पोटावरची चरबी कमी करण्यासाठी ऋजुता दिवेकरच्या ५ ब्रेकफास्ट टिप्स!

ऋजुता दिवेकर जेव्हा डाएट, अन्न आणि न्यूट्रिशन बद्दल बोलते तेव्हा ती रोखठोकपणे बोलते. आणि ती अजूनही तेच बोलतेय जे ती नेहमीच बोलत आलीय -- थिंक ग्लोबल - ईट लोकल!

ते साखर आणि दुधाने भरलेलं पेय जे त्यातल्या पत्तीचा चोथा होईपर्यंत उकळलं गेलंय, ते पिण्यासाठी उचलण्याआधी, थांबा! अशाने तुम्हाला करीना कपूर सारखं तेज प्राप्त होणार नाही किंवा त्यामुळे तुमचं मफिन-टॉप सारखं दिसणारं पोट तर नक्कीच कमी होणार नाही.

ऋजुताच्या सल्ल्याने, करीना तिच्या दिवसाची सुरुवात अशा प्रकारे करते.

१. सकाळी उठल्यावर एक केळं

केळं का? निसर्ग विशिष्ट अन्नपदार्थ एका ठरावीक वेळी उपलब्ध करून देतो कारण त्या पदार्थांचं पोषणमूल्य त्या ऋतू मध्ये सर्वात जास्त असतं. केळ्याची दाट गोड चव आणि त्याबरोबरीने त्यातली पोटॅशियम आणि इतर पोषक द्रव्यं सलग ८ तास काहीही न खाल्लेल्या शरीराला, लगेचच ऊर्जा प्राप्त करून देतात.

त्यानंतर करीना व्यायाम करते. तिच्या व्यायामाचे व्हिडिओ तुम्ही अजून पाहिले नाहीत का? ते व्हिडिओ इथे पाहा.

२. व्यायामानंतर १ ग्लास प्रोटीन शेक आणि एक उकडलेला बटाटा

का? ह्याकरता की प्रोटीन पुरेशा प्रमाणात असल्याशिवाय आपले स्नायू व्यायामानंतर लवकर पूर्वपदावर येत नाहीत. कसून व्यायाम केल्यानंतर शरीराला पुन्हा पोषण न दिल्यामुळे तुमच्या शरीराला इजा होऊ शकते. प्रोटीन शेक्स पिण्यामुळे वजन घटवायला सुद्धा मदत होते.

३. आणि आता सरतेशेवटी, आपण ब्रेकफास्ट करू शकतो!

पर्याय #१: कांदे पोहे

तर मग कार्बोहायड्रेट्स खातोय तर आपण. घरी बनवलेले आणि गरमागरम वाढलेले कांदेपोहे म्हणजे ऋजुताच्या मते ब्रेकफास्ट मधला निर्वाणीचा शब्द. ह्या पदार्थात आयर्न भरपूर प्रमाणात असतं आणि हा पदार्थ म्हणजे एक पूर्णान्न आहे. कार्बोहायड्रेटचा एक चांगला स्रोत असून देखील ह्या साध्यासोप्या पदार्थामध्ये ग्लूटन फारच कमी प्रमाणात असतं. भारतीयांच्या आवडत्या ह्या वैशिष्ट्यपूर्ण ब्रेकफास्ट डिशमध्ये शेंगदाणे आणि भाज्या घातल्यामुळे त्याची चव आणि पौष्टिकता आणखीनच वाढते.

पोषणमूल्य: एक बाऊलभर पोह्यांमध्ये २४४ कॅलरीज असतात.

