तुम्ही तुमच्या बाळाला ही सूपरफूड्स भरवताय का?

अन्न हा आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग असतो आणि बाळांच्या बाबतीत पौष्टिक अन्नाचं महत्व खूपच जास्त वाढतं. बाळाला आवश्यक असलेली सर्व पोषणमूल्यं आईच्या दुधात असतात ह्यात नक्कीच काहीच वाद नाही, पण बाळांनी आईच्या दुधाव्यतिरिक्त इतर अन्न खायला सुरुवात केल्यावर किंवा घन अन्नपदार्थ खायला सुरुवात केल्यावर काय होतं हे आपल्याला कळून येत नाही. हल्ली प्रौढांसाठी सूपरफूड्सचा सुकाळ आहे त्यामुळे आम्ही विचार करत होतो की बाळांना देखील सर्वोत्तम सूपरफूड्स का मिळू नयेत.

तुम्हाला हेही वाचायला आवडेल: तुमच्या नवजात बाळाला ही ५ सर्वोत्तम बेबी फूड्स द्या

सूपरफूड्स म्हणजे काय?

सूपरफूड्स म्हणजे असे अन्नपदार्थ जे बाळाला आवश्यक अशा पौष्टिकतेने खचून भरलेले असतात. त्यामध्ये अत्यावश्यक अशी सगळी व्हिटॅमिन्स, मिनरल्स, अँटी-ऑक्सिडंट्स असतात आणि भरपूर फायबर असतं ज्यामुळे ते बाळांना पचायला सोपं जातं. बऱ्याचदा, बाळ ६ महिन्यांचं झाल्यावर डॉक्टर त्याला घन अन्नपदार्थ द्यायला सुरुवात करण्यास सांगतात आणि आयांनी एकदा का हा टप्पा गाठला की बाळाला खायला काय द्यायचं आणि त्याच्या आहारात सगळी अत्यावश्यक पोषणमूल्यं कशी येतील ह्याबाबत त्यांचा खूप गोंधळ उडतो.

तुमच्या बेबी फूड्स च्या बाबतीतल्या सगळ्या काळज्यांचं समाधान म्हणजे ही सूपरफूड्स आहेत. तुमच्या सूपरबेबीच्या वयानुसार त्याला कोणती सूपरफूड्स देणं आवश्यक आहे त्याची ही यादी!

१. केळी

तुमच्या आई किंवा आजीला विचारलंत तर त्या नक्कीच ह्या अदभूत फळाबद्दल भरभरून बोलतील. केळ्यांमध्ये भरपूर डाएटरी फायबर, मॅग्निशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी ६, कॅल्शियम आणि आयर्न असतं. केळी हा ऊर्जेचा असा स्रोत आहेत ज्यातून वाढत्या बाळांना पटकन ऊर्जा मिळते आणि केळ्याचे पदार्थ बनवायलाही सोपे असतात. केळ्याचा लगदा करून, मिल्कशेकच्या स्वरूपात किंवा  थोड्या मोठ्या बाळांना आख्खी केळी देऊ शकता.

बनाना प्यूरी रेसिपी: केळी सोलून घ्या आणि मिक्सर मध्ये घालून किंवा हँड मॅशरने चांगली कुस्करून घ्या. तुम्ही त्यात एक चमचा दही सुद्धा घालू शकता आणि मग तुमच्या बाळासाठी एक हेल्दी स्मूदी तयार होईल.

कुठल्या वयात सुरु करायचं: चौथ्या महिन्यापासून पुढे

२. रताळी

गोड चवीची रताळी लहान बाळांना लगेचच आणि खूप आवडतात. रताळ्यांमध्ये भरपूर प्रमाणात बीटा-कॅरटीन, कॅल्शियम आणि पोटॅशियम असतं आणि त्यामुळे मलावरोधही बरा होतो.

रेसिपी: कुकरमध्ये रताळी वाफवून घ्या, त्यावरची साल काढा आणि चांगली कुस्करून घ्या. त्यात थोडासा गूळ घालून मंद आंचेवर शिजवून घेऊ शकता किंवा तशीच खायला देऊ शकता.

कुठल्या वयात सुरु करायचं: चौथ्या महिन्यापासून पुढे

३. अॅवोकाडो

बाळाला पहिल्यांदा घन अन्नपदार्थ देत असाल तर अॅवोकाडो हा सर्वोत्तम पर्याय आहे. अॅवोकाडो मध्ये भरपूर प्रमाणात अत्यावश्यक असं फॅट असतं जे मेंदूच्या वाढीसाठी खूपच चांगलं असतं. आणि त्याच्या बटर सारख्या टेक्श्चर मुळे तुमची बाळं कुठलेही आढेवेढे न घेता तो पटकन खातात.

रेसिपी: अॅवोकाडोची साल काढून घ्या, त्यातल्या बिया काढा आणि चांगला कुस्करून घ्या. आणि तुमच्या बाळासाठी 'ग्वाकामोली' ही डिश तयार झाली!

कुठल्या वयात सुरु करायचं: चौथ्या महिन्यापासून पुढे

४. वाळवलेली प्लम फळं

जेव्हा आपण बाळांना घन अन्नपदार्थ द्यायला सुरुवात करतो तेव्हा त्यांच्या छोट्याश्या पोटाला खूप त्रास होऊ लागतो. बिघडलेल्या आणि मलावरोध झालेल्या पोटावर वाळवलेली प्लम फळं हा सर्वोत्तम उपाय आहे. त्यात भरपूर प्रमाणात असलेल्या फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट मुळे मलोत्सर्जन सुधारतं आणि मलावरोध बरा होतो.

