१५ अत्यंत लोकप्रिय भारतीय ब्रेकफास्टचे पदार्थ जे तुमच्या मुलांसाठी खूपच अनहेल्दी आहेत

ब्रेकफास्ट. असं म्हणतात की संपूर्ण दिवसातला हा खूप महत्वाचा आहार असतो. का? कारण तुम्ही जवळजवळ १० तास काही खाल्लेलं नसतं, आणि तुमच्या शरीराला पोषणाची खरंच गरज असते. योग्य अन्न घेतल्याशिवाय दिवसाची सुरुवात करणं म्हणजे स्कूटरचा चोक बाहेर काढल्याशिवायच स्कूटर चालू करणं. अशाने स्कूटर चालू होते का? तर अजिबात नाही, बरोबर? पण आपल्याला मात्र दिवसाची सुरुवात आरोग्याला हानिकारक अशा ब्रेकफास्टने करायला आवडते. तळणीचे पदार्थ? वा! मस्त. गोड पदार्थ? आणखी छान. 

खरंतर, तुम्हाला राहवत नसेल तर तुम्हाला जे आवडतं ते खा. पण फक्त एवढं करा की ते दिवसाच्या इतर वेळी खा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मुलांच्या हाताला हे पदार्थ लागणार नाहीत याची काळजी घ्या. त्यांच्या वयात त्यांनी योग्य तेच पदार्थ खाणं अत्यावश्यक आहे. पुढे दिलेली यादी ही ऋतू लाडगे यांच्या इंडियाटाईम्स मधील लेखातून निवडण्यात आली आहे. दिवसाच्या सुरुवातीला तुम्ही तुमच्या मुलांना कोणते पदार्थ खायला देऊ नये हे जाणून घेण्यासाठी ही यादी चांगली मार्गदर्शक ठरेल. 

१. वडापाव 

वडापाव म्हणजे प्रत्येक मुंबईकराचा जीवनाधारच जणू. खरंतर, तळलेला बटाटावडा जो बटाट्याने पुरेपूर भरलेला असतो तो पावासकट तुमच्या तोंडात आणि पोटात कोंबण्याहून जास्त हानिकारक दुसरं काहीच नाही. एका वडापावामध्ये २८६ इतक्या कॅलरीज असतात! 

त्याऐवजी: तुम्हाला खरंच पोटभर असं काही खायचं असेल तर तेलात थोड्याश्या परतून घेतलेल्या भाज्या होल-व्हीट ब्रेड सोबत खा. तळणीचं किंवा पिष्टमय असं काहीही खाऊ नका. 

२. मेदु वडा 

प्रामुख्याने दक्षिण भारतीय आहाराचा भाग असलेला मेदु वडा 'हेल्दी' मानला जातो कारण त्यामध्ये डाळींचा समावेश असतो. खरंतर, मेदु वडा हेल्दी नाहीये. उडीद डाळ ही पचायला जड असते आणि सकाळी दिवसाच्या सुरुवातीलाच तुमच्या शरीराला पचायला हलकं पण हेल्दी असं अन्न हवं असतं, कारण पूर्ण रात्रभर शरीराला उपास घडलेला असतो. शिवाय, मेदु वडा हा तळलेला असल्याने आरोग्याला आणखीनच हानिकारक असतो. (चटणी आणि सांबारच्या कॅलरीज वगळता) एक प्लेट मेदु वड्यामध्ये ३३४ कॅलरीज असतात. तुमची मेदु वड्याची तलफ शांत करण्यासाठी मेदु वडा दुपारच्या नाश्त्यात खा पण सकाळी ब्रेकफास्टला खाऊ नका. 

त्याऐवजी: मेदु वड्याऐवजी इडली खा कारण इडल्या वाफवलेल्या आणि जास्त हेल्दी असतात आणि तळलेल्या नसतात. आणि इडल्या सांबाराबरोबर खा म्हणजे सांबारातून भाज्याही तुमच्या पोटात जातील! 

