बाळाशी कसं खेळावं? तुमचं बाळ कमी रडावं आणि जास्त हसावं याकरिता नवीन मार्गदर्शन

तुम्ही बाळाला भरवलयत आणि त्याचे कपडे बदललेत. बाळाला चांगला आरामही मिळालाय. तरीसुद्धा तो/ ती रडतेय. हे असं नाटक तुमच्या घरात रोज घडतंय का? तर मग कदाचित अशी शक्यता आहे की तुमच्या बाळाच्या बुद्धीला पुरेशी चालना मिळत नाहीये. अशा चालनेच्या अभावामुळे तुमचं बाळ नुसतंच कंटाळून जात नाही तर त्याचा पूर्णपणे विकास देखील होत नाही. म्हणून, नवजात ते ३ महिने, ३ ते ६ महिने, ६ ते ९ महिने आणि ९ ते १२ महिने अशा वयाच्या बाळांच्या आयांसाठी हा लेख वाचणं महत्वाचं आहे. आयांनो, वाचा तर मग! 

इथून निवडले आहे: स्मार्ट पेरेंटिंग 

0 ते ३ महिने 

सुरुवातीच्या काही महिन्यांत तुमचं बाळ बहुतांश वेळ झोपून राहत असलं तरी जेव्हा ते जागं असतं त्या वेळेचा तुम्ही फायदा घेऊ शकता - आणि तो तसा घेतला पाहिजे.  

१. गाणे गा आणि बाळाला झुलवा 

बाळाला झुलवून त्याच्या तोल सांभाळण्याच्या क्षमतेला चालना द्या आणि गाण्याद्वारे त्याला जास्तीत जास्त नवीन शब्द शिकवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला माहीत असलेल्या सोप्या बालगीतापासून सुरुवात करा - "ट्विन्कल ट्विन्कल लिटल स्टार" चालेल - आणि बाळाची मान आणि पाठ यांना नीट आधार देत त्याला संगीताच्या तालावर एका बाजूकडून दुसऱ्या बाजूस असं हळूहळू झुलवा. एकदा का तुम्हाला हे नीट जमलं की मग बालगीतामध्ये बाळाच्या नावाचाही समावेश करा!

२. राउंड अँड राउंड द हेस्टॅक 

आंघोळीनंतर किंवा डायपर बदलत असताना जेव्हा तुमचं बाळ पाठीवर पहुडलेलं असेल तेव्हा तुमचा अंगठा गुडघ्याखाली ठेवून बाळाच्या मांड्या पकडा. आणि मग "राउंड अँड राउंड द हेस्टॅक, गोज द लिट्ल माऊस. वन स्टेप, टू स्टेप्स, इन हिज लिट्ल हाऊस!" हे बालगीत म्हणत असतानाच त्याचे पाय हळूहळू फिरवा.  पुन्हा बालगीत म्हणा आणि मग बाळाचे कुल्ले उलट्या दिशेला फिरवा. यामुळे तुमच्या बाळाचे पाय बळकट होतील आणि पुन्हापुन्हा गायल्यामुळे ते बालगीत लवकरच बाळाच्या ओळखीचं होऊन जाईल. 

३. किणकिण वाजणारी घंटा 

किणकिण असा आवाज करणारी लहानशी घंटा बाळाच्या जवळ वाजवून त्याच्या श्रवण क्षमतेचा विकास करा. बाळाला घंटा कुठे आहे ते दाखवू नका आणि आवाज कुठून येतोय हे शोधण्यासाठी त्याला आजूबाजूला पाहू द्या. बाळाच्या उजव्या कानाजवळ, डाव्या कानाजवळ आणि बाळ जर पाठीवर झोपलं असेल तर त्याच्या डोक्याच्या वर अशा प्रकारे घंटा वाजवा. 

३ ते ६ महिने 

आता खरी गमतीला सुरुवात! बराच कालावधी फक्त झोपून राहिल्यावर आता बाळ जास्त वेळ जागं राहू लागतं आणि तुम्हाला पाहिल्यावर स्मितहास्य करून आणि अस्पष्ट पण गोड असे आवाज करून तुमच्या हृदयाला पाझर फोडतं. अशा वेळी ज्यामध्ये देवाणघेवाण असेल आणि मिळून मिसळून राहण्याची शिकवण असेल असे खेळ बाळाबरोबर खेळले पाहिजेत. 

४. बोलक्या बाहुल्यांचा खेळ 

लहान कापडी खेळण्यातले प्राणी वापरून तुम्ही तुमच्या बाळाला "ओल्ड मॅक्डोनाल्ड हॅड अ फार्म" हे बालगीत म्हणून दाखवू शकता. गायीचा आणि डुकराचा हुबेहूब आवाज काढा आणि त्यासोबतच ती ती बाहुली बाळाला नाचवून, डोलवून दाखवा. 

५. चला बोलूया 

छोटी बाळं जेव्हा बोलायचा प्रयत्न करतात तेव्हा ते पाहणं मजेदार असतं. तुमचं बाळ जे काही अस्पष्ट आवाज करत असेल त्यांचं अनुकरण करून त्याला प्रोत्साहन द्या आणि त्याला प्रश्न विचारा. "काय झालं?" आणि "तू बाबांबरोबर कुठे गेला होतास?" यासारखे सोपे प्रश्न विचारलेत की मग बाळ त्याच्या गोड, बोबड्या बोलांनिशी भडाभडा बोलू लागेल आणि त्याचा व्हिडिओ काढायला तुम्हाला फार मजा वाटेल. 

