४ बेबी प्रॉडक्ट्स जी तुम्ही कधीच खरेदी करू नयेत

पालक म्हणून आपल्या मुलाचं आयुष्य अधिक चांगलं बनवण्याला आपण सर्वात जास्त महत्व देतो. आपण सर्वोत्तम डायपर्स, महागडे कपडे आणि आपल्या मुलाच्या विकासात मदत करतील अशी खेळणी, इत्यादी अनेक वस्तूंवर खर्च करतो. पण काहीवेळा नकळतपणे आपण अशी प्रॉडक्ट्स खरेदी करतो जी नुसताच आपल्या मुलाच्या विकासात अडथळा आणत नाहीत तर त्यांची पावलं अधोगतीकडे वळवतात. आणि ही प्रॉडक्ट्स खूप विशिष्ट प्रकारची अशी नसतात, बरेचसे पालक ही प्रॉडक्ट्स दररोज वापरतात.

वॉकर्स

तुम्हाला असं वाटलं असेल की वॉकर ही चांगली गोष्ट आहे कारण त्यामुळे मुलाला आजूबाजूला मोकळेपणाने फिरता येईल. तुमचा यामागचा हेतू जरी चांगला असला तरी जगभरातले पीडियाट्रिशन्स वॉकर्स च्या वापराला तीव्रतेने मनाई करतात. कॅनडा मध्ये बेबी वॉकर्स वर २००४ मध्येच बंदी घालण्यात आली! वॉकर्स मुळे नुसताच बाळाच्या तोल सांभाळण्याच्या आणि चालायला शिकण्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीवर परिणाम होत नाही तर त्यामुळे आधी बाळाच्या हातात पोहोचू शकत नव्हत्या अशा धोकादायक वस्तू त्यांच्या सहज हातात येतात. आणि महत्वाचं म्हणजे बाळ जर स्वतःहून त्याच्या पायांचा उपयोग करायला शिकत नसेल तर म्हणजे मग त्याचा अर्थ असा होतो की ते त्याच्या मेंदूचा वापर देखील करत नाहीये.

त्याऐवजी तुम्ही काय करू शकता: बाळाला स्वतःहून मोकळेपणाने आजूबाजूला फिरू द्या. बाळ खूप वेळा धडपडेल पण लक्षात ठेवा धडपडण्यातूनच ते शिकत असतं आणि बाळाला उपजत प्रेरणा खूप असतात. तुमचं लहान बाळ भरभर चालू शकत नाही त्यामुळे त्याच्यावर मर्यादा येतात की काय, असं वाटू शकतं पण ते ठीक आहे. एकदा का बाळ चालायला शिकलं की त्याला कुणीच थांबवू शकत नाही.

सिपी कप्स

बहुतांशी पालक सिपी कप्स दोन कारणांसाठी घेणं पसंत करतात: मूल पाणी पिताना पाणी सांडत नाही, आणि "ते बाटलीतून पाणी पिण्यासारखं असल्यामुळे" सोपं पडतं. सर्वात आधी म्हणजे, स्तनपान, बाटलीतून पिणं आणि सिपी कप हे सर्व एकमेकांहून पूर्णपणे वेगळे आहेत. स्तनपानामुळे आणि बाटलीतून पिण्यामुळे काही समस्या उद्भवत नाहीत कारण निपलचा शेप बदलणारा असतो पण प्लॅस्टिकच्या सिपी कप्स मध्ये असं होत नाही. त्यामुळे सिपी कप्समुळे ओरल कॅव्हिटी मध्ये कायमचे बदल होतात आणि त्यामुळे पुढे दातांच्या समस्या आणि बोलण्याविषयीच्या समस्या सुद्धा होऊ शकतात.

त्याऐवजी तुम्ही काय करू शकता: साधारण ग्लासचा वापर करा. जर ते त्याच्यासाठी किंवा तिच्यासाठी खूप मोठं असेल तर त्याऐवजी कपचा वापर करा. (मोठ्या तोंडाच्या भांड्यातून पाणी कसं प्यायचं हे अजून माहीत नसल्यामुळे) जेव्हा तुमचं बाळ पाणी खूप जोरात तोंडात ओढेल तेव्हा पाणी सांडेल किंवा त्याला खोकला येईल पण ते हळूहळू शिकेल. यामुळे बाळाची मोटर स्किल्स सुद्धा सुधारतात (ग्लास दोन्ही हातांनी पकडणं).