३. साबुदाणा वडा 

भारतीयांचा विशेषतः 'उपासा' च्या दिवसांत आवडता असलेला हा पदार्थ ब्रेकफास्ट मध्ये खाल्ल्यास त्याने तुमच्या शरीराला फायद्यापेक्षा अपायच जास्त होतो. पुरातन काळात उपासाची प्रथा सुरु केली गेली कारण त्याद्वारे जे काही राजसिक आणि तामसिक (म्हणजेच आरोग्याला हानिकारक) अन्न खाल्लं गेलं असेल त्यापासून शरीराला मुक्ती मिळावी आणि शरीर आतून शुद्ध व्हावं. मुळात उपास म्हणजे शरीराचं निर्विषीकरण (डिटॉक्स) करण्याचा दिवस. पण जेव्हा तुम्ही साबुदाणा वडा खाता तेव्हा तुम्ही शरीरात फॅट्सची भर टाकत असता कारण हे वडे डीप फ्राय केलेले असतात. तेल, बटाटे, साबुदाणा, कॉर्न-स्टार्च आणि प्रिझर्व्हेटिव्ह आणि त्यासोबत खाण्याचे रंगपदार्थ घातलेलं केचप हे सगळं साबुदाणा वड्याला एक खूप अनहेल्दी अशी ब्रेकफास्ट डिश बनवून टाकतं. 

त्याऐवजी: तळलेल्या साबुदाणा वड्याऐवजी बेक केलेला साबुदाणा वडा निवडा कारण तो जास्त हेल्दी असतो. तसंच, केचप ऐवजी घरी बनवलेल्या कोथिंबीर आणि पुदिन्याच्या चटणी सोबत हा साबुदाणा वडा खा. 

४. पराठे 

पराठे हा उत्तर भारतीयांचा आवडता पदार्थ आहे पण भारताच्या इतर भागांतही तो ब्रेकफास्टचा पदार्थ म्हणून वेगाने लोकप्रिय होतो आहे. नुसता पराठा हा एक हेल्दी पदार्थ आहे कारण तो तळलेला नसतो आणि त्यात भाज्या आणि गहू यांचा समावेश होतो (पण हा पदार्थ, ग्लूटन-फ्री पदार्थ खाणाऱ्यांसाठी मात्र नाही). असं असलं तरी पराठ्यामध्ये जे भारंभार तूप वापरलं जातं आणि पराठा ज्यात बुडवून खातात ते लोणचं ह्या सर्वांमुळे पराठा खूपच जास्त अनहेल्दी बनतो. 

त्याऐवजी: गव्हाचं पीठ सोडून नाचणी, ज्वारी, बाजरी यासारख्या इतर धान्यांच्या पिठापासून पराठा बनवा (तुम्ही ह्या तिन्ही पिठांचं मिश्रणही वापरू शकता) आणि पराठ्यामध्ये सारण म्हणून फक्त बटाटा वापरू नका. भाज्यासुद्धा वापरून पाहा - पराठ्याच्या सारणात बटाट्याबरोबरच तुम्ही कांदा, ढोबळी मिरची, कुस्करलेले मटार, गाजर, पुदिन्याची पानं हे घालू शकता. त्यामुळे नुसतीच पराठ्याची चव वाढणार नाही तर तो जास्त हेल्दी सुद्धा बनेल. तसंच पराठा तळण्याऐवजी तव्यावर अगदी थोडं तेल घालून खरपूस भाजून घ्या. वाढताना लोणच्याऐवजी ताजं दही आणि चटणी सोबत वाढा. अरेच्चा! झाला की मग तुमचा हेल्दी ब्रेकफास्ट तयार!

