तुम्ही तुमच्या बाळाच्या गुप्तांगाला पावडर लावता का? मग हे “आत्ताच” वाचा!

कधीकधी जुन्या परंपरांचा आणि प्रथांचा अर्थ लावणं खूप कठीण असतं, नाही का? आपण सर्वच आजीच्या उपायांवर आणि इतर अशा प्रथांवर विश्वास ठेवतो पण एक असा विषय जो नेहमीच वादाचं कारण बनलाय तो म्हणजे नवजात बाळाला पावडर लावणं. आपल्याला सर्वांनाच आठवतं आपल्या आजीने सांगितलेलं - बाळाची मालिश करा, त्याला आंघोळ घाला, "पावडर लावा", भरवा आणि मग बाळ दिवसभर नक्कीच शांत झोपेल, नाही का?

असंय की, ह्या नित्यक्रमामुळे तुमचं बाळ तुम्हाला काही त्रास न देता नक्की शांत झोपेल, पण तो पावडर लावण्याचा भाग मात्र तितकासा योग्य नाही. आणि नाही, आम्हाला असं म्हणायचं नाही की आजीचे उपाय अजिबात काम करत नाहीत. पण आम्ही जे विशेषतः पावडर लावण्याबद्दल म्हणतोय त्याला खूप सारा वैज्ञानिक पाठिंबा आहे.

म्हणून लगबगीने बाळाचं डायपर बदलत असताना तुम्हाला जर ती पावडरची बाटली हाताला लागली नाही तर काळजी करू नका. तुम्ही चांगलंच केलंत! आणि त्याचं कारण हे आहे!

पावडर वापरणं असुरक्षित का आहे?

सर्वात आधी म्हणजे पावडरचा जो मोहक सुगंध येतो त्यामुळे आपल्या सर्वांनाच पावडर आवडते. पण असं लक्षात आलंय की बाळांच्या श्वासाद्वारे ही पावडर सहजगत्या त्यांच्या शरीरात जाऊ शकते आणि बऱ्याच अंशी त्यांच्या फुफ्फुसांना देखील इजा करू शकते. पावडर श्वासाद्वारे आत गेल्याने बाळांमध्ये फुफ्फुसांच्या, श्वासनलिकेविषयक आणि श्वासोच्छ्वासविषयक इतर समस्या उद्भवतात. आणि वेळेआधी जन्मलेल्या बाळांच्या बाबतीत ह्या समस्या आणखीनच गंभीर असतात.

टॅल्कम हा पायाभूत घटक असलेल्या पावडरी

बहुतांशी बेबी पावडर्स मध्ये टॅल्क नावाचं एक नरम खनिज असतं ज्यामुळे त्या पावडरीला सुगंध प्राप्त होतो. हा सुगंध खूप चांगला असला तरी श्वासावाटे हे खनिज शरीरात गेल्यास ते धोकादायक असतं. असं असलं तरी काही बेबी पावडर्सचा पायाभूत घटक कॉर्न स्टार्च हा असतो. अशा पावडरी कमी प्रमाणात व काळजीपूर्वक लावल्यास सुरक्षित समजल्या जातात. याचं कारण हे आहे की कॉर्न स्टार्चचे कण मोठे असतात आणि ते हवेत कमी मिसळत असल्याने बाळाच्या श्वासाद्वारे त्याच्या शरीरात जाण्याची शक्यता कमी असते.

डायपर मुळे उठणाऱ्या पुरळाला पावडर लावायची गरज असते का?

नव्याने आई झालेल्या बऱ्याच स्त्रिया ही एक सर्वसाधारण चूक करतात. ज्या क्षणी तुम्हाला बाळाच्या गुप्तांगावर लालसरपणा किंवा खाज दिसून येते तुम्ही तोच भाग कोरडा आणि स्वच्छ ठेवण्यासाठी त्यावर पावडर लावू लागता. हे करण्यामागचा तुमचा हेतू चांगला असला तरी त्यामुळे खरंतर तुम्ही इन्फेक्शन अधिक वाईट बनवत असता. डायपर मुळे उठलेल्या पुरळावर पावडर लावल्याने ते इन्फेक्शन बरं होण्याऐवजी आणखीनच वाढतं. डायपर मुळे उठलेल्या पुरळावर त्यासाठी असलेलं क्रीम लावणं केव्हाही चांगलं. क्रीम लावून देखील पुरळ कमी झालं नाही किंवा तुमच्या बाळाला ताप येऊ लागला तर त्वरित डॉक्टरचा सल्ला घ्या.

बाळांना पावडर लावायची खरंच गरज असते का?

जर तुम्हाला तुमच्या बाळाच्या शरीराला सुगंध यायला हवा असेल तर मुळातच बाळाच्या शरीराला खास असा एक वास असतो, त्यांना सुगंधासाठी आणखी कशाची गरज नसते. हेच कारण आहे की बहुतांशी डॉक्टर्स वासविरहित साबण वापरण्याचा सल्ला देतात.

जर तुम्हाला असं वाटत असेल की पावडरीमुळे तुमच्या बाळाचं गुप्तांग स्वच्छ आणि कोरडं राहतं, तर तुम्ही चुकताय! पावडरीमुळे बाळाच्या त्वचेतली आर्द्रता शोषून घेतली जाते आणि त्यामुळे बाळाची त्वचा रुक्ष होते. प्रत्येक वेळी डायपर बदलल्यानंतर बाळाच्या त्वचेला पावडर लावल्याने कालांतराने बाळाच्या त्वचेला हानी पोहोचते. त्याऐवजी, पुरळ आणि दुर्गंधी टाळण्यासाठी डायपर वारंवार आणि वरचेवर बदलत राहा.

आणि शेवटचं म्हणजे, बाळांच्या शरीरात ही पावडर श्वासावाटे अजिबात जाता कामा नये. म्हणून ती बाळाच्या संपर्कात येणार नाही असं पाहा.

योग्य पावडर कशी निवडावी?

हे सर्व असूनही तुमची बाळाला पावडर लावण्याची सवय जात नसेल तर बेबी पावडर निवडताना हे काही मुद्दे नीट ध्यानात ठेवा.

१. कॉर्न स्टार्च हा पायाभूत घटक असलेल्या पावडरी निवडण्याचा प्रयत्न करा

२. पावडरीवरचे लेबल वाचा आणि टॅल्क आणि थॅलेट हे घटक असलेल्या पावडरी घेऊ नका.

३. जेव्हा केव्हा तुम्ही पावडर छिडकाल तेव्हा ती लांबून छिडका आणि थेट बाळावर छिडकू नका.

४. बाळाच्या त्वचेवर कधीही पावडर साचून राहू देऊ नका.

५. आंघोळीनंतर बाळाची त्वचा कोरडी करण्यासाठी म्हणून पावडरीचा वापर करू नका.

 

फीचर इमेज स्रोत: netdoctor.net

 

Translated by Anyokti Wadekar

loader