बाळाची मालिश कशी करावी व आंघोळ कशी घालावी…परंपरागत भारतीय पद्धतीने

नवजात बाळाची पहिली आंघोळ हा भारतीय घरांमधला एक अतिशय महत्त्वाचा आणि आनंदी सोहळा असतो, असा सोहळा जो परंपरागत प्रथा आणि अंधश्रद्धांनी (जरुरी नाही की त्या नेहमी वाईटच असतील) भिजलेला असतो. त्यामध्ये मालिशवाल्या बाईने केलेली, आपल्याला घाबरवणारी पण दमदार मालिश असते - या मालिशवाल्या बाया जुन्या काळापासून चालत आलेल्या, खास बाळांसाठी असलेल्या मालिशच्या विधीमध्ये निष्णात असतात - त्यानंतर गरम पाण्याने आंघोळ आणि मग बाळाच्या डोळ्यांत काजळ घालणं आणि धुपाच्या द्वारे थोडी अरोमाथेरपी, यासारखे इतर रिवाज असतात.

जर आई होण्याची ही तुमची पहिलीच वेळ असेल, तर तुम्हाला माहीत असेल की डॉक्टर आणि घरातली मंडळी बाळाच्या जन्मानंतर एक महिन्यासाठी साबणाचा वापर न करण्याचा सल्ला देतात. बऱ्याच भारतीय घरांमध्ये बाळ एक वर्षभराचं होईपर्यंत तरी साबणाचा वापर करत नाहीत. तर मग ते बाळाला आंघोळ कशी घालतात? तुमच्या बाळाला नैसर्गिक पद्धतीची आणि सुखदायक आंघोळ घालण्याकरता तुम्ही हे काही पारंपरिक भारतीय घटकपदार्थ वापरू शकता.

मालिश साठी:

  • लसणीच्या पाकळ्या आणि मेथीचे दाणे घालून गरम केलेल्या राईच्या तेलाचा छान प्रभाव पडतो कारण लसणीमध्ये अँटी-बॅक्टीरियल गुणधर्म असतात आणि मेथीच्या दाण्यांमुळे शरीराला आराम पडतो. काही घरांमध्ये ओवा घालून गरम केलेलं राईचं तेल वापरतात, ज्यामुळे बाळाच्या पोटातल्या तीव्र कळा थांबतात असं म्हणतात.

  • तेलामध्ये मलई, बेसन आणि हळद मिसळून त्याचा लेप बनवा आणि त्याने बाळाची मालिश करा. बरेच जण असं मानतात की बेसनाच्या टेक्श्चर मुळे तुमच्या नवजात बाळाच्या अंगावरचे केस निघतात, आणि त्याच्या त्वचेवर तेज येतं. पण बनवलेला लेप गुळगुळीत असल्याची खात्री करून घ्या नाहीतर बेसनामुळे तुमच्या बाळाच्या त्वचेवर ओरखडे उमटू शकतात.

  • नारळाच्या दुधापासून देखील तुम्ही मालिशचं तेल बनवू शकता. चांगल्या नारळाचं खोबरं किसून त्याचं दूध काढून घ्या आणि मंद आंचेवर ते उकळत ठेवा म्हणजे त्यापासून तेल निघेल. या प्रक्रियेत फक्त एकच अडचण आहे ती म्हणजे त्याला खूप वेळ लागतो (आणि खूप नारळही लागतात).

हे वापरू नका:

  • कॅममाइल किंवा टी-ट्री सारखी इसेन्शल ऑइल्स, कारण ती खूप उग्र आणि तीव्र स्वरूपाची असतात.

  • जर तुमच्या बाळाची त्वचा संवेदनशील असेल आणि त्याला कुठे खरचटलं असेल तर राईचं तेल, ऑलिव्ह ऑइल किंवा तूप.  

बाळाला आंघोळ घालण्यासाठी तुम्ही ह्या गोष्टी वापरू शकता:

  • अाख्ख्या मूगडाळीची पावडर आणि दूध ह्यांचं मिश्रण

  • रीठा आणि आवळ्यापासून बनवलेला घरगुती शॅम्पू

  • फणसाच्या झाडाची काही पानं पाण्यात उकळवा, रात्रभर तशीच ठेवा आणि दुसऱ्या दिवशी बाळाच्या आंघोळीसाठी वापरा. फणसामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नीजियम असतं जे शरीरात कॅल्शिअम नीट शोषलं जावं ह्यासाठी आवश्यक असतं.

  • डायपर मुळे बाळाच्या त्वचेवर पुरळ उठलं असेल तर मुलतानी माती आणि दुधाच्या मिश्रणापासून बनवलेल्या लेपाने चांगला फरक पडतो.

  • मसूरडाळीची पावडर बनवा आणि त्यात पाणी किंवा दूध घालून बनवलेला लेप बाळाला आंघोळ घालताना लावा.

डिस्क्लेमर: तुमच्या बाळाच्या त्वचेवर कुठलाही नवीन पदार्थ, मग तो नैसर्गिक असला तरी, लावून बघण्याआधी नेहमीच तुमच्या बालरोगतज्ञाचा सल्ला घ्या. बाळाला कशाचीही अॅलर्जी आहे, असं आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Translated by Anyokti Wadekar

loader