहण्याची बरीच कारणं असू शकतात, उदाहरणार्थ, दिवसाच आपल्या वाट्याची झोप पूर्ण करणं, रात्री भूक लागणं, शारीरिक आणि मानसिक विकासामुळे किंवा मग बाळाला काही एक समस्या असल्यास सुद्धा बाळ रात्रीचं जागं राहातं. खाली काही गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत ज्या ध्यानात ठेवून तुम्ही तुमच्या बाळाची चांगल्या झोपेच्या बाबतीत मदत करू शकता. या गोष्टी खालील प्रमाणे आहेत-

बाळ रात्री जागं राहण्याची कारणं काय आहेत?

सहसा रात्री बाळं ज्या कारणांमुळे जागी राहतात, ती कारणं अशी आहेत-

बाळाची नॅपी ओली झाल्यामुळे

या वयात बाळं खूप वेळा शू करतात, ज्यामुळे त्यांची नॅपी ओली होते. आणि त्या ओलसरपणामुळे मग बाळांना झोप येत नाही. आणि मग ती रडायला सुरुवात करतात.

भूक लागल्यावर

नवजात बाळाला थोड्या मोठ्या बाळांच्या तुलनेत जास्त भूक लागते, अशात मग पूर्ण रात्रभरात बाळं कमीत कमी ५ ते ६ वेळा दूध पिण्यासाठी उठतात. पण या वयात बाळं फक्त तुमच्या दुधावर अवलंबून असतात, त्यामुळे या गोष्टीबद्दल फारशी काळजी करू नका.

काही त्रास होत असेल तर

या वयात बाळ आपली प्रत्येक गोष्ट तुम्हाला आपल्या रडण्याद्वारे सांगत असतं यात काहीच शंका नाही. अशा वेळी जर बाळांना काही त्रास होत असेल जसं की पोटदुखी, कान दुखणं, तर मग ती, ही गोष्ट तुम्हाला रडून सांगत असतात.

बाळाला रात्री झोपवण्यासाठी काय उपाय आहेत?

जेव्हा बाळ रात्री वारंवार उठतं, तेव्हा त्यामुळे मग तुमची झोपमोड होते आणि मग सकाळी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा तुम्हाला थकवा जाणवू लागतो. खाली काही टिप्स सांगितल्या आहेत ज्यांचा वापर करून तुम्ही हे टाळू शकता-

बाळाला भुकेलं असताना झोपवू नका

जेव्हा तुमचं नवजात बाळ एक महिन्याचं किंवा त्याहून लहान असतं, तेव्हा ते २४ तासांपैकी १० ते १८ तास झोपून असतं. बाळाचं झोपेचं आणि झोपेतून उठण्याचं चक्र हे त्याच्या गरजांनुसार देखील चालत असतं. बाळाचं पोट इतकं लहान असतं की त्याने प्यायलेलं आईचं दूध पटकन पचून जातं. त्यामुळे मग लगेचच बाळाला भूक लागते, त्यामुळे मग भूक लागल्याने बाळ झोपेतून उठतं. अशा वेळी बाळाला भुकेलं राहू देऊ नका आणि जेवढ्या लवकर तुम्ही त्याला दूध पाजाल तेवढ्या लवकर ते झोपेल.

बाळाला झोपवण्याआधी मालिश करा

बाळाची दिवसातून साधारणतः ५ ते ६ वेळा मालिश केली जाते. यामुळे फक्त बाळाच्या हाडांचा विकास होतो असं नाही तर बाळाला झोपही चांगली लागते. म्हणून रात्री झोपवण्याआधी बाळाला तेलाने एकदा मालिश जरूर करा ज्यामुळे त्याला चांगली झोप येईल.

ओली नॅपी बदला

रात्रीच्या वेळी बाळाला जाग येण्याचं एक कारण हेही आहे की ते शू केल्यावर त्या ओलाव्यातच पडून राहतं आणि मग त्यामुळे त्याला झोप लागत नाही. म्हणून मध्येच उठून बाळाची नॅपी बदला, ज्यामुळे बाळाला उबदार वाटेल आणि ते आरामात झोपेल.

बाळाला मांडीवर घ्या

जेव्हा बाळ रात्री जागं असेल आणि त्याला झोप येत नसेल तेव्हा त्याला मांडीवर घ्या आणि अंगाईगीत गा, त्याला प्रेमाने गोंजारा. यामुळे बाळाला जाणवेल की आपण आपल्या आईच्या जवळ आहोत आणि मग ते झोपी जाईल.

संध्याकाळच्या वेळी झोपू देऊ नका

जेव्हा बाळ थोडं मोठं होईल तेव्हा असा प्रयत्न करा की ते संध्याकाळच्या वेळी झोपणार नाही. कारण बाळ संध्याकाळी झोपलं तर मग त्याला रात्री झोप येणार नाही. सहसा बाळांना संध्याकाळच्या वेळी झोपायला आवडतं, पण या वेळी त्यांना झोपू देऊ नका. त्यासाठी तुम्ही त्याचं लक्ष विचलित करू शकता, आजूबाजूला फिरवू शकता.

या सगळ्या व्यतिरिक्त, काही बाळं अशी देखील असतात ज्यांना रात्री झोप येत नाही, मग ती निमूटपणे आपल्या हातापायांची हालचाल करत खेळू लागतात. आणि मग जेव्हा झोप येईल तेव्हा दमून झोपी जातात. अशा वेळी बाळ जर निमूटपणे खेळत असेल तर त्याला खेळू द्यावं.

 

Translated by Anyokti Wadekar

loader