पॅसिफायर्स

पॅसिफायर्स हे परंपरेने परदेशात खूप अधिक लोकप्रिय असले तरी एसआयडीएस (सडन इन्फॅंट डेथ सिंड्रोम) चा धोका ह्या पॅसिफायर्स मुळे कमी होत असल्याने पॅसिफायर्स आता भारतीय बेबी स्टोअर्स मध्ये सुद्धा दिसू लागले आहेत. बाळाला भरवण्याच्या मधल्या काळात बाळांनी अंगठा चोखू नये म्हणून बरेचसे पालक त्यांना पॅसिफायर्स देतात. त्यामुळे बाळाला सुरक्षित वाटतं. फ्लाईट मध्ये विमान अचानकपणे खाली उतरत असताना काही बाळांना जेव्हा कसंसच वाटतं तेव्हा सुद्धा पॅसिफायर्स उपयोगी पडतात. असं असलं तरी, काही तज्ञ बजावतात की पॅसिफायर्स वापरल्यामुळे पुढे दातांच्या समस्या उद्भवू शकतात. काहीवेळा पॅसिफायर्स मुळे कानाचं इन्फेक्शन सुद्धा होऊ शकतं.

त्याऐवजी तुम्ही काय करू शकता: पॅसिफायर्सचा कमीत कमी वापर करा. तुमच्या बाळाला त्यावर अवलंबून राहण्याची सवय होते म्हणून त्याचा वापर कमी केला पाहिजे. तुम्ही फ्लाईटच्या दरम्यान पॅसिफायरचा वापर करत असाल तर त्याऐवजी बाळाच्या तोंडात थोडा गूळ ठेवून बघा, कारण तो गिळण्याच्या प्रक्रियेमुळे बाळाला कानामध्ये वाटणारी अस्वस्थता कमी होते.

बोलणारी खेळणी

तुम्ही हे कधी ओळखलंतच नाही, नाही का? बऱ्याच पालकांना चमचमती, बोलणारी खेळणी घेण्याची खूप उत्सुकता असते कारण बाळाची ती आवडती असतात. आणि बाळांना अशी खेळणी आवडतातच ह्यात शंकाच नाही. त्यांना ह्या अशा रंगीत आणि चालत्याबोलत्या वस्तू आवडतात (म्हणूनच त्यांना तुमच्या मोबाईल फोनचं देखील आकर्षण वाटतं). पण दुर्दैवाने, पालकांना जरी असं वाटत असलं की ह्या बोलत्या खेळण्यांमुळे मुलं कदाचित लवकर बोलू लागतात तरी तज्ञांचं असं मत आहे की याला काहीच अर्थ नाही. उलट या गोंगाट करणाऱ्या बोलत्या खेळण्यांमुळे मुलं आणखी उशिराने बोलू लागतात. समस्या अशी आहे की, बोलणं ही एकमार्गी प्रक्रिया आहे. बाळांसाठी बोलायला शिकण्याचा उत्तम मार्ग म्हणजे अनुकरण करणं आणि बाळं तसं करतातही. तुमच्या असं लक्षात येईल की तुम्ही बोलत असताना तुमचं बाळ तुमच्या तोंडाकडे टक लावून बघत असतं, आणि मग स्वतःदेखील बोलण्याचा प्रयत्न करतं. मग जेव्हा तुम्ही तुमच्या लहानग्याला इलेक्ट्रॉनिक बोलत्या खेळण्यासमोर बसवता तेव्हा काय होतं? ह्या होणाऱ्या तोट्याशिवाय अजून एक समस्या आहे: बोलणारी खेळणी ही मुलांच्या कल्पकतेला आणि कल्पनाशक्तीला प्रोत्साहन देत नाहीत.

त्याऐवजी तुम्ही काय करू शकता: चमचमती, झगमगीत खेळणी एखाद दुसऱ्या वेळेस द्या, नियमितपणे देऊ नका. बाळाला साध्याच चालत्याबोलत्या नसलेल्या खेळण्यांबरोबर खेळू द्या. नुसत्या एखाद्या चमच्याने किंवा रिकामी खोक्याने सुद्धा बाळांना किती मज्जा वाटते हे बघून तुम्हाला आश्चर्य वाटेल. प्रयत्न तर करून बघा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, तुमच्या मुलाशी बोला. तुमच्या मुलाशी सुसंवाद साधण्याचं त्याहून अधिक चांगलं साधन नाही.

Translated by Anyokti Wadekar

loader