५. टोस्ट-बटर 

झटपट तयार होणारी ब्रेकफास्ट डिश. ही ब्रेकफास्ट डिश खरंतर भारतीय नाहीये पण जगातल्या प्रत्येक भारतीयाला प्रिय आहे. असं असलं तरी टोस्ट-बटर मध्ये फार कमी किंवा अगदी शून्य पोषणमूल्य आहे. त्यामध्ये पांढरा पाव असतो जो गव्हावर प्रक्रिया करून बनवतात आणि बटर जे पॅकेज्ड असतं आणि ज्यामध्ये अतिरिक्त मीठ, खाद्यरंग आणि प्रिझर्व्हेटिव्हज असतात. 

त्याऐवजी: सँडविच खा कारण ते जास्त हेल्दी असतं. तो पांढरा पाव खिडकीतून बाहेर फेकून द्या. आणि ब्राऊन ब्रेड वर झडप घालण्याआधी तो हेल्दी असल्याची आणि नुसताच रंगाने ब्राऊन नसल्याची खात्री करून घ्या. कांदा, काकडी, बीटरूट, टोमॅटो, लेट्युस ह्या भाज्या, चटणी आणि मल्टिग्रेन ब्रेडचा वापर करून हेल्दी सँडविच बनवा किंवा मग थोड्या कल्पक व्हा आणि न ठरवता कुठल्याही भाज्या निवडा. सँडविचवर वरून केचप न घालता "साल्सा" सॉस घातलंत तर त्याला एक वेगळीच छान चव येईल. 

६. पुरी भाजी 

पूर्ण भारतभर लोकप्रिय असलेल्या ह्या पदार्थाचे काही प्रकार आहेत. काही ठिकाणी “भाजी” म्हणजे बटाट्याचे तुकडे उकडून तेलात परतलेले असतात तर इतर ठिकाणी मिश्र भाज्यांची "कुर्मा" भाजी असते. प्रकार कोणताही असला तरी ही डिश खूपच जास्त अनहेल्दी आहे. पुऱ्या तळलेल्या असतात आणि सकाळी सकाळी खायला म्हणून बटाटा ही काही आदर्श भाजी नाही. 

त्याऐवजी: पुरी भाजी ऐवजी चपाती-भाजी खा, जी पुष्कळ हेल्दी असते. किंवा तुम्ही पाव भाजीची भाजी (पाव आणि बटर वगळून फक्त भाजी) भाकरीसोबत खाऊ शकता. 

७. मिसळ पाव 

प्रामुख्याने महाराष्ट्रीय असलेला हा पदार्थ म्हणजे कडधान्यांवर ओतलेली तेलाची मसालेदार तर्री आणि ती पावासोबत खातात. दिवसाच्या सुरुवातीला सकाळी खाण्यासाठी म्हणून मिसळ पाव हा अत्यंत अनहेल्दी असा पदार्थ आहे कारण त्यामध्ये नुसतंच भरभरून तेल नसतं तर खूप मसाले आणि मिरची देखील असते जी सकाळच्या वेळी तुमच्या शरीरासाठी ठीक नाही. त्यात आणखी पावाची भर आणि मग हा पदार्थ म्हणजे तुमच्यासाठी एक खूपच भयानकरीत्या अनहेल्दी डिश बनून जाते. 

त्याऐवजी: भाज्या चिरून घालून मोड आलेल्या कडधान्यांचं सॅलड बनवा आणि ते खा. सॅलडवर वरून थोडं ऑलिव्ह ऑईल ओता, थोडंसं लिंबू पिळा, मीठ आणि मिरपूड घाला आणि तुमचं हेल्दी सॅलड तयार!  

८. मॅगी 

माधुरी दीक्षित-नेने तुम्हाला जाहिरातीतून काहीही सांगत असली तरी आरोग्यदायी व्यायाम केल्यानंतर मॅगी खाल्ल्यामुळे (मग ती ओट्सची मॅगी असेल तरीही) तुमच्या व्यायामाचा प्रभाव नष्ट होतो. मॅगी हे परफेक्ट कम्फर्ट फूड असलं तरी खूपच जास्त प्रमाणात अनहेल्दी देखील आहे. तळलेले नूडल्स, पॅकेज्ड मसाला, वरून अतिरिक्त घातलेले फ्लेवर्स...मॅगी मध्ये नॅचरल किंवा हेल्दी असं काहीच नाहीये. 

