माझं मूल एक वर्षाचं व्हायच्या आत शी केव्हा, कुठे, कशी करावी हे मी त्याला कसं शिकवलं

पालकत्वाच्या बाबतीत कुठल्याही एका गोष्टीचा जर मला गर्व आहे तर तो ह्या गोष्टीचा की मी माझ्या मुलाला तो एक वर्षाचा होण्याआधीच शी कुठे, कशी, केव्हा करावी हे शिकवलं. जेव्हा मी माझ्या मित्रमैत्रिणींना त्यांच्या दोन किंवा त्याहून जास्त वर्षांच्या मुलांना शी करायला शिकवण्याची धडपड करताना पाहते तेव्हा आधी मला थोडी फुशारकी वाटते पण मग मी त्यांच्या मदतीला धावून जाते. 

पण त्याआधी मला हे सांगून टाकलं पाहिजे की जिथे लहान मुलांचा प्रश्न येतो तिथे पारंपरिक पद्धतींवर आणि प्रथांवर माझा खूप विश्वास आहे. मला दहा वर्षांचं एक आणि चार वर्षांची दोन, अशी तीन मुलं आहेत. माझे पुष्कळसे मित्रमैत्रिणी मुलांना वाढवताना एखाद्या पुस्तकाचा आधार किंवा डॉक्टरचा सल्ला घेत असले तरी मला माझ्या आईचा आणि आजीचा सल्ला घ्यायला आवडतं. त्यांचा सल्ला आतापर्यंत एकदाही चुकीचा ठरलेला नाही: माझ्या मुलांची रोगप्रतिकारशक्ती खूप चांगली आहे, ती काहीही त्रास न देता जेवतात, ती क्रियाशील आहेत आणि जे काही करतात ते मग्न होऊन करतात आणि माझ्या सगळ्या मुलांना शी कशी, कुठे, केव्हा करावी हे ती एक वर्षाची किंवा जास्तीत जास्त एक वर्ष दोन महिन्यांची होण्याच्या आधीच शिकवलं गेलं होतं. 

मी जे काही बोलतेय त्यापैकी काही तुम्हाला विनोदी किंवा थोडं "सवंग" ही वाटेल पण मुलाला शी कुठे, केव्हा, कशी करावी हे खूप आधी शिकवल्याने गोष्टी खूप सोप्या बनून जातात, ह्या माझ्या सांगण्यावर विश्वास ठेवा. तुमचं कपडे धुण्याच्या कामाचं ओझं खूप कमी होतं, तुमचा रि-युझेबल आणि डिस्पोझेबल डायपर्स वरचा खर्च कमी होतो, तुमच्या चादरी स्वच्छ राहतात आणि बाळाच्या अंगावर क्वचितच डायपर्समुळे चट्टे/ पुरळ उठतं. तर मग, मी ह्या काही गोष्टी केल्या. 

पण त्याआधी, महत्वाचं म्हणजे तुम्ही हे काम अंगावर घेण्याआधी तुम्हाला काही गोष्टी ध्यानात ठेवायला हव्या. एक वर्षापेक्षा लहान मुलाला शी केव्हा, कुठे, कशी करावी हे शिकवायला वेळ लागतो पण एकदा का मूल शिकलं की मग ते कायमचं शिकतं. हे काम समर्पित वृत्तीने आणि सातत्याने करावं लागतं: थकवा किंवा आळस ह्या कामाच्या आड येता कामा नये. मग तयार आहात? 

ही पद्धत सहा महिन्यांच्या वरील मुलांसाठी किंवा मूल स्वतःहून बसू लागल्यावर वापरणं उत्तम ठरेल. मी असं म्हणतेय कारण मुलं कोणत्या वयात कोणता टप्पा गाठतात हे प्रत्येक मुलासाठी वेगळं असतं आणि त्यांना बरेच टप्पे गाठायचे असतात. उदाहरणार्थ, माझा मुलगा पाच महिन्यांचा असताना बसू लागला तर माझ्या मुली सातव्या महिन्यात बसायला शिकल्या. तर मग, पहिली गोष्ट म्हणजे तुमचं मूल बसू लागलं की ते किती वेळा शू आणि शी करतं ह्याचं निरीक्षण केलं पाहिजे. तुम्ही काळजीपूर्वक निरीक्षण केलंत की तुमच्या लक्षात येईल की बाळाच्या दोन "शू" मध्ये जवळजवळ सारखंच अंतर आहे - प्रत्येक दोन तासांनी किंवा प्रत्येक तीन तासांनी, किंवा त्यापेक्षा कमी किंवा जास्त वेळाने. 

एकदा का तुम्हाला कळलं की किती वेळा मूल शू किंवा शी करतं, की मग तुम्ही कामाला लागा. समजा मुलाने सकाळी सात वाजता शू केली. त्याचं डायपर बदला आणि पुढच्या शू साठी अलार्म किंवा रिमाइंडर लावा. नऊ वाजता बाळाला बाथरूम मध्ये घेऊन जा, त्याला टॉयलेट सीटवर बसवा, घट्ट धरून ठेवा आणि वॉश बेसिनचा किंवा ज्याने आंघोळ करता तो नळ उघडा आणि त्यातून पाणी वाहू द्या. वाहत्या पाण्याच्या आवाजाने शू करण्यासाठी उदयुक्त व्हायला होतं हे प्रौढ आणि लहान मुलं ह्या दोघांच्याही बाबतीत खरं आहे. कदाचित त्यावर संशोधन होऊन ते सिद्ध झालं नसेल पण मी प्रत्येक वेळी तसं होताना पाहिलं आहे. एखाद्या सार्वजनिक ठिकाणी असताना मला खूप तातडीने लघवीला जायचं असतं आणि जवळच्या कारंजाच्या आवाजामुळे लघवी रोखणं आणखी कठीण होऊन बसतं.