पर्याय #२: अंड्याच्या पांढऱ्या भागाचं ऑम्लेट

हा एक चविष्ट पदार्थ आहे. अंड्याचा पांढरा भाग हा एक लो-कॅलरी अन्नपदार्थ आहे आणि त्यामध्ये सॅचुरेटेड फॅट किंवा कोलेस्टरॉल नसतं. अंड्याच्या पांढऱ्या भागात कार्बोहायड्रेट्स किंवा साखर नसते पण तो रायबोफ्लेविन आणि सलेनिअम चा चांगला स्रोत आहे. आणखी असं की, प्रत्येक अंड्याच्या पांढऱ्या भागात ५४ मिलिग्रॅम पोटॅशियम, एक इसेन्शल मिनरल आणि ५५ मिलिग्रॅम सोडियम असतं.

पोषणमूल्य: एका अंड्याच्या पांढऱ्या भागात फक्त १७ कॅलरीज असतात (तर प्रत्येक आख्ख्या अंड्यामध्ये ७१ कॅलरीज असतात).

पर्याय #३: लापशी उपमा

लापशी उपमा हा अत्यंत पौष्टिक असतो आणि त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, फायबर, प्रोटीन, कॅल्शियम, आयर्न, मॅग्निशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम आणि झिंक असतात. आणि अर्थातच त्यामध्ये (बी-कॉम्प्लेक्स गटातली) काही व्हिटॅमिन्स असतात. लापशीचं पचन शरीराद्वारे हळूहळू होतं आणि त्यामुळे तुमचं पोट खूप वेळासाठी भरलेलं राहातं. त्यामुळे तुम्हाला इतर अरबट चरबट काही खायची गरज नाही. लापशी मध्ये असलेली व्हिटॅमिन्स तुमच्या रोगप्रतिकारशक्ती करता चांगली असतात. त्यातली व्हिटॅमिन बी आणि ई ही मुख्यत्वाने तुमच्या शरीरातल्या रोगप्रतिकार प्रणालीला मजबूत बनवतात.

पर्याय #४: इडली/ डोसा

चटणी आणि सांबार बरोबर सर्व्ह केल्या जाणाऱ्या हलक्याफुलक्या इडल्या म्हणजे प्रत्येक दाक्षिणात्य माणसासाठी स्वर्गच जणू. पण सर्वोत्कृष्ट ब्रेकफास्ट म्हणून लोकांच्या पसंतीचा बहुमान इडली डोशाला फक्त ह्या एका कारणामुळे मिळत नाही. इडली आणि डोशामध्ये असणारे तांदूळ आणि उडीद डाळ हे एकमेकांना पूरक असे पदार्थ आहेत, ज्यामुळे त्यांची जोडी ही एक प्रथिनांची परिपूर्ण जोडी आहे. इडली/ डोसा बनवताना जी आंबवण्याची प्रक्रिया वापरली जाते त्यामुळे त्यातल्या स्टार्चचं विघटन होतं, ज्यामुळे ह्या पदार्थांचा शरीरातला चयापचय सहजपणे होतो.

पोषणमूल्य: प्रत्येक इडली मध्ये फक्त ३९ कॅलरीज असतात आणि हे प्रमाण रोजच्या २००० कॅलरीजच्या आरोग्यपूर्ण आहाराच्या तुलनेत अत्यल्प आहे.

पर्याय #५: पराठा

पराठ्यामध्ये तूप असतं म्हणून त्यापासून दूर राहू नका. एखाद्या नववधू सारखं तेज आपल्या चेहऱ्यावर कायम राहावं याकरता भारतीय आहारामध्ये तुपाला किती महत्व आहे, हे ऋजुता नेहमीच सांगत आली आहे. म्हणून, चला, एक खमंग पराठा बनवा आणि आवडत असेल तर तो बाऊलभर घरी लावलेल्या/ विकतच्या डबाबंद दह्यासोबत खा!

पोषणमूल्य: १०० ग्रॅम एवढ्या पराठ्यामध्ये २८५ कॅलरीज असतात.

वाॅव! अशा भरपूर ऊर्जा देणाऱ्या ब्रेकफास्टसोबत तुमच्या दिवसाची सुरुवात दमदारपणे करा!

Translated by Anyokti Wadekar

loader