त्याऐवजी: ओट्स वापरून एक मस्त धमाकेदार डिश बनवा. पाण्यात ओट्स उकळून घ्या, त्यात मीठ, मिरची पूड, हळद, चाट मसाला इत्यादी स्वादानुसार घाला, कांदा, गाजर, मटार, ढोबळी मिरची सारख्या ताज्या भाज्या चिरून घाला, हे मिश्रण चांगलं उकळवा आणि मग तुमचा मॅगी इतकाच चविष्ट पण मॅगीहून खूप जास्त हेल्दी असा ब्रेकफास्ट तयार! 

९. जिलबी फाफडा 

हा पदार्थ प्रामुख्याने गुजराती आहे आणि सकाळी उठल्यावर जिलबी फाफडा खाणं किती चुकीचं आहे हे सांगायला शब्द अपुरे पडतात. साखरेच्या पाकात बुडालेल्या जिलब्या तुमच्या जिभेचे चोचले पुरवत असतील पण त्या तुमच्या हेल्थची पार वाट देखील लावतात. फाफडा म्हणजे बेसनाचे डीप फ्राय केलेले आणि मसाले घातलेले पापड असतात आणि त्यांत अगदीच काहीच पोषणमूल्य नसतं. 

त्याच्याएवजी: खजूर आणि पुदिन्याच्या चटणीसोबत वाफवलेला पांढरा ढोकळा खा. ढोकळा हा तांदूळ आणि उडीद डाळीचं मिश्रण वाफवून बनवला जातो. तो बनवताना त्यात खाण्याचा सोडा घालू नका आणि बनल्यावर वरून तेलाची फोडणी घालू नका. त्याऐवजी, वाफवण्याआधी त्यावर वरून तीळ पसरून घाला आणि सर्व्ह करण्याअगोदर वरून कोथिंबीर बारीक चिरून घाला. खजुराची आणि पुदिन्याची चटणी सुद्धा हेल्दी असते! 

१०. कांदेपोह्यांसोबत जिलबी 

कांदेपोहे हा भारतातील सर्वाधिक हेल्दी पदार्थांपैकी एक आहे पण तो जिलबीसोबत खाल्ल्याने त्याचे आरोग्यविषयक फायदे नष्टच होतात. भारताच्या मध्यवर्ती प्रदेशांमध्ये जास्त लोकप्रिय असलेला हा पदार्थ स्थानिक लोकांच्या आवडीचा असतो. काहीवेळा, पोह्यांवर वरून भरपूर शेव पसरली जाते ज्यामुळे सुद्धा त्याचे आरोग्यविषयक फायदे नष्ट होतात. 

त्याऐवजी: कांदेपोहे नुसतेच खा आणि गोडाचं काही खायचं असेल तर मिल्कशेक निवडा किंवा मग कुठलंही फळ त्यावर थोडा मध ओतून खा. तसंच, कांदेपोह्यांमध्ये बटाटे घालू नका. त्यात कांदा आणि मटार घाला, वरून शेव घालू नका. त्याऐवजी किसलेलं ओलं खोबरं वरून घाला आणि थोडं लिंबू पिळा. 

११. कचोरी 

भारतीयांमध्ये लोकप्रिय असा आणखी एक पदार्थ म्हणजे कचोरी जो अष्टपैलू आहे कारण तो ब्रेकफास्ट म्हणून खाल्ला जातो आणि जेवणात "तोंडी लावणं" म्हणून देखील खाल्ला जातो. असं असलं तरी सकाळी सकाळी सर्वप्रथम कचोरी खाणं खूपच अनहेल्दी ठरू शकतं. कचोरीमध्ये मटार, शेव, मसाले आणि बेसन ह्यांचं मिश्रण, मूग डाळ, सुकवलेले वाटाणे, सुकामेवा अशा भरपूर गोष्टी सारण म्हणून भरल्या जातात आणि मग ह्या कचोऱ्या डीप फ्राय करतात. आकारानुसार आणि भरलेल्या सारणानुसार प्रत्येक कचोरीमध्ये १९० कॅलरीज असू शकतात. 

