“एक कविता म्हणून दाखव बाळा” …७ अशा गोष्टी ज्या म्हणणं भारतीय पालकांनी लगेचच थांबवलं पाहिजे!

"मी तिला गाणं म्हणायला सांगितलं, पण ती इतकी हट्टी आहे की ती कधीच ऐकत नाही. एकदा का पाहुणे गेले की मग ती स्वतःहून गाणं म्हणायला लागेल. एकदा मी तिला चांगलंच रागावले. तरी सुद्धा तिने गाणं म्हटलं नाहीच." एक चिडलेली आई सांगते.

भारतीय पालक आपल्या मुलांवर प्रेम करतात हे खरंय, मी त्याबद्दल वाद घालत नाहीये. पण कधीकधी गोष्टी हाताबाहेर जातातच. इतक्या की पालकत्व म्हणजे मुलांना गुदमरवून टाकणारी एक गोष्ट बनून जाते. मुलाला गुदमरून जायला होतं आणि ते त्याच्या अडचणी व्यक्त करू शकत नाही आणि त्यामुळे त्याची वागणूक बिघडू लागते.

वरच्या तक्रारीमध्ये, एकाच मोठ्या चालीमध्ये पालकाने मुलामध्ये सत्तेचं राजकारण, शिस्तीविषयीच्या समस्या, आणि अॅंग्झायटी हे सगळं निर्माण केलंय. ही आहेत अशी ७ उदाहरणं जेव्हा भारतीय पालक पालकत्वामध्ये नकळतच अक्षरशः सगळा घोटाळा करून ठेवतात.

१. "एक गाणं म्हणून दाखव बाळा"

पहिल्यांदा जेव्हा मुलांना हे सांगितलं जातं तेव्हा बऱ्याच मुलांना तर चीड येते. ते ऐकायला विनवणीसारखं वाटतं पण बोललं जाताना आदेश दिल्यासारखं बोललं जातं आणि बऱ्याचदा त्याचा उलट परिणाम होतो. मुलं कला सादर करतात, आणि त्यांना ते आवडतंही. पण ते सहसा, त्यांचं ज्यांच्यावर प्रेम असतं अशा पालकांसाठी सादर करतात. मुलांना, घरात न राहणाऱ्या लोकांसाठी किंवा फॅमिलीचे सदस्य नाहीत असं वाटणाऱ्या लोकांसाठी कला सादर करायला कधीच नाही आवडत.

मुलाला कला सादर करून दाखवायची बळजबरी केल्याने त्याचे हमखास अनुचित असे परिणाम होतात.

तुम्ही तुमच्या मुलाला त्याला काही कला सादर करून दाखवण्यामध्ये इंटरेस्ट आहे का हे विचारू शकता आणि त्याने/ तिने संमती दिली की मग तुमच्या पाहुण्यांना धमाल बघायला मिळेल ह्याची हमी देऊ शकता!

२. "ह्यांना काका/ मामा म्हण बघू"

मुलांच्या लैंगिक छळाला घरातूनच सुरुवात होते ह्याबद्दलच्या बातम्यांचा प्रसारमाध्यमांमध्ये भडीमार होत असताना भारतीय पालक मित्र-मैत्रिणींना कुटुंबाचे सदस्य म्हणून संबोधण्यावर भर का देतात? मुलाच्या जवळच्या फॅमिली व्यतिरिक्त कोणाला फॅमिली म्हणायचं/ संबोधायचं हे मुलाला ठरवू द्या. आपल्या जवळच्या कौटुंबिक वर्तुळात तुमचं मूल कुणाला प्रवेश देतं याच्यावर बारीक लक्ष ठेवा.

एखाद्या ठरावीक व्यक्तीपासून मूल जर दूर राहात असेल किंवा त्याच्याशी संवाद साधत नसेल तर तुमच्या मुलाला त्याचं कारण विचारा. तुमचे निर्णय मुलावर लादण्याऐवजी त्याला त्याचं मत विचारा.