थोडा वेळ थांबा आणि तुम्ही पाहाल की तुमच्या लहानगीला अंदाज येईल आणि ती शू करून टाकेल. मुलग्याच्या बाबतीत आम्हाला असं आढळलं की त्याला टॉयलेट सीट वर बसवून शू येत नाही, म्हणून मग आम्ही त्याला उभं करून तो योग्य ठिकाणी शू सोडेल असं पाहायचो. ही पद्धत सुद्धा कामी नाही आली तर आम्ही त्याला पकडून बाथरूमच्या कोपऱ्यात ड्रेन होल वर शू करायला लावायचो. त्यानंतर मग ती जागा पाणी ओतून धुवून टाकायचो. 

अगदी असंच बाळाला शी करवतानाही करा, पण काही महिन्यांनी, बाळाचं शू च्या बाबतीतलं ट्रेनिंग स्थिरावलं आणि तुम्ही बाथरूम मध्ये घेऊन गेल्यावर वाहत्या पाण्याचा आवाज करावा न लागता बाळ प्रतिसाद देऊ लागलं, की मग हे करा. बाळ काय खातं आणि केव्हा खातं याचं निरीक्षण करा; काही अन्नपदार्थांचा इतर अन्नपदार्थांपेक्षा रेचकासारखा जास्त परिणाम होतो. उदाहरणार्थ, मला असं आढळलं की पॅकेज्ड बेबी फूड पचायला जास्त वेळ लागतो, तर घरी बनवलेलं अन्न पटकन आणि सहज पचतं. सहाव्या किंवा सातव्या महिन्यापर्यंत बाळ दिवसातून दोन किंवा तीन वेळा किंवा त्याहून कमी शी करतं. बाळाला ट्रेनिंग देण्याआधी त्याचं निरीक्षण करा आणि मग वाहत्या पाण्याच्या आवाजाचा भाग सोडून, वर सांगितलेली पद्धत अमलात आणा. ही बाळाला शी करायला शिकवायची सर्वसाधारण पद्धत आहे.  

तुमचं हे ट्रेनिंग यशस्वी व्हावं म्हणून एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं करत असताना तुम्ही तुमच्या बाळाशी बोलत राहा. प्रत्येक वेळी तुम्ही जेव्हा बाळाशी बोलाल तेव्हा शी आणि शू साठी तेच नाव वापरा जे तुम्ही आधी वापरलं होतं. मूल एकदा का बोलू लागलं म्हणजे साधारण ९ किंवा १० महिन्यांचं झालं की पहिले काही महिने ते तुमच्या ट्रेनिंगला प्रतिसाद देऊ लागेल. "बोलू लागलं" म्हणजे पूर्ण शब्द नाही तर 'आई, बाबा, पाणी, टाटा' असे काही शब्द बोबड्या भाषेत बोलू लागलं की. तुम्ही ट्रेनिंग देताना जेव्हा तेच तेच शब्द पुन्हापुन्हा वापरता तेव्हा त्यामुळेसुद्धा बाळाला आता काय करायचंय याचा संकेत मिळतो. त्यामुळे बाळ जेव्हा बोलू लागतं तेव्हा शी आणि शू साठीचे हे शब्द आधीच त्याच्या शब्दसंग्रहात असतात. त्यामुळे बाळाला जेव्हा शू किंवा शी ला जायचं असेल तेव्हा तुम्ही जे शब्द वापरात होतात, नक्की तेच शब्द वापरून बाळ तुम्हाला त्याची कल्पना देईल. 

आणखी काही टिप्स: ह्या गोष्टीला वेळ लागतो, हताश होऊ नका किंवा लगेचच हार मानू नका. धीर धरणं आणि सातत्य हे खूप महत्वाचं आहे. तसंच, हेही लक्षात ठेवा की तुम्ही सगळं काही व्यवस्थित केलंत तरी काही ना नाही घोटाळा होणारच. शेवटी ते एक लहान बाळ आहे. आम्ही एकदा एका रेस्टॉरंट मध्ये असताना ( बाळाच्या डायपरशिवाय, कारण मला खूप विश्वास होता की शू झाली की तो मला सांगेल ) जेव्हा माझ्या मुलाने चड्डीत शू केली तेव्हा माझा राग खूपच अनावर झाला होता आणि तो असा त्रास का देतोय असा मी विचार करू लागले. 

मला हे कळायला थोडा वेळ लागला की त्या वयात बाळाला फक्त आपल्या घरच्या वातावरणात बरं वाटत असतं. बाहेर असताना खूप साऱ्या गोष्टींनी बाळाचं लक्ष विचलित होत असतं आणि बहुधा ते बावरून जातं. त्यामुळे आपल्याला काय करायचंय हे त्याच्या लक्षात येत नाही. म्हणून ह्या सगळ्यासाठी तयार राहा. आणि कुठल्याही परिस्थितीत, ह्या वयात, बाळाला सार्वजनिक ठिकाणी असताना डायपरमध्ये ठेवणंच सर्वात योग्य असतं. 

बस एवढंच. तुमचं मूल एक वर्षाचं होईपर्यंत त्याला शी केव्हा, कुठे, कशी करावी हे शिकवण्यासाठी फक्त धीर धरणं, सातत्य आणि बाळ देत असेलेले संकेत समजणं ह्या गोष्टींची गरज आहे. शुभेच्छा!

हा लेख नोबेल हायजिन/ टेडीज डायपर्स यांच्यासोबत सहयोगाने लिहिला आहे.  

Translated by Anyokti Wadekar

loader