दहा मिनिटांच्या आत बनणाऱ्या ब्रेकफास्ट रेसिपीज

आम्हाला माहितीय सकाळच्या वेळी तुमची केवढी धावपळ होते, खासकरून तेव्हा, जेव्हा एका मोठ्या सुट्टीनंतर मुलांना पुन्हा शाळेत जायचं असतं. काय खायचं ह्या विषयावरून लढाई, मग डबा भरून देणं आणि घरातली इतर दैनंदिन कामं करणं या सर्व धबडग्यात एक हेल्दी ब्रेकफास्ट बनवणं म्हणजे जणू काही एक युद्ध बनून जातं. उकडलेलं अंडं, कांदेपोहे, उपमा, इडली आणि डोसा यासारखे पारंपरिक पदार्थ मेन्यू मध्ये नेहमी असतातच पण खाली दिलेल्या रेसिपी ह्या सोप्या आहेत, वेळेची बचत करणाऱ्या आहेत आणि त्या तुमच्या मुलांना पसंत पडतील. मग ब्रेकफास्टची वेळ म्हणजे एक युद्ध, असं वाटणार नाही!

१. पीनट बटर आणि जेली सोबत टोस्ट

तुमच्या लहानग्याला पीनट बटर खूप आवडत असेल तर ते टोस्ट वर लावा. त्यावर भरपूर जॅमचा आणखी एक थर पसरवून लावा आणि मग तुमचा लहानगा/ लहानगी ते नक्की गट्ट करेल!

२. केळं आणि नटेला सोबत टोस्ट

असं कुठलंही लहान मूल नसेल ज्याला नटेला आवडत नाही. ब्रेड थोडासा टोस्ट करून घ्या, त्यावर नटेला लावा आणि सर्वात शेवटी त्यावर केळ्याचे काप पसरून लावा. खूप यम्मी आहे की नाही?

३. तयार, घरी बनवलेला ग्रनोला

दुकानातून विकतचे ग्रनोला बार घेणं बंद करा! तुम्ही घरीच स्वतः ग्रनोला बार बनवू शकलात तर? तुमच्या मुलाचं आवडतं ब्रेकफास्ट सीरिअल, कुरमुरे, खजूर आणि इतर सुकामेवा एका मोठ्या भांड्यात शॅलो फ्राय करून घ्या. त्यात थोडा मध टाकून नीट ढवळा. एकदा का हे मिश्रण घट्ट झालं की ते एका सपाट ताटात काढून घ्या आणि पूर्णपणे थंड होऊ द्या. चार दिवस हवाबंद डब्यात ठेवा. मुलांना देताना त्याचे छोटे छोटे तुकडे करून द्या किंवा त्यात दूध ओतून ब्रेकफास्ट सीरिअल म्हणून सर्व्ह करा.

४. रात्री भिजत घातलेले ओट्स

रात्री भिजत घातलेले ओट्स हे बनवायला सोपे, साधे असतात आणि त्यामध्ये भरपूर प्रोटीन असतं. एक हवाबंद बरणी घ्या आणि त्यात ओट्स, दूध, नट्स आणि केळ्याची कापं घालून ढवळा. ही बरणी रात्रभर फ्रिजमध्ये ठेवा. सकाळी त्यात आणखी दूध आणि फळं घालून सर्व्ह करा. याला थोडं गोड बनवण्यासाठी त्यात थोडा मधही घालू शकता.

५. बनाना ओट्स मिल्कशेक

केळी आणि ओट्स हे उत्तम कॉम्बिनेशन आहे कारण ते नुसतंच टेस्टी नाही तर त्यामुळे तुमच्या मुलाचं पोट खूप वेळपर्यंत भरलेलं राहतं. केळी, ओट्स, मध हे सगळं दुधाबरोबर ब्लेन्ड करून घ्या आणि जाडसर मिल्कशेक बनवा. तुम्ही त्यावर दालचिनी पूड, नट्स किंवा फळं सुद्धा घालू शकता.

६. दूध आणि टोस्ट

वर दिलेल्या ब्रेकफास्ट डिशेस पैकी कोणतीच तुमच्या मुलाला आवडत नसेल तर जुनी पद्धत अनुसरून गरम दुधात टोस्ट भिजवून द्या. साध्या दुधाऐवजी तुम्ही फ्लेवर्ड मिल्क सुद्धा वापरू शकता. मुलांना दूध प्यायला लावायचा हा एक उत्तम मार्ग देखील आहे.

Translated by Anyokti Wadekar

loader