तुमचं मूल सेक्स करत असल्याची (किंवा त्याबद्दल विचार करत असल्याची) ५ लक्षणं

जमाना भलताच बदललाय. आपली मुलं भरभर वाढतायत, सेक्सविषयीचा मजकूर त्यांना (चित्रपट आणि पॉप संस्कृतीमुळे) योग्य वेळेच्या खूप आधीच उपलब्ध होतोय. आणि एका दशकापूर्वी जन्मलेल्या मुलांपेक्षा त्यांच्यात सेक्सबद्दलचं कुतूहल जास्त आहे. अशा काळात तुम्हाला कळलं की तुमची लहान, निरागस मुलं सेक्ससंबंधी काही अनुभव घेऊ लागलीयत, तर ते नक्कीच धक्कादायक असेल तुमच्यासाठी. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की "छे! माझ्या ६ वर्षांच्या मुलाला कुठलं आलंय सेक्सबद्दल कुतूहल", तर तुम्ही चुकत आहात. लहान मुलं अगदी जातीने सेक्सबद्दल विचार करत नसली, तरी वाढत्या वयासोबत त्यांना त्यांच्या स्वतःच्या — आणि सभोवतालच्या माणसांच्या — शरीराबद्दल कुतूहल वाटू लागतं — जसं की ह्या बातमीद्वारे बहुधा कळून येतं.

अशा वेळी, पालकांनी आपल्या मुलांकडे कदाचित थोडं जास्त लक्ष दिलं पाहिजे — ती कशी वागतात, कुठल्या प्रकारचे कपडे घालतात आणि कशी बोलतात, त्यांचे मित्रमैत्रिणी कोण आहेत, इत्यादी. तुमचं मूल सेक्सच्या बाबतीत सक्रिय आहे का, हे खालील पाच लक्षणांच्या आधारे तुम्हाला कळू शकेल.

त्यांना गोपनीयता अतिप्रिय वाटू लागलीय

तो जमाना गेला, जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांच्या खोलीत केव्हाही जाऊ शकायचात. आता असा काळ आलाय की त्यांच्या खोलीचं दार बहुधा बंद असतं आणि त्यांना असं वाटतं की तुम्ही खोलीत शिरण्यापूर्वी दार ठोठवावं. त्यांचा मोबाइल फोन सदैव त्यांच्या हातात असतो आणि त्याव्यतिरिक्त इतर कुठेही तो तुम्हाला सापडत नाही. कुणाचाही कॉल घेताना किंवा मेसेजेस वाचताना ती नेहमीच तुमच्यापासून फोन लपवण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून तुम्हाला कळू नये की कोण त्यांना कॉल/मेसेजेस करतंय. आणि काहीवेळा तर ती आपला फोन पासवर्ड टाकून लॉक करून ठेवतात. थोडक्यात, जेव्हा गोपनीयतेचा प्रश्न येतो तेव्हा मानसिक पातळीवर मुलं अविश्वासू आणि साशंक बनून गेलेली असतात.

प्रश्न विचारण्याची तुम्हाला सोय नाही

जर तुमचं मूल सेक्सविषयीच्या कृती करत असेल तर तुमचं काही गोष्टींबद्दल त्याला प्रश्न विचारणं, त्याला अजिबात रुचणार नाही. मग ते प्रश्न त्याच्या मित्रमैत्रिणींबद्दलचे असोत किंवा ते कुठे जात आहे आणि केव्हा परतणार याविषयी असोत. अशा प्रकारच्या भावनिक उद्रेकाची दोन कारणं असतात: आपण नक्की काय करतोय हे पालकांना कळण्याची भीती आणि तुमच्यापासून काही लपवत असल्याची अपराधीपणाची भावना.

तुम्ही कुठे जाताय आणि केव्हा परतणार याची माहिती त्यांना हवी असते

तुमचं मूल, विचित्र, आगळं काही करत असल्याचं हे सर्वात प्रबळ लक्षण आहे. तुम्ही कुठे बाहेर जात असाल तर तुमची मुलं तुम्हाला विचारतील — तेही अशा पद्धतीने, की तुमच्या काही लक्षातही येणार नाही — की तुम्ही कुठे निघालाय आणि त्याहूनही महत्वाचं, की तुम्ही केव्हा परतणार. ही माहिती त्यांना का हवी असते हे तर उघडच आहे.

त्यांचे मित्रमैत्रिणी तेव्हा घरी येतात, जेव्हा तुम्ही घरी नसता

तुमच्या असं लक्षात येईल की त्यांचे काही ठराविक मित्रमैत्रिणी त्यांना भेटायला, तुम्ही घरी असताना कधीच येत नाहीत, तरीही तुम्ही बाहेरून कुठून घरी आलात की हेच मित्रमैत्रिणी नेहमीच तुम्हाला घरात आढळतात. अशा वेळी तुम्ही सावध व्हायला हवं.

आपल्या दिसण्याबाबत तुमची मुलं जरा जास्तच चोखंदळ होतात

थोडं मोठं झाल्यावर मुलांचं आपल्या दिसण्यात, पेहरावात रस घेणं स्वाभाविक आहे. पण जेव्हा तुमचं मूल सेक्सविषयीच्या कृतींमध्ये भाग घेत असेल तेव्हा रुबाबदार दिसणं त्याला अधिकाधिक आवडू लागतं — अंगप्रदर्शन करणारे, तोकडे कपडे, अति मेकअप, छानदार केशरचना, परफ्यूम वापरणं. तुम्ही त्यांना खरेदीसाठी बाहेर घेऊन गेलात की त्यांना अचानकपणे ब्रॅंडेड कपडे हवेसे होतात. दिमाखदार पेहराव करणं काहीअंशी निरुपद्रवी असलं तरी मुलांची कुठलीही वागणूक अतिरेकी होऊ नये ह्याबाबत सावध राहा.

Translated by: Anyokti Wadekar

loader