बाळांना सुरुवातीच्या दिवसांत होणारे ७ आजार, चुकूनसुद्धा दुर्लक्षित करू नका!

जन्मानंतर बाळांमध्ये दर काही दिवसांनी काही ना काही समस्या उत्पन्न होऊ लागते, जी एक खूप सर्वसामान्य गोष्ट आहे. परंतु, याप्रकारच्या समस्या लहान बाळांमध्ये याकरता उत्पन्न होतात कारण या काळात त्यांची रोगप्रतिकारशक्ती बरीच कमजोर असते. त्यामुळे बाळं लगेच एखाद्या आजाराच्या किंवा संक्रमणाच्या विळख्यात येतात. खासकरून, थंडीच्या मोसमात बाळं सर्वात जास्त आजारी पडतात. म्हणून आज बाळांना होणाऱ्या सर्वात सर्वसाधारण अशा आजारांबद्दल खाली सांगितलं गेलं आहे, हे आजार तुम्ही ध्यानात ठेवले पाहिजेत-

कावीळ

हा नवजात बाळाला जन्मानंतर लगेच होणारा सर्वात सर्वसामान्य असा आजार आहे, त्यामुळे त्यात घाबरण्यासारखं काही नाही. कुठल्याही निरोगी नवजात बाळामध्ये कावीळ तेव्हा उत्पन्न होते जेव्हा त्याच्या रक्तात 'बिलिरुबिन'चं प्रमाण अतिरिक्त होऊन वाढतं. सर्वसाधारणतः, 'बिलिरुबिन' हे एक रसायन असतं जे शरीरामध्ये लाल रक्तपेशींच्या सामान्यरीत्या तुटण्याने बनतं. म्हणून नवजात बाळांमध्ये बिलिरुबिनची पातळी जास्त असते कारण त्यांच्या शरीरात ऑक्सिजनचं वहन करणाऱ्या अतिरिक्त लाल रक्तपेशी असतात. नवजात बाळाचं यकृत अजून पूर्ण तऱ्हेने परिपक्व झालेलं नसतं त्यामुळे ते अतिरिक्त बिलिरुबिनचा अपचय करू शकत नाही. परंतु, डॉक्टरच्या देखरेखीखाली हा आजार आठवड्याभरात बरा होतो.

न्यूमोनिया

हे देखील बाळांमध्ये होणारं एक सर्वसामान्य संक्रमण आहे जे फुफ्फुसांमध्ये होणाऱ्या इन्फेक्शनमुळे उत्पन्न होतं. या आजारामुळे फुफ्फुसांमध्ये सूज येते आणि त्यात द्रवपदार्थ भरून येतो, ज्यामुळे नुसताच खोकला येत नाही तर श्वास घ्यायलासुद्धा त्रास होतो. बाळांमध्ये ही समस्या साधारणतः थंडीच्या दिवसांत होते. म्हणून, आपल्या बाळामध्ये दिसणाऱ्या लक्षणांवर सतत लक्ष ठेवून राहा जेणेकरून आजार जास्त वाढू नये. तसंच जर तुमच्या बाळाला स्तनपान करताना किंवा श्वास घेताना त्रास होत असेल तर त्वरित डॉक्टरला संपर्क करा.

व्हायरल इन्फेक्शन

लहान बाळांची रोगप्रतिकारशक्ती इतकी कमजोर असते की ती व्हायरल ताप किंवा फ्लूच्या विळख्यात लगेच येतात. सर्वसाधारणतः, काही विषाणू तुमच्या बाळाला आजारी पाडू शकतात. हे विषाणू संक्रमित व्यक्तीच्या खोकण्याने किंवा शिंकण्याने पसरतात. म्हणून, घरात कुठल्याही व्यक्तीला अशा प्रकारचं संक्रमण झालं असेल तर त्या व्यक्तीला बाळापासून दूर राहायला सांगा. तसंच बाळाला लवकरात लवकर डॉक्टरकडे घेऊन जा. जर तुमच्या बाळाचं वय सहा महिने ते दोन वर्षांच्या मध्ये असेल तर त्याचं फ्लू पासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही त्याला वर्षातून एकदा लस टोचून घेऊ शकता.

जुलाब

बाळांना जुलाब झाला नाही, असं होऊच शकत नाही कारण बाळं सर्वाधिक बळी याच आजाराला पडतात. याचं सर्वसाधारण कारण एक विषाणू आहे, ज्याचं नाव आहे रोटाव्हायरस. हा विषाणू आतड्यांना संक्रमित करतो, ज्यामुळे 'गॅस्ट्रोएंटेराइटिस' होतो. यामुळे आतड्यांच्या आतल्या थराला हानी पोहोचते. म्हणून बाळाच्या शरीरात पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन) होऊ देऊ नका. जर तुमचं बाळ योग्य प्रमाणात स्तनपान करत असेल किंवा फॉर्म्यूल्याचं दूध पीत असेल, तर ते त्याला वेळोवेळी देत राहा, बंद करू नका.

पोलिओ

आजच्या काळात पोलिओच्या जास्त केसेस पाहायला मिळत नाहीत कारण सरकारने हा आजार बऱ्याच अंशी आटोक्यात आणला आहे. नाहीतर हा आजार बाळाच्या मेंदूवर आणि मेरुदंडावर हल्ला करायचा आणि त्यांच्यात लकव्याची कारणं उत्पन्न करायचा. हा आजार कुठल्याही संक्रमित व्यक्तीच्या विष्ठा, कफ किंवा थुंकी यांच्याशी संपर्कात आल्यास फैलावू शकतो. तुमच्या बाळाला मौखिक पोलिओ लस (ओ.पी.व्ही.) आणि इंजेक्शनद्वारे द्यायची पोलिओ लस (आय.पी.व्ही.) दोन्ही संयुक्त स्वरूपात दिल्या जाऊ शकतात. म्हणून, आपल्या बाळाला पोलिओची लस द्यायला विसरू नका.

गोवर

हा एक अत्यधिक संसर्गजन्य रोग आहे आणि हा संक्रमित व्यक्तीच्या शिंकण्याने किंवा खोकण्याने फैलावतो. याची सुरुवात सर्दी आणि तापाने होते. दोन दिवसांनी गजकर्ण झालेला दिसून येतो. गोवर या रोगामुळे श्वासनलिकादाह (ब्रोंकायटिस), फुफ्फुसांचं इन्फेक्शन (ब्रोन्कियोलायटिस), कानाचं इन्फेक्शन आणि बाळांना घशाचा रोग (क्रूप) देखील होऊ शकतो.

चिकनपॉक्स

याला 'कांजिण्या’ असंही म्हणतात, हा आजार बाळांमध्ये खूप जास्त दिसून येतो. यामध्ये खूप खाज येणाऱ्या पुळ्या, फोड आणि हलकासा फ्लू अशी लक्षणं असतात. जर तुमच्या बाळाला आधी एक वेळा कांजिण्या झाल्या असतील तर भविष्यात त्या पुन्हा होण्याची शक्यता खूप कमी असते.

या सर्वांव्यतिरिक्त बाळांमध्ये पोटदुखी, कानात इन्फेक्शन, उलटी या सर्व समस्या होत असतात, ज्या बाळ मोठं झाल्यावर आपोआप थांबतात. कारण बाळं जसजशी मोठी होत जातात तसतशी त्यांची रोगप्रतिकारशक्ती बळकट होऊ लागते.

 

Translated by Anyokti Wadekar

loader