बाळंतपणानंतर वजन घटवण्यासाठी करीना कपूर आणि ऋजुता दिवेकरच्या ५ अभिनव टिप्स

तुमचं बाळ येण्याआधी तुम्ही कितीही फिट असलात तरी बाळंतपणानंतर वजन घटवणं अजिबात सोपं नसतं. आम्ही असं का म्हणतोय? भारतातली, वयाच्या ३६व्या वर्षी सर्वांत जास्त फिट असलेली स्त्री, करीना कपूर खान, हिने एका व्हिडिओमध्ये हे उघड करून सांगितलंय की डिलिव्हरीनंतरचा तिचा आहार आणि तिचा व्यायाम हा कसा पूर्वीसारखा असू शकत नाही. तिला पाठिंबा देत सेलेब्रिटी आहारतज्ञ ऋजुता दिवेकर प्रेक्षकांना हे सांगते, की बाळ झाल्यावर त्यांना वजन घटवण्याच्या मार्गाला लागायचं असेल तर त्यांनी कोणत्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. 

हिंदुस्थान टाईम्स मध्ये सतरूपा पॉल यांनी लिहिलेल्या एका उत्तम लेखामध्ये तुमच्यासाठी ह्या मुलाखतीचा सारांश देण्यात आला आहे. 

गरोदरपणात करीना कपूर खानने जे भरपूर तूप आणि पराठे खाल्ले त्यामुळे तिचं वजन १८ किलोंनी वाढलं. 

"आणि हॉस्पिटलमध्ये प्रवेश करण्याच्या दिवसापर्यंत मी माझं ते वजन, माझ्या दुहेरी हनुवटीसकट, दिमाखात मिरवलंही. लोक मला सांगत की वजन वाढू नये म्हणून मला ग्रिल केलेले मासे आणि मांस खाता येईल. पण मला माझं बाळंपण परंपरागत पद्धतीने, योग्य पद्धतीने करायचं होतं. म्हणून मग मी सगळं खायचे, पण योग्य प्रमाणात खायचे," करीना म्हणते. 

करीनाची आहारतज्ञ ऋजुता दिवेकर हिच्या म्हणण्याप्रमाणे करीना कपूर खानसाठी उद्दिष्ट हे होतं की एकावेळी एकच गोष्ट व्यवस्थित करावी आणि घाईगडबडीने ही प्रक्रिया करू नये. "कारण आम्हाला एक पाऊल पुढे जाऊन पुन्हा दोन पावलं मागे यायचं नव्हतं, जे तुम्ही जेव्हा अत्यंत तातडीचं किंवा टोकाचं डाएट करता तेव्हा होतं," चॅट मध्ये सहभागी असलेली ऋजुता म्हणाली.  

तुमच्या गरोदरपणाच्या नऊ महिन्यांत तुमच्या शरीरामध्ये जे काही बदल झाले ते पुन्हा पूर्ववत करणं हे उद्दिष्ट असतं. 

"माझं जे वजन वाढलं होतं ते घटवणं हेच फक्त माझं ध्येय नव्हतं. मला एका रात्रीत माझ्यात बदल झालेला पाहायचा नव्हता. कितीही वेळ लागला असता तरी चालेल पण मला या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान हलकं, आनंदी आणि उत्साही वाटायला हवं होतं. आणि ते खूप महत्वाचं आहे," करीना कपूर खान म्हणाली. 

बाळंतपणानंतर शरीर सुदृढ बनवत आणि राखत असतानाच ते पुन्हा सुडौल कसं बनवावं याबाबत बरंचसं मार्गदर्शन या संभाषणातून, नुकताच बाळाला जन्म दिलेल्या स्त्रियांना मिळालं. 

त्या संभाषणातले हे काही मुद्दे:

१. "एक खूप महत्वाची गोष्ट सर्व स्त्रियांनी लक्षात ठेवली पाहिजे ती ही, की एका बाळंतपणात, तुमच्या शरीरातलं पाच वर्षं जमा झालेलं जेवढं कॅल्शियम असतं ते वापरलं जातं आणि म्हणून संपतं," करीना कपूर खान म्हणाली. "आणि म्हणून शरीर पुन्हा सुडौल बनवणं ह्याचा अर्थ असा होतो की शरीरातली कॅल्शियमची पातळी वेगाने वाढायला हवी." करीना रोज रात्री एक मोठा ग्लास भरून दूध नित्यनेमाने पीत आली आहे. 

दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये सी एल ए (कॉन्जुगेटेड लिनलीअक अॅसिड) भरपूर प्रमाणात असतं ज्यामुळे शरीरातल्या फॅट्सचं अधिकाधिक निर्मूलन होतं, ऋजुता स्पष्ट करून सांगते. "आणि त्यामध्ये शॉर्ट चेन फॅटी अॅसिड्सही भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे शरीरातल्या काही भागावरचं चिवट असं फॅट स्थानांतरित होऊ लागतं, जसं की पोटावरचं," ऋजुता म्हणाली. 