रेसिपी: सफरचंदं आणि वाळवलेली प्लम फळं उकडून घ्या. मिक्सरमध्ये एकत्र वाटून घ्या आणि त्याची एकदम मऊ प्यूरी बनवा.  

कुठल्या वयात सुरु करायचं: सहाव्या ते आठव्या महिन्यात

५. नारळ

 

नारळ हे एक सूपरफूड आहे हे बऱ्याच जणांना माहीत नसतं, पण नारळामध्ये लहान बाळांसाठी चांगलं असं भरपूर सत्त्व असतं. त्यामध्ये भरपूर प्रमाणात 'मीडियम चेन फॅटी अॅसिड्स' असतात आणि त्यामुळे तुमच्या बाळाची रोगप्रतिकारशक्ती आणि पचनशक्ती व्यवस्थित राहाते. आणि आयांनो, तुमच्यासाठी खुशखबर अशी आहे की तुम्ही अनेक प्रकारे ह्या अदभूत पदार्थाचा तुमच्या लहानग्याच्या आहारात समावेश करू शकता.  

रेसिपी: बाळाला भरवायचा भात नारळाच्या दुधात शिजवा त्यामुळे त्याची चव आणि स्वाद वाढेल किंवा सरळ तुमच्या बाळाच्या रोजच्या आहारात नारळपाणी समाविष्ट करा. तुम्ही खीर, पुडिंग देखील बनवू शकता किंवा एखाद्या फळाबरोबर नारळाचं खोबरं वाटून घेऊन त्याची प्यूरी बनवा. थोड्या मोठ्या बाळांच्या हातात खोबरं एक फिंगर फूड म्हणून द्या, ती ते कुरतडून कुरतडून खातील.

कुठल्या वयात सुरु करायचं: सहाव्या ते आठव्या महिन्यात

६. दही

दह्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी असतं आणि हे दोन्ही घटक हाडांच्या योग्य घडणीसाठी आणि वाढीसाठी आवश्यक आहेत. त्यामध्ये चांगले बॅक्टीरिया देखील असतात ज्यामुळे बाळाचं पोट ठीक राहतं आणि रोगप्रतिकारशक्ती कायम राहाते.

रेसिपी: बाळाला दही जसंच्या तसं दिलं जाऊ शकतं किंवा एखाद्या फळाची प्यूरी त्यात टाकून त्याचा मिल्कशेक बनवला जाऊ शकतो. पण त्यात साखर घालू नका.

कुठल्या वयात सुरु करायचं: चौथ्या ते सहाव्या महिन्यात

७. ब्रॉकली

ब्रॉकली हा फक्त प्रौढांच्याच नाही तर लहान बाळांच्या मेंदूसाठीही पौष्टिक असा अन्नपदार्थ आहे. त्यामध्ये व्हिटॅमिन सी, बीटा-कॅरटीन, फॉलिक अॅसिड, आयर्न, पोटॅशियम आणि फायबर असतं. ब्रॉकली पाण्यात उकळवल्याने त्यातलं व्हिटॅमिन सी नष्ट होतं. त्यामुळे ती शिजवण्याआधी वाफवून घ्या.

रेसिपी: ब्रॉकली कुकरमध्ये वाफवून घ्या आणि ती चांगली कुस्करून त्याची प्यूरी बनवा. त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि मिरपूड घाला. तुमच्या बाळाला ही रेसिपी नाही आवडली तर रताळी किंवा बटरनट स्क्वाॅश सारख्या गोड चवीच्या भाज्यांबरोबर ब्रॉकली मिक्स करून द्या. ब्रॉकलीचं सूपही बाळासाठी चांगलं असतं.

कुठल्या वयात सुरु करायचं: आठव्या ते दहाव्या महिन्यात

८. डाळी

अशी कुठलीही भारतीय आई नसेल जिने आपल्या बाळाला डाळ भरवली नसेल. डाळी किंवा (शिजवलेली) डाळ हा प्रोटीनचा सर्वात चांगला स्रोत आहे आणि प्रोटीन हे वाढत्या मुलांसाठी एक महत्वाचं पोषक तत्त्व आहे. डाळी ह्या भाताबरोबर शिजवून घोटून घेता येतात किंवा त्यांची खिचडी बनवता येते किंवा सूप म्हणूनही देऊ शकतो. त्याशिवाय, त्यातल्या फायबरच्या भरपूर प्रमाणामुळे बाळांना ती पचवण्यास सोपी जाते.

रेसिपी: चांगली घोटून घेता येण्याइतपत डाळ कुकरमध्ये शिजवून घ्या. डाळीचं पाणी वापरून सूप बनवा किंवा भाताबरोबर ही डाळ वाढा.

कुठल्या वयात सुरु करायचं: सहाव्या ते आठव्या महिन्यात

ही सारी सूपरफूड्स बाळांसाठी पूर्णपणे सुरक्षित आणि सहजतेने पचण्यासारखी आहेत, तरीही एखाद्या विशिष्ट अन्नपदार्थांच्या बाबतीत तुम्हाला काही चिंता वाटली तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

Transltated by Anyokti Wadekar

loader