६. हातांनी बनलेला कोळी 

तुमच्या बाळाचं कुठल्याही गोष्टीचा नजरेने वेध घ्यायचं कौशल्य सुधारण्यासाठी तुम्हाला महागड्या मोबाईल फोन्स ची गरज नाही. फक्त तुमचा हात तुमच्या बाळाच्या चेहऱ्यावर धरा आणि तुमची बोटं सर्व दिशांना हलवू लागा. तुम्ही तुमचे हात सरपटवू शकता, बोटं उडवत बाळाच्या पोटावर चालवू शकता ज्याने त्याला हळुवार अशी गुदगुली होईल. आणखी गंमत आणण्यासाठी हातांच्या सावल्या बनवा आणि हातांच्या सावल्यांचे जे वेगवेगळे आकार बनतील त्याकडे बाळ कसं आश्चर्याने पाहू लागतं ते बघा. 

६ ते ९ महिने 

तुमचं ६ ते ९ महिन्यांचं बाळ आता लोकांमध्ये जास्त मिळूमिसळू लागतं. त्याला जी माणसं आवडतात त्यांच्यासोबत राहायला बाळाला आवडू लागतं. त्याला आजूबाजूच्या परिसराचं भान येतं आणि त्याला आजूबाजूच्या गोष्टींचं निरीक्षण करायला आवडतं. आता बाळ जास्त सक्रिय झाल्यामुळे बाळाला चैतन्यपूर्ण असे खेळ जास्त आवडू लागतील. 

७. नावाचा जयघोष करणं 

बाळ बसलेलं असताना त्याचं नाव पुकारा आणि बाळाचे दोन्ही हात वर करत त्याच्या नावाचा जयघोष करा. तुमच्या थोड्या मोठ्या मुलालाही हा खेळ आवडेल. बाळाचं नाव मोठमोठ्याने म्हणत जणू काही दंगाच माजवून द्या!

८. "पीक-अ-बू" ह्या खेळाचे भिन्नभिन्न प्रकार 

जाॅं पिअजे या चिकित्सक मानसशास्त्रज्ञाच्या मते बाळांना वस्तूंचं 'चिरस्थायित्व' - आपण वस्तू पाहू शकत नसलो तरी त्यांचं अस्तित्व कायम असतं - हे कळून येणं, हे साधारणतः आठव्या महिन्यात घडून येतं. नेहमीच्या "पीक-अ-बू" ह्या खेळाव्यतिरिक्त (ज्यामध्ये लपणं आणि मग अचानक अवतरित होणं ह्याचा समावेश होतो) त्या खेळाचे आणखीही काही प्रकार तयार करा. एखादा पातळ, पारदर्शक स्कार्फ डोक्याला गुंडाळा आणि तुमच्या बाळाला तो ओढायला शिकवा. तुम्ही एखादं खेळणं लॅम्पशेड खाली लपवून ठेवा आणि असं करत असताना बाळाचं तुमच्याकडे लक्ष असेल असं पाहा आणि मग नंतर बाळाला ते खेळणं शोधायला सांगा. 

९. रो रो रो युअर बोट!

जर तुमचं बाळ स्वतःहून बसू लागलं असेल तर तुम्ही तुमचे पाय पसरून बसा आणि बाळाला पायांच्या मध्ये तुमच्याकडे तोंड करून बसवा. बाळाचे दोन्ही हात पकडून, एकत्र पुढे आणि मागे झुकत असतानाच "रो रो रो युअर बोट" हे गाणं गा. यामुळे बाळाच्या पाठीचे स्नायू मजबूत होतील आणि सोंग घ्यायची कलाही बाळ शिकेल. 

९ ते १२ महिने 

१०. लपाछुपी पण रांगत 

या वयात तुमचं बाळ लपाछुपी फक्त रांगत रांगत खेळू शकतं. पलंगाच्या किंवा खुर्चीच्या मागे लपा आणि तुमच्या बाळाचं नाव पुकारा. तुमच्या बाळाला तुम्हाला शोधू द्या आणि ते तुमच्या जवळ आलं की त्याला चकित करा. हे आळीपाळीने  करा! 

११. रोल दॅट बॉल 

अर्भकावस्थेपासून चालू लागेपर्यंत तुमचं बाळ ज्याच्याशी खेळतं तो बॉल म्हणजे एक खूप छान खेळणं आहे. तुमच्या बाळाबरोबर जमिनीवर बसा आणि बॉलला धक्का मारल्यावर तो कसा गडगडत जातो ते बाळाला दाखवा. तुम्ही बाळाला उभं करून बॉलला लाथ मारायला देखील शिकवू शकता. हा एक खूप छान खेळ आहे आणि बाळाला तो पुन्हापुन्हा खेळावासा वाटेल.  

१२. मोज्यांचा बास्केटबॉल 

तुमच्या बाळाचा हात आणि डोळ्यांचा समन्वय अधिक चांगला करण्यासाठी काही स्वच्छ मोजे गुंडाळून त्याचे बॉल बनवा आणि एक लॉंड्री बास्केट घ्या. मग हा "बॉल" बास्केट मध्ये कसा फेकायचा हे बाळाला दाखवा. बाळ नुकतंच चालू लागलं असेल तर त्याच्यासाठी हा खूपच छान खेळ आहे. पण जर बाळ अजून चालू लागलं नसेल तर मग त्याला उभं करून पकडा आणि मग तो मोज्यांचा बॉल बास्केट मध्ये फेकायला शिकवा. 

Translate by Anyokti Wadekar

loader