२. डिलिव्हरीनंतर बऱ्याच स्त्रियांना डोळ्यांखाली जी काळी वर्तुळं येतात त्याबाबत बोलताना ऋजुताने असं सुचवलं की ज्या पदार्थांमध्ये व्हिटॅमिन बी १२ आणि लोह भरपूर प्रमाणात असतं अशा पदार्थांचं आहारातलं प्रमाण वाढवावं - उदाहरणार्थ - दही, ताक आणि लोणचं. "करीनाला जे आवडतात, त्या तिळाच्या लाडवांमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात बी १२ आणि लोह असतं ज्यामुळे डोळ्यांखालची काळी वर्तुळं निघून जातात. पण म्हणून कशावरही भरपूर ताव मारायचा नाही. जे काही खाल ते नियंत्रित प्रमाणात खायचं." ओल्या खोबऱ्यासोबत गूळ आणि बाजरीच्या भाकरीबरोबर तूप आणि गूळ हे आणखी काही पदार्थ आहेत जे तुम्ही तुमच्या शरीरातलं लोहाचं प्रमाण वाढवण्यासाठी खाऊ शकता. 

३. "माझ्या डिलिव्हरीनंतर माझं वाढलेलं वजन घटवण्याच्या बाबतीत मी खूपच धास्तावले होते," करीना म्हणाली. "मी ऋजुताकडे असाही आग्रह धरला की तिने माझं, 'टशन' ह्या चित्रपटाच्या वेळचं डाएट पुन्हा सुरु करावं. पण ती मला म्हणाली की ते डाएट आपण आता करू शकत नाही कारण यावेळी आपल्याला शरीर पुन्हा सुडौल करण्याचं कार्य हे हळूहळू, क्रमाक्रमाने करायचं आहे." 

करीनाला जे भात खायला सांगितलं गेलं होतं, तेही दिवसातून दोनदा, त्याबाबतही करीना बरीच साशंक होती! "जिकिरीच्या अशा डिलिव्हरीमुळे शरीरातले जे चांगले बॅक्टीरिया नष्ट होतात ते भात खाल्यामुळे पुन्हा निर्माण होतात, हे त्यामागचं कारण आहे," ऋजुता समजावून सांगते.  

४. या दोघीही एक गोष्ट वारंवार सांगत होत्या ती म्हणजे, अत्यंत तातडीच्या (क्रॅश) डाएट्स पासून दूर राहण्याचं महत्व. "ह्या डाएट्समुळे जीवनशैलीसंबंधातले बरेचसे आजार उद्भवतात, उदाहरणार्थ बाळंपणानंतरचा थायरॉईड," ऋजुता सांगते. "कारण जेव्हा तुम्ही क्रॅश डाएट करत असता तेव्हा तुमचा कॅलरी इन्टेक इतका कमी होतो की तुमच्या शरीराचा चयापचयक्रियेचा वेग नाईलाजाने मंदावतो."

नुसतंच वजन न घटवता तुमच्या हाडांची आणि स्नायूंची घनता पूर्ववत करणंही महत्त्वाचं आहे. "तुमच्या शरीरातलं हाडांचं आणि स्नायूंचं प्रमाण जितकं जास्त तितकं तुमचं शरीर आटोपशीर दिसू लागतं. आणि हाडं आणि स्नायू जितके कमी तितके तुम्ही जास्त स्थूल दिसू लागता," ऋजुता म्हणाली. म्हणून तुम्ही जेव्हा क्रॅश डाएट करता तेव्हा कदाचित तुमचं वजन घटतं, पण तरीही तुम्ही स्थूलच दिसता. 

५. शरीर पुन्हा सुडौल करण्यासाठीच्या डाएटबरोबर जेव्हा त्याला पूरक अशा व्यायामप्रकारांचा प्रश्न येतो तेव्हा करीना आणि तिची आहारतज्ञ दोघीही 'चालणे' या व्यायामप्रकाराला सर्वश्रेष्ठ मानतात. "ऋजुता नेहमीच म्हणते की चालणं हा जगातला सर्वोत्कृष्ट व्यायाम आहे. बाळंतपणानंतर जेव्हा ट्रेडमिलवर उभं राहणंसुद्धा कठीण वाटतं तेव्हा २० ते ३० मिनिटं चालण्याने खरंच खूप मदत होते," करीना कपूर खान म्हणाली. "चालण्याने मला खूप उत्तम मदत झालीय. माझ्या शरीराचा गाभा बळकट होत असलेला मला केव्हाच जाणवू लागलाय." 

Translated by Anyokti Wadekar

loader