त्याऐवजी: लापशी सारखा जास्त हेल्दी असा आहार निवडा. सुकवलेल्या आणि तुकडा स्वरूपात असलेल्या गव्हाचे म्हणजेच लापशीचे खूप सारे आरोग्यविषयक फायदे आहेत. लापशीची खिचडी बनवा किंवा उपमा बनवा. त्यात भरपूर भाज्या घाला. किंवा लापशी उकडून घेऊन (आणि घट्टसर ठेवून) त्यात चिरलेल्या भाज्या आणि मसाले घालून ग्रिल केलेल्या टिक्क्या बनवू शकता. तवा तापवून घ्या, थोडंसं तेल ओता, लापशीच्या मिश्रणाच्या टिक्क्या बनवून घ्या आणि त्या तव्यावर खरपूस भाजून घ्या. ह्या टिक्क्या फारच चविष्ट लागतात. पण जर तुम्हाला गोडाचं खायचं असेल तर थोड्या तुपामध्ये लापशी खमंग भाजून घ्या, त्यात गूळ आणि पाणी घालून ते मिश्रण घट्टसर होईपर्यंत शिजू द्या. महाराष्ट्रात खूप लोकप्रिय असलेली ही "लापशी" अत्यंत हेल्दी असा अल्पोपाहार आहे. 

१२. सीरिअल 

सीरिअलच्या त्या जाहिराती तुम्हाला वजन घटवण्याबद्दल काहीही सांगत असल्या, तरी तुमचं पॅकेज्ड सीरिअल हे खूपच जास्त अनहेल्दी आहे. प्री-पॅकेज्ड आणि खाण्यासाठी तयार असलेले सीरिअल्स साखरेने भरलेले, मिठाचं खूप जास्त प्रमाण असलेले असतात आणि ते ज्या मूळ धान्यांपासून बनवले जातात त्या धान्याचं खूप कमी पोषणमूल्य सीरिअल्स मध्ये उतरतं किंवा जवळजवळ नसतंच. ही सीरिअल्स म्हणजे फक्त, फ्रुक्टोजचं भरमसाठ प्रमाण असलेला पाक आणि सगळी पोषणमूल्य नष्ट होईपर्यंत प्रक्रिया केलेला मका ह्यांचं मिश्रण असतं. सीरिअल खाल्ल्याने तुमचा फायदा होण्याऐवजी हानीच जास्त होते. 

त्याऐवजी: मका उकडून घ्या आणि तो कुकरमधून काढून ताजा ताजाच खा. त्याची चव वाढवण्यासाठी तुम्ही त्यावर थोडं ऑलिव्ह ऑइल आणि मीठ घालू शकता. आणखी एक पर्याय म्हणजे तुमच्या मक्याच्या दाण्यांमध्ये तुम्ही थोडं पनीर देखील घालू शकता, त्याने एक वेगळीच चव येईल. किंवा तुम्ही एखादं झटपट तयार होणारं सॅलड सुद्धा बनवू शकता! जर तुमच्याकडे वेळ नसेल, तर फक्त थोडा सुकामेवा खा. हे सगळे पर्याय जास्त हेल्दी आहेत, पोटभरीचे आहेत आणि त्यामुळे तुम्हाला लगेचच परत भूक लागणार नाही. 

१३. बिस्किटं 

चहात बुडवून बिस्किटं खाणं. सकाळी दिवसाची सुरुवात करायची परफेक्ट भारतीय पद्धत. पण तुम्ही जी बिस्किटं खाता ती म्हणजे प्रक्रिया केलेलं पीठ आणि स्वादासाठी घातलेले कृत्रिम घटकपदार्थ असतात. बिस्किटांमध्ये अजिबात पोषणमूल्य नसतं आणि जेव्हा तुम्ही ती खाता तेव्हा तुम्ही तुमचं पोट फक्त पिठाच्या वड्यांनी भरत असता. 

