स्तनपान करणाऱ्या मातांनो – तुमच्या नकळत तुमच्या पतीची सेक्सची इच्छा नष्ट करणाऱ्या ह्या गोष्टीबद्दल वाचा!

मला एका पतीने हे सांगितलं:

"जेव्हा केव्हा मी माझ्या पत्नीला स्तनपान करवताना बघतो माझा मूड खूप ऑफ होतो...मी सरळ तिथून निघून जातो. त्याचं कारण फक्त इतकंच नाही की तिने आमचं बाळ २ वर्षाहून अधिक मोठं झाल्यावर सुद्धा त्याला स्तनपान देण्याचा निर्णय घेतलाय... पण त्याचं कारण हेही आहे की माझ्या मताला ह्या सगळ्यात काहीच किंमत नाही. मला माहितीय की मी तिच्या निर्णयाचा आदर करायला हवा, आणि मी करतोही. आमचं बाळ आनंदी असतं. पण आमचं सेक्स लाईफ पूर्णपणे नष्ट झालंय. माझं माझ्या पत्नीवर प्रेम आहे. मला हे आवडतं की ती खूप स्वावलंबी आहे आणि तिला तिची अशी काही मतं आहेत. पण मी तिला ह्या अशा अवस्थेत पाहूच शकत नाही."

जे पुरुष असा विचार करतात, त्या सर्वांसाठी हे एक खुलं पत्र.

प्रिय पुरुषांनो,

कुठल्याही महत्वाच्या बाबतीत तुमचे सपक विचार ऐकणं हे नेहमीच आल्हाददायक असतं. आम्ही हे मानतो की, "पण, तू तर एक स्त्री आहेस" ह्या दृष्टिकोनाला तुम्ही बरंच मागे टाकलंय, पण स्तनपान करणाऱ्या आईमुळे तुमचा मूड ऑफ होतो असं म्हणणं हे तुलनेने फारच खालच्या पातळीचं झालं.

एक स्त्री जेव्हा आई बनते तेव्हा त्याबरोबरीने तिची इतरही अनेक रूपं असतात. आधी ती बाळाची वाहक असते, त्यानंतर ती बाळाचं अन्न असते, बाळाला अत्यावश्यक असं त्याचं संगोपन ती करते. हे कमी म्हणून की काय तिच्यावर समाजाचं दडपण असतं, शरीरात होणाऱ्या शेकडो बदलांशी जुळवून घ्यायचं असतं, त्याबरोबरच एक आई म्हणून प्रत्येक क्षणाला तिला तिचं सर्वस्व पणाला लावायचं असतं. जणू काही हे पुरेसं नाही म्हणून तुम्ही अशी अपेक्षा करता की तुमच्या बाळाला भरवतानाही तिने तुमच्यासाठी मादक दिसायला, राहायला हवं.

आम्ही समजू शकतो की तुम्ही प्रांजळपणे कबुली देत होतात (आणि त्यासाठी आम्ही तुमचे आभार मानतो), पण भविष्यात तुमच्या मेंदूकडून तुमच्या लैंगिक अवयवाला हे कळू द्या की काय बरोबर आहे आणि काय चूक.

आणि त्याचं कारण हे आहे की - सेक्स हे सर्वात आधी मनात असतं. तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला ती आहे तसं स्वीकारलं असेल आणि तिच्यावर प्रेम करत असाल, तर सेक्स हे फक्त ते प्रेम दाखवून देण्याचं साधन आहे. पुढच्या वेळी तुमच्या मनात जेव्हा असे विचार येतील, तेव्हा थांबा आणि सेकंदभर जास्त विचार करा. ती फक्त तिचा हक्क बजावतेय की नाही? ह्या गोष्टीनेच तुमचा मूड टर्न ऑन झाला पाहिजे!

चला. तसा प्रयत्न तर करून बघा.

स्नेहपूर्वक तुमचीच,

स्तनपान करणारी आई.

बरं झालं आम्ही एकदाचं हे तुम्हाला सांगून टाकलं ते! आता आपण विज्ञानाकडे वळूया. ह्या ट्रेंड बद्दल डॉक्टर काय म्हणतात?

प्रसिद्ध सेक्साॅलजिस्ट डॉ. रजत भोसले ह्यांचं ह्या गोष्टीबद्दल असं म्हणणं आहे:

"हो, मी अशा केसेस पाहिल्या आहेत. स्तनपान करणाऱ्या आईला पाहून एका पतीची सेक्सची इच्छा नष्ट होण्याला बऱ्याच गोष्टी कारणीभूत असू शकतात. स्तनपानाच्या बाबतीतले त्याचे स्वतःचे अनुभव किंवा त्याचे त्याबाबतीतले संस्कार ह्याला कारणीभूत असू शकतात. त्याचं त्याच्या आईशी असलेलं नातं.. अशा बऱ्याच गोष्टींचा त्यात समावेश होतो, फक्त स्तनपानाच्या क्रियेमुळे हे होतं असं नाही. म्हणून प्रत्येक केसचा स्वतंत्रपणे अभ्यास करावा लागतो"

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ह्या ३ गोष्टी प्रत्यक्ष करता येण्यासारख्या आहेत:

१. डिलिव्हरी नंतरचे पहिले तीन महिने, आराम करा. हा काळ निसर्गाने आईचं आरोग्य पूर्ववत होण्यासाठी आणि नवजात बाळाकडे लक्ष देण्यासाठी नेमून दिलेला असतो.

२. ६ महिन्यांनंतर पत्नी सेक्सच्या दिशेने पाऊल उचलू शकते, आणि असं असं दर्शवू शकते की सेक्सचा प्रवास जिथे थांबला होता तिथून तो पुन्हा सुरु करण्यास ती आता तयार आहे. असं असलं तरी सुरुवातीची २ वर्षं खूप वेळा ही प्रक्रिया चालू होईल आणि थांबेल. पण तुम्ही तुमचे प्रयत्न चालूच ठेवा.

३. असं असलं तरी, जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या पतीची सेक्सची इच्छा नष्ट होण्यामागे काही वैद्यकीय कारण आहे, तर त्यावर उपचार करून घेणं उपयोगी ठरेल!

मग आयांनो, काय वाटतं तुम्हाला? तुमचे विचार आम्हाला लिहून कळवा!

Translated by Anyokti Wadekar

loader