ह्या ३ गोष्टी एका आईने दुसऱ्या आईला कधीही बोलू नयेत

आपण सगळ्याच या प्रसंगांतून गेलोय, बरोबर? आपली पालकत्वाची कौशल्यं किती चांगली आहेत, आपला डिलिव्हरीचा अनुभव कसा होता, आपलं मूल कसं खूप लवकर बोलायला लागलं इत्यादी विषयांवर आपण बोलतो. पण काही गोष्टी अशा आहेत ज्या आयांनी एकमेकांना कधीही बोलू नयेत कारण आपण सगळ्या एकाच गटात मोडतो नाही का?

इथून निवडले आहे: द हेल्थ साईट

स्त्रिया इतर स्त्रियांची नालस्ती करतात, किशोरवयीन मुलं इतर मुलांची नालस्ती करतात, आणि आई असलेल्या स्त्रिया इतर आयांची नालस्ती करतात. आयांमध्ये बऱ्याच गोष्टीवरून लढाया होतात, नोकरी करणाऱ्या आया आणि घरबसक्या आयांमध्ये, स्तनपान करणाऱ्या आया आणि बाळाला फॉर्म्युला फूड भरवणाऱ्या आयांमध्ये. पालकत्व स्त्रीने स्वीकारावं की पुरुषाने यावरून. एक आई म्हणून माझी सुद्धा नालस्ती केली गेलीय आणि मला इतरही अशा स्त्रिया माहीत आहेत ज्या ह्या अनुभवातून गेल्या आहेत, आणि मला फक्त इतकंच म्हणायचंय - जे बुद्धाने सांगितलंय त्याचा अंगीकार करा, 'मौनाहून चांगलं काही बोलण्यासारखं असेल तरच बोला'. ह्या आहेत काही गोष्टी ज्या कुठल्याही परिस्थितीत एका आईने दुसऱ्या आईला बोलू नयेत.

तुमच्या मुलाच्या प्रगतीची त्यांच्या मुलाच्या प्रगतीशी तुलना करणं: प्रत्येक मूल आपल्या 'व्यक्तिगत' वेगाने वाढत असतं. २ वर्षांचं असताना माझं मूल खूप बडबड करतं पण शी कुठे आणि कशी करावी हे त्याला कळत नाही. आणि मला १८ महिन्यांची अशी मुलं माहीत आहेत ज्यांना शी कुठे आणि कशी करावी हे कळतं पण ज्यांनी अजून त्यांचा पहिला स्पष्ट शब्द उच्चारलेला नाही. तर मग या दोन्हीपैकी कुठल्याही मुलाची वाढ 'उशिराने' होतेय असं म्हणता येईल का? तर नाही. खरंतर आपण मुलांच्या प्रगतीकडे त्यांची व्यक्तिगत कामगिरी म्हणून बघितलं पाहिजे. हो, अर्थात, काही एक प्रकारची प्रगती ही एका ठरावीक वयातच झाली पाहिजे, पण ते ठरवणं हे एका व्यावसायिक बालरोगतज्ञाचं काम आहे.

आई आपल्या बाळाला कशा प्रकारे भरवते: होय, स्तनपानाद्वारे मिळणारं दूध हे बाळासाठी सर्वात पोषक असतं, आणि आजकालच्या कुठल्याही आईला हे माहीत नाही असं नाहीये. तरीही, सगळ्याच स्त्रियांना स्तनपान करता येतंच असं नाही आणि त्याची बरीचशी कारणं असतात. म्हणून जर तुम्ही बाळाला स्तनपान देणाऱ्या आई असाल तर तुमची 'स्तनपानातली कामगिरी' लोकांना सतत सांगत राहू नका. तुम्ही तुमच्या बाळासाठी उत्तम जे काय ते केलंत, तसंच जसं की बाळाला फॉर्म्युला फूड भरवणाऱ्या आईने केलं.

मुलाला शाळेत केव्हा घालायचं ह्याबद्दल मतं असणं: माझ्या मुलीचा पहिला वाढदिवस झाल्यापासून, लोक चिंतित होऊन मला विचारू लागले की मी तिला शाळेत केव्हा घालणार. त्यावर माझं उत्तर - इतक्यात नाही. आणि मला कळत नाही की कुणालाही ह्या गोष्टीची एवढी चिंता का वाटते. मला १८ महिन्यांच्या मुलाला 'प्लेस्कूल' मध्ये पाठवण्याची काहीच गरज दिसत नाही, हे तसंच आहे जसं की तुम्हाला कळत नाही की मला प्लेस्कूल्स अनावश्यक का वाटतात. तुम्हाला शिक्षणाविषयी काही चर्चा करायची असेल तर मला सांगा. पण उशिरा शाळेत घातल्यामुळे माझी मुलगी कशी खूप साऱ्या गोष्टींना मुकेल, हे जर तुम्हाला मला सांगायचं असेल, तर एक खुर्ची घ्या आणि मी तुमच्याकडे लक्ष देण्याची वाट बघत बसा.

Translated by Anyokti Wadekar

loader