त्याऐवजी: चहाबरोबर खाण्यासाठी हेल्दी खाकरा निवडा. किंवा घरीच थोडा खाकरा बनवून घ्या. जर तुम्ही बाहेरून खाकरा विकत घेत असाल तर तो तळलेला नसून भाजलेला किंवा बेक केलेला असल्याची खात्री करून घ्या. तसंच साधा जिऱ्याचा खाकरा निवडा ज्यामध्ये खूप सारे मसाले नसतात आणि जो जास्त हेल्दी असतो. तुम्ही 'मेथी' खाकरा सुद्धा निवडू शकता जेणेकरून त्या पालेभाजीतून मिळणारं पोषण तुम्हाला त्या खाकऱ्यातून मिळेल!  

१४. सामोसे 

प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही खाता तेव्हा तुम्हाला परमानंदाची अनुभूती देणारे ते खमंग तळलेले त्रिकोण? खरंतर ते तुम्हाला आनंद देण्याहून खूप अधिक काही करत असतात. तुमच्या कमरेवर साठलेल्या अतिरिक्त चरबीचं आणि तुमच्या दुहेरी हनुवटीमागचं कारण हे "त्रिकोण" असू शकतात. सकाळी सकाळी, दिवसाच्या सुरुवातीला सामोसे खाणं हे नुसतंच खूप जास्त अनहेल्दी आहे असं नाही तर हे सामोसे पचायला खूप कठीण असतात कारण ते खूप जड असा अन्नपदार्थ आहेत. 

त्याऐवजी: सामोसे खाण्याऐवजी हेल्दी 'रोल' खा. तुमच्या रोलचं आवरण मैद्यापासून न बनवता होल-व्हीट च्या पिठापासून बनवा. सारणामध्ये तेलावर हलकेच परतून घेतलेला कोबी, किसलेलं गाजर, कांद्याचे काप आणि तुमच्या आवडीच्या इतर भाज्या घाला. त्यावर वरून 'सालसा' सॉस आणि पुदिना-कोथिंबीरची पेस्ट घाला. तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही थोडी लसणीची पेस्टही घालू शकता. नॉनस्टिक तव्यावर तेल न घालता हा रोल भाजून घ्या आणि मग गरमागरम खा! 

१५. पॅकेज्ड ज्यूस 

तुमची 'रिअल' फ्रूट ज्यूसेस खरंच 'रिअल' नसतात. फळांचा रस काढून घेतल्यावर आणि त्यावर प्रक्रिया केल्यावर त्या ज्यूस मधली पोषणमूल्यं नष्ट होतात. मग ते नुसतंच रंगीत पाणी असतं. तसंच ह्या ज्यूसची जी चव असते ती त्या फळाची मूळ चव नसते कारण रस काढून घेण्याच्या आणि शुद्धीकरणाच्या प्रक्रियेमध्ये ती चव जवळजवळ नष्ट होते. मग हे ज्यूस म्हणजे वरून अतिरिक्त घातलेले फ्लेवर्स असतात. खऱ्या फळांमध्ये असणारं फायबर किंवा पोषकद्रव्यं ह्या ज्यूस मध्ये नसतात. ही ज्यूसेस पिणं म्हणजे ग्लास भरून साखरेचा पाक पिण्यासारखंच आहे. 

त्याऐवजी: फळांचा रस घरीच बनवा. किंवा खाली जाऊन जवळच्या विक्रेत्याकडून नारळपाणी घेऊन या. नारळपाणी नुसतंच हेल्दी नाही तर रुचकर आणि ताजंतवानं करणारं देखील असतं! 

Translated by Anyokti Wadekar

loader