लहान मुलांना झोपताना गोष्टी सांगणं कदाचित लवकरच भूतकाळात जमा होईल! ‘कहानीवाली नानी’ हे चित्रं बदलतेय!

सरला मिन्नी ह्या ‘कहानीवाली नानी’ आहेत आणि त्या तुम्ही पाहिलेल्या इतर कोणत्याही आजी सारख्या नाहीत. त्या तल्लख आहेत आणि टेक्नॉलॉजी चांगल्या प्रकारे वापरू शकतात. त्यांना इंग्लिश आणि हिंदी ह्या दोन्ही भाषा चांगल्या येतात, त्या फिटनेस विषयी अत्यंत जागरूक आहेत आणि त्या खूप वक्तशीर देखील आहेत.

त्यामुळे, त्यांचा प्रकल्प -  कहानीवाली नानी - ज्याला चार महिने झालेत, तो अल्पावधीतच जगप्रसिद्ध झालाय. चित्रपट पाहून कंटाळलेले पालक ‘कहानीवाली नानी’ च्या सोप्या, नैतिक मूल्य असणाऱ्या आणि मनावर आणि कानावर हळुवार असणाऱ्या गोष्टी उचलून धरत आहेत.

गोष्ट मिळवण्याची प्रक्रिया:

ह्या इमेज मधल्या नंबर वर व्हाॅट्सअॅप टेक्स्ट मेसेज पाठवा

 

एकदा का तुम्ही टेक्स्ट मेसेज पाठवला, की तुम्हाला तुमच्या मुलाचं लिंग, वय आणि भाषेची निवड विचारली जाईल. तुम्ही ही माहिती दिलीत, की तुम्हाला आठवड्यातून दोन वेळा ८-९ मिनिटांचा एक ऑडिओ मेसेज पाठवला जाईल ज्यामध्ये तुमच्या मुलाच्या वयाला योग्य अशी गोष्ट असेल, जी परफेक्ट सुरात आणि आवाजाच्या पट्टीत सांगितली गेलीय आणि जी तुमच्या मुलाच्या कल्पनाशक्तीला चालना देईल!

सरला ताई आपल्याला ह्याबद्दल आणखी सांगतील:

१. ही कल्पना तुम्हाला कशी सुचली?

लहान मुलं स्क्रीन्स कडे पाहात असलेली, व्हिडिओ गेम्स खेळत असलेली किंवा स्क्रीन वर गोष्टी पाहात असलेली पाहून मला नेहमी दुःख होतं. हो, त्यांच्यापैकी बऱ्याच जणांना गोष्टी सांगायला आजी नसते. मला आठवतंय माझी मुलं त्यांच्या आजी-आजोबांकडून किती प्रेमाने गोष्टी ऐकायची. मला असं हवंय, की ही भेट प्रत्येक मुलाला मिळावी. मुलांना स्क्रीन्स पासून दूर तर ठेवलं पाहिजे पण त्यांना गोष्टींपासून दूर ठेवता कामा नये असं मला नेहमीच वाटतं. हे माझ्या मनात तर होतं, पण ते शक्य कसं होईल हे मला माहीत नव्हतं. ऑडिओ मेसेजच्या द्वारे गोष्टी पाठवणं ही ‘कहानीवाली नानी’ची सह-संस्थापक आणि माझी पुतणी पारुल रामपुरिया हिची कल्पना होती. गोष्ट रेकॉर्ड करण्याची कल्पना तिची होती. आम्ही ह्या गोष्टी मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना पाठवल्या. सुरुवातीच्या टप्प्यात आम्हाला खूप सकारात्मक आणि उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला. २१ मार्च २०१७ ला आम्ही कहानीवाली नानी चा आरंभ केला.

२. तुम्ही ह्या गोष्टी कशा निर्माण करता? कुठून येतात ह्या गोष्टी?

बऱ्याचशा गोष्टी ह्या सर्वसाधारण लोककथा आहेत. मी एकाच गोष्टीच्या अनेक आवृत्त्या वाचते आणि त्यामध्ये काही बदल करून त्या गोष्टी मुलांसाठी अधिक मनोरंजक आणि बोलक्या बनवते. कल्पना सुचाव्यात म्हणून आणि माझी स्वतःची गोष्ट बनवण्यासाठी मी खूप सारी गोष्टीची पुस्तकं वाचते.

३. तुमच्या गोष्टींना मिळालेला अविस्मरणीय असा काही प्रतिसाद?

हल्लीच बिटटू नावाची गोष्ट पाठवल्यावर एका पालकाकडून मला असा प्रतिसाद मिळाला

"ही भन्नाट गोष्ट दिल्याबद्दल धन्यवाद. माझी मुलगी म्हणते 'नानी ने फक्त माझं नाव बदलून बिटटू केलं आणि माझ्याच वागण्याची नक्कल केलीय की'. तिने तिचं १ मिनिटाचं वागणं सोडण्याचं वचन दिलंय.”

