प्रिय सासूबाई, तुमच्या गरोदर सुनेला तुमच्याकडून ‘हे’ ऐकायचं आहे

प्रेग्नन्सी ही स्त्रियांसाठी खूप मोठी गोष्ट असते मग ती पहिली प्रेग्नन्सी असो वा दुसरी. असं असलं तरी, कुठल्याही होणाऱ्या आईला, जी आपल्या सासरी राहते, तिला विचारा आणि ती तिच्या सासरच्या माणसांकडून असलेल्या तिच्या अपेक्षा तुम्हाला नक्की सांगेल. आणि हे खासकरून त्या वेळेबाबत खरं आहे, जेव्हा गरोदरपणाची बातमी जाहीर करण्याची वेळ असते. अखेर, सासरच्या माणसांच्या प्रतिक्रियांना खूप महत्त्व असतं आणि गरोदरपणाच्या बातमीशिवाय ही नाती गुंतागुंतीची होऊ शकतात.

प्रत्येक सुनेला असं हवं असतं की तिने गरोदरपणाची बातमी सांगितल्यावर सासूने ती गोष्ट आनंदी भावनांसह साजरी करावी आणि सासूनेही सुनेसाठी असं करणं हे सर्वतोपरी उचितच ठरेल!

१. मला खूपच आनंद झालाय!

एकदा का तुम्ही ही मोठी बातमी जाहीर केलीत की अभिनंदनांचा आणि सदिच्छांचा वर्षाव तुमच्यावर होईलच, पण त्याहून अधिक जर काही सासूने व्यक्त केलं तर कुठल्याही होणाऱ्या आईला आनंद होईल. 'मला खूपच आनंद झालाय', 'येणाऱ्या लहानग्याची मी खूप आतुरतेने वाट पाहतेय' इत्यादी, या अशा काही गोष्टी आहेत ज्या कुठल्याही होणाऱ्या आईच्या चेहऱ्यावर एक छानसं स्मितहास्य आणतील. तुमच्या होणाऱ्या बाळाच्या बाबतीत तुमच्याइतकंच आणखी कुणीतरी देखील आनंदी आहे हे कळणं ही एक खूप छान गोष्ट आहे, नाही का?

२. तू एक उत्तम आई ठरशील!

आई असलेल्या आणि सासरी राहणाऱ्या कुठल्याही स्त्रीला विचारा आणि ती नक्कीच याबाबत तक्रार करेल की कशी तिच्या सासूची अशी अपेक्षा होती की तिने अगदी तसंच सर्वकाही करावं जसं तिच्या सासूने तिला मुलगा झाल्यावर केलं. पण याउलट जर झालं तर ते नक्कीच खूप चांगलं असेल, नाही का? 'तू एक उत्तम आई ठरशील' हे असं वाक्य आहे ज्याने नक्कीच होणाऱ्या आईचा ऊर अभिमानाने भरून येईल आणि तिला एवढं तरी नक्कीच म्हटलं गेलं पाहिजे.

३. मी तुला कशी मदत करू?

एवढं मोठं पोट सांभाळण्यापासून ते निरनिराळ्या भावभावनांच्या आवेगातून जाण्यापर्यंत प्रेग्नन्सी म्हणजे एक दमवून टाकणारा अनुभव ठरू शकतो. अशा वेळी सासवा जर गोष्टींमध्ये नाक खुपसणाऱ्या किंवा शिष्ट असतील तर मग परिस्थिती आणखीनच वाईट होऊ शकते. कुठल्याही गरोदर स्त्रीला हे विचारा की तुम्ही तिची कशी मदत करू शकता आणि तिला ते ऐकून फार फार बरं वाटेल. आणि हे विचारणारी व्यक्ती जर तिची सासू असेल तर मग ती आनंदाने उडीच मारेल!

४. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे!

जेव्हा एखादी स्त्री आई होणार असते तेव्हा प्रत्येक जण 'हे करू, ते करू' अशी एक यादीच मांडतो, पण प्रत्यक्षात कोण खरंच ते सगळं करतं? मध्यरात्री लागणाऱ्या डोहाळ्यांपासून ते बाळासाठी शॉपिंग करण्यापर्यंत आणि जेव्हा तिला उदास वाटतं तेव्हा तिला दिलासा देण्यापर्यंत गरोदर स्त्रियांना खूप साऱ्या गोष्टींसाठी आधाराची गरज असते. आणि हे सारं जर तुमची सासू करत असेल तर तुम्ही स्वतःला नशीबवान समजलं पाहिजे!

५. तुझ्या आईला घरी बोलावून घे!

हे म्हणजे सोन्याहून पिवळं! कुठल्याही स्त्रीला ती गरोदर असताना तिची आई तिच्यासोबत असलेली आवडेलच. आणि तिच्या सासूने आईला घरी बोलवायला सांगितलं तर मग तिच्यासाठी सगळं खूपच सोपं होऊन जाईल. अखेर, तिला फक्त थोड्या अधिक प्रेमाची आणि आधाराची गरज असते आणि ते तिला सासू आणि आई दोघांकडूनही मिळणार असेल तर हे चांगलंच आहे.

 

Translated by Anyokti Wadekar

loader