स्तनपान करणाऱ्या मातांनो, ह्या किरकोळ चुका घातक ठरू शकतात!

स्तनपान ही जगातली सर्वात नैसर्गिक गोष्ट असेल, पण ती वाटते तितकी सोपी नक्कीच नाही. तुमचं शरीर ज्या प्रकारे दुधाची निर्मिती करतं त्यामध्ये फक्त तुमचं बाळ आणि तुमचे स्तन ह्यांचाच समावेश होत नाही. स्तनपानाचा प्रवास सुखकर बनवण्यासाठी, बाळाच्या तोंडामध्ये योग्य प्रकारे स्तन देण्यापासून ते स्तनांमध्ये दुधाची पुरेशी निर्मिती होतेय की नाही हे पाहण्यापर्यंत, बऱ्याच गोष्टींचं अवधान सांभाळावं लागतं.

असं असलं तरी, जर तुम्हाला तुमच्या दुधाच्या निर्मितीच्या प्रमाणात घट जाणवली, तर ती घट, तुमच्या नकळत तुम्ही करत असलेल्या ह्या बारीक-सारीक चुकांमुळे असू शकते. वाचा आणि नोंद करून ठेवा!

१. बाळाच्या तोंडामध्ये स्तन योग्य प्रकारे न देऊ शकणं

बाळाच्या तोंडामध्ये स्तन योग्य प्रकारे फिट न होणं ही समस्या बहुतेक आयांना भेडसावते. बाळाच्या तोंडामध्ये योग्य प्रकारे स्तन देण्याची पद्धत आत्मसात न केल्यास स्तनपानाचा अनुभव कटू ठरू शकतो आणि तुमच्या दुधाच्या निर्मितीचं प्रमाण सुद्धा त्यामुळे कमी होऊ शकतं. स्तनपानादरम्यान वेदना होऊ नयेत आणि दुधाचा पुरवठा अखंड होत राहावा याकरता बाळाच्या तोंडामध्ये स्तन बिनचूक पद्धतीने फिट होणं खूपच महत्वाचं आहे.

२. बाळाला पुरेशा वेळा दूध न पाजणं किंवा ब्रेस्ट पंप ने दूध न काढणं

जेव्हा तुम्ही बऱ्याच काळासाठी बाळाला दूध पाजत नाही किंवा ब्रेस्ट पंप ने स्तनांतून दूध बाहेर काढत नाही, तेव्हा स्तन भरून मोठे होतात, आणि त्यांच्यात एक प्रकारचं व्हे प्रोटीन वाढू लागतं ज्याला "फीडबॅक इनहिबिटर ऑफ लॅक्टेशन" किंवा एफआयएल म्हणतात. आणि जेव्हा भरलेलं दूध तुम्ही ब्रेस्ट पंप ने बाहेर काढत नाही, तेव्हा तुम्हाला कळून येण्याअगोदरच, दुधाचं वाढलेलं प्रमाण, दुधाच्या कमतरतेमध्ये बदलू लागतं. तेव्हा, तुमच्या स्तनांनी तुम्हाला इशारा देईपर्यंत बाळाला दूध पाजण्यासाठी थांबू नका. काही स्त्रियांच्या बाबतीत, 'स्तन भरून येण्याची' संवेदना काळाबरोबर नष्ट होते. तरी, तुमचे स्तन भरून आलेल्याची जाणीव होईपर्यंत बाळाला पाजण्यासाठी किंवा ब्रेस्ट पंप ने दूध काढण्यासाठी थांबू नका.

३. बाळाला खूप वेळपर्यंत झोपू देणं

नवजात बाळं दिवसदिवसभर झोपून राहतात आणि आपण आया आपल्या त्या गोड लहानग्याला निरखण्यात पूर्णपणे हरवून जातो. तुम्हाला जरी असा मोह झाला, की बाळाला न उठवता हवं तितकं झोपू द्यावं, तरी हे लक्षात घ्या की त्यामुळे तुमच्या दुधाच्या निर्मितीच्या प्रमाणावर बराच मोठा परिणाम होऊ शकतो. म्हणून प्रत्येक ३ तासांनी बाळाला प्रयत्नपूर्वक उठवून जागं करा ज्यामुळे तुमच्या दुधाच्या निर्मितीचं प्रमाण अखंड राहील आणि तुमचं बाळ आनंदी आणि सुदृढ राहील. असं असलं तरी, अर्धवट झोपेत असलेल्या बाळाच्या तोंडामध्ये स्तन योग्य प्रकारे फिट करून देणं कदाचित कठीण ठरू शकतं. म्हणून, बाळाचं डायपर बदला, त्याच्याबरोबर चाला, त्याला खेळवा किंवा त्याला दोन्ही स्तनांनी स्तनपान देऊन पाहा.

४. बाळाला रात्री दूध न पाजणं

बहुतांशी आया दिवसभर बाळाला सांभाळून थकतात आणि रात्रीच्या वेळी बाळाच्या वडिलांनी बाळाला सांभाळण्याचं काम करणं उचितच आहे. असं असलं तरी, पूर्ण रात्रभर बाळाला दूध न पाजल्यामुळे तुमच्या शरीराला असा इशारा दिला जातो, की ते गरजेपेक्षा जास्त दूध तयार करत आहे आणि ह्यामुळे दुधाच्या निर्मितीत घट होऊ शकते. ही गोष्ट टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे रात्रीच्या वेळी तुमचं बाळ जितकं दूध पितं तेवढं दूध ब्रेस्ट पंप ने काढून घेणं आणि ते बाळाला बाटलीतून देणं. अशा प्रकारे तुम्हालाही आराम मिळेल आणि तुमच्या बाळाचा आहारही चुकणार नाही. तुम्ही रात्री लवकर झोपल्यामुळे तुमची झोप अपूर्णही राहणार नाही.

५. योग्य आहार न घेणं

सर्वात शेवटी पण सर्वात महत्वाचं म्हणजे, योग्य आहार न घेतल्याने तुमच्या दुधाच्या निर्मितीवर फार मोठा वाईट परिणाम होऊ शकतो. नवजात बाळाला सांभाळताना तुमच्या जेवणाच्या वेळा टळू शकतात किंवा रात्रीची झोप नष्ट होऊ शकते, त्यामुळे तुम्ही स्वतःची काळजी घेणं महत्वाचं आहे.

फीचर इमेज स्रोत: एनेबलकिड्स डॉट सीए

Translated by Anyokti Wadekar

loader