३. "तू बस बाळा, मी आहे ना"

आपल्या काळजाच्या तुकड्यावर भरभरून, थोडं अतीच प्रेम नाही केलं तर त्या भारतीय आया कसल्या. मुलाला जेवण वाढणं, त्याला भरवणं, आणि मग उष्टी काढणं हे सगळं त्या, मूल स्वतःची काळजी स्वतः घेण्याइतकं मोठं झाल्यानंतरही खूप वेळ करत राहतात. तुम्हाला हे ओळखीचं वाटतंय का? कारण सगळीकडे नक्कीच हेच चित्र आहे. पालकांना हे कळत नाही की पसारा करून ठेवल्यावर तो पसारा मुलालाच आवरायला लावल्याने त्यांच्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होतो. मुलांना स्वतःची काळजी कशी घ्यायची हे कळलं तर ती आयुष्याला अधिक चांगल्या प्रकारे सामोरी जाऊ शकतात.

४. "देशपांड्यांच्या मुलाला जास्त मार्क मिळालेत"

समवयस्क व्यक्तींशी तुलना करणं हे खूप आधीपासूनच सुरु होतं. जेव्हा मुलं छोटी बाळं असतात तेव्हापासूनच पालक स्वतःच्या बाळाची उंची, वजन, प्रतिसाद देण्याची क्षमता ह्या सर्वांची दुसऱ्याच्या बाळाशी तुलना करतात. मूल मोठं होऊ लागलं की ह्यामध्ये भरच पडते आणि थोडासा बदल होतो. पालकांना मूल जसं आहे तसं चांगलं कधीच वाटत नाही.

ह्यामागचा पालकांचा हेतू चांगला असला तरी यामुळे मुलांना अधिक चांगली कामगिरी करायला प्रोत्साहन मिळत नाही. संशोधनाने हे सिद्ध झालंय की मुलाच्या प्रत्येक अपयशाबद्दल कुरबुर करत राहण्यापेक्षा सततच्या सकारात्मक पाठबळामुळे मुलांना भविष्यात खूप पुढेपर्यंत फायदा होतो.

५. "लोक काय म्हणतील"

भारतीय पालकांना सतत लोक काय म्हणतील याचीच चिंता लागून राहिलेली असते.

"मुलग्याला खेळण्यातल्या गाड्या आवडत नाहीत? लोक काय म्हणतील.. अगं बाई"

"मुलीला तोकड्या शॉर्ट्स आवडतात? लोक काय म्हणतील"

२ वर्षांखालच्या मुलांना ह्या प्रकारच्या उलटतपासणीला सामोरं जावं लागतं त्यामुळे २० वर्षं वयापर्यंत पोहोचेपर्यंत ही एक प्रचंड समस्या बनून जाते हे सहजच लक्षात येण्यासारखं आहे. त्यांना सामाजिक समज-गैरसमजांचे गुलाम बनायला शिकवलं जातं.

६. "मला तुझ्यापेक्षा जास्त कळतं कारण मी तुझी आई/ तुझा बाबा आहे"

मूल स्वतःच्या नकळत असा विचार करू लागतं की त्याला/ तिला पुरेसं कळत नाही. हे हानिकारक ठरू शकतं कारण मुलं मोठी होताना मग असा विचार करू लागतात की पालकांकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं असतात. त्यामुळे त्यांची निरागस, चौकस वृत्ती खुंटते आणि हे घातक ठरू शकतं.

७. "ती मुलगी आहे....तिला सॉरी म्हण"

स्त्री-पुरुष समानता शिकवण्याच्या प्रयत्नात, ती चुकीच्या पद्धतीने शिकवल्यामुळे भारतीय पालक उलट स्त्री-पुरुष असमानतेमध्ये आणखी भर घालतात. एखादा मुलगा जेव्हा एका मुलीला धक्का मारतो आणि त्याला ती 'मुलगी' आहे म्हणून तिची माफी मागायला शिकवलं जातं, तेव्हा त्याला जे शिकायला पाहिजे त्याहून वेगळंच काही तो शिकतो. अशा मुलांना मोठं झाल्यावर स्त्री-पुरुष समानता आणि स्त्री-पुरुषसमतावाद ह्यासारख्या गोष्टींचं आकलन होणं कठीण होऊन बसतं. स्त्रीला पुरुषापेक्षा जास्त मर्यादशील आणि नाजूक दाखवण्यापेक्षा सातत्याने स्त्री-पुरुष समानतेचा पुनरुच्चार करणं हे सर्वात उत्तम.  

Translated by Anyokti Wadekar

loader