मला ही गोष्ट पाठवल्यावर अशा प्रकारचा बराच प्रतिसाद मिळाला.

“काश्मीर मधल्या, सीमेजवळच्या एका पालकाने सांगितलं, की तिथे लहान मुलांसाठी अधिकृत शाळा नसल्याने त्यांना ह्या गोष्टींचा उपयोग झाला आणि त्यांनी माझे खूप आभार मानले.” "खूप छान आवाज, उत्तम उपक्रम. चांगली कामगिरी."

हे आहेत मला मिळालेल्या पैकी काही प्रतिसाद. मला लहान मुलांकडून, गोष्ट दिल्याबद्दल आभार मानणारे व्हॉईस मेसेजेस येतात, ही मुलं मला आणखी गोष्टी पाठवायला किंवा त्यांच्या घरी येऊन त्यांना भेटायला सांगतात.

४. कोणती गोष्ट तुम्ही एकपेक्षा अधिक वेळा  पाठवता?

सरला मिन्नी: कुठलीही गोष्ट आम्ही अजून एकपेक्षा अधिक वेळा पाठवली नाही.

५. तुम्ही गोष्टीला मुलाच्या वयाला साजेशी कसं बनवता? ..त्या त्या वयोगटानुसार कोणते शब्द किंवा संकल्पना तुम्ही टाळता?

सरला मिन्नी: आम्ही भाषा सोपी ठेवतो आणि अशा संकल्पना वापरतो ज्या मुलांना ओळखीच्या वाटतील.

६. आता किती मुलं/ पालक तुमच्या गोष्टींना सबस्क्राईब करतात? आणि कोणकोणत्या देशांतून?

सरला मिन्नी: आमचे २५०० पेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत. आमचे पूर्ण जगभर, यूएसए, यूके, यूएई, हॉंगकॉंग, थायलंड, ऑस्ट्रेलिया, जपान, स्वित्झरलँड ह्या देशांमध्ये सबस्क्रायबर्स आहेत. भारतात आमचे जवळजवळ सर्वच राज्यांमध्ये सबस्क्रायबर्स आहेत.

७. तुम्हाला एक नातू आहे.. त्याला तुमच्या गोष्टी आवडतात का? त्याची आवडती गोष्ट कोणती?

सरला मिन्नी: मला चार वर्षांचा नातू आहे आणि तो एक वर्षाचा असल्यापासून माझ्या गोष्टी ऐकतोय. त्याला गोष्टी खूप आवडतात. "बिटटू" आणि "एलिफंट अँड द टेलर" ह्या त्याच्या आवडत्या गोष्टी आहेत.

८. ह्या गोष्टींचा तुमच्याकडे मालकी हक्क आहे का? ह्या गोष्टींचं पुस्तक बनवण्याचा तुमचा बेत आहे का?

सरला मिन्नी: नाही, ह्या लोककथा असल्याने त्यांचा मालकी हक्क आमच्याकडे नाही. सध्या तरी पुस्तक बनवण्याचा विचार नाही.

९. ह्या गोष्टी निःशुल्क का आहेत? गोष्टी निःशुल्क ठेवण्यामागे तुमचा काय विचार आहे?

सरला मिन्नी: आम्ही हे निःशुल्क करतो कारण आम्ही हे कळकळीने आणि लहान मुलांवरच्या प्रेमापायी करतोय. कुठल्याही अडथळ्याविना आम्हाला प्रत्येक मुलापर्यंत पोहोचायचंय.

१०. ह्या गोष्टींचा मसुदा बनवण्याची तुमची पद्धत कशी आहे? तुम्ही तुमच्यासमोर मूल बसलंय अशी कल्पना करून ऑडिओ रेकॉर्ड करता का? की तुम्ही गोष्ट आधी लिहून काढता आणि मग रेकॉर्ड करता?

सरला मिन्नी: मी एक गोष्ट निवडते, त्या गोष्टीची वेगळी आवृत्ती वाचते आणि त्यात फेरफार करते. मग मी, माझा नातू माझ्यासमोर बसलाय आणि गोष्ट ऐकतोय, अशी कल्पना करून गोष्ट रेकॉर्ड करते.

चला मग, ‘कहानीवाली नानी’ ला मेसेज पाठवा आणि पालकत्व इतकं सोपं बनवणाऱ्या, गोष्ट सांगणाऱ्यांच्या या नवीन गॅंग मध्ये सामील व्हा!

Translated by Anyokti Wadekar

loader