तुम्ही एक आदर्श पत्नी असल्याची १४ लक्षणं

आदर्श पत्नी? अशी काही गोष्ट अस्तित्वात आहे का? हो, आहे. तुम्ही तुमच्या पतीसाठी एक आदर्श, परिपूर्ण  पत्नी असल्याची ही १४ लक्षणं आहेत.

इथून निवडले आहे: फॅमिलीशेअर

१. तुमच्या पतीच्या यशानं तुम्हाला खूप आनंद होतो

त्याला नोकरीत बढती मिळाली, त्याचं ट्रायॅथलाॅनचं प्रशिक्षण पूर्ण झालं किंवा तो झिंग्याची डिश बनवायला शिकला की तुम्हाला आनंद होतो. तो जेव्हा एखादं ध्येय साध्य करण्याबाबत उत्साही असतो तेव्हा तुम्हालाही आनंद होतो. तुमच्या स्वतःच्या यशाइतकाच जेव्हा तुम्हाला तुमच्या पतीच्या यशानेही अत्यानंद होतो तेव्हा तुम्ही एक आदर्श पत्नी असता.

२. तुम्ही त्याचा आवडता चित्रपट पाहता (तो चित्रपट कितीही खुळचट असला तरी)

तुम्ही तो चित्रपट शेकडो वेळा पाहिलेला असतो, आणि तरीही तुम्हाला तो मजेदार वाटत नाही, पण तरीही तुम्ही तो पाहता कारण तुमच्या पतीला तो आवडतो. त्याला बरं वाटावं म्हणून त्या चित्रपटादरम्यान तुम्ही योग्य त्या वेळी हसतही असाल तर तुमचं आणखीनच कौतुक केलं पाहिजे.

३. तुम्ही इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा पतीला अधिक महत्व देता

तुमच्यासाठी तो नेहमी पहिल्या क्रमांकावर असतो.

तुमचं करिअर आणि तुमचे छंद हे तुमच्या पतीपेक्षा जास्त महत्वाचे बनणार नाहीत याची काळजी तुम्ही घेता. तुमच्या पतीपेक्षा अधिक प्राधान्य तुम्ही कुणालाही देत नाही, तुमच्या मित्रमैत्रिणी, फॅमिली किंवा मुलांनाही नाही.

४. तुम्हाला एकट्यानेच काही गोष्टी करायला आवडतं

तुम्ही तुमच्या पतीला सर्वाधिक महत्व देत असलात तरी याचा अर्थ असा नाही की तुम्ही फक्त पतीलाच सर्वस्व मानलं पाहिजे. तुमची पत्नी ह्या नात्याव्यतिरिक्त इतरही अनेक रूपं असतात. तुम्हाला जरी पतीसोबत असावंसं वाटत असलं तरी तुम्ही एकट्याने सुद्धा काही गोष्टी समाधानपूर्वक करू शकता कारण तुम्ही एक परिपूर्ण, आत्मनिर्भर व्यक्ती आहात.

५. तुम्ही त्याचा आवडता पदार्थ बनवता

तुम्हाला तो पदार्थ आवडत नसला आणि बनवायलाही अगदीच येत नसला तरी, तुम्हाला त्याच्या आवडीचं भान आहे, हे त्याला दाखवून देण्यासाठी तुम्ही तो पदार्थ बनवता कारण तुम्हाला त्याच्यासाठी छान असं काहीतरी करायचं असतं.

६. तुम्ही त्याला हसवता

कुठलं खट्याळ वाक्य बोलून त्याला खदखदा हसवायचं किंवा नुसत्या एका नजरेच्या कटाक्षात त्याच्या चेहऱ्यावर मोठ्ठं हास्य कसं आणायचं हे तुम्हाला माहीत असेल तर तम्ही जगातल्या सर्वोत्कृष्ट पत्नी आहात.

७. तुम्ही त्याची गुपितं उघड करत नाही

एखादी गोष्ट तुम्ही दुसऱ्या कुणाकडे उघड केल्यामुळे ते तुमच्या पतीसाठी गैरसोयीचं ठरणार असेल तर तुम्ही तसं करत नाही. तुम्ही तुमच्या आईला देखील त्याबद्दल काही सांगत नाही किंवा वाणसामानाच्या दुकानात तुम्हाला भेटलेल्या एखाद्या किशोरवयीन मुलासमोर देखील ते बोलत नाही. तुमचा पती त्याच्या खाजगी गोष्टी तुम्हाला सांगतो कारण त्याला माहितीय की तो तुमच्यावर भरवसा ठेवू शकतो.

८. तुम्हाला त्याचे मित्रमैत्रिणी आवडतात (आणि त्याच्या मित्रमैत्रिणींनाही तुम्ही आवडता)

तुम्हाला हे उमगतं की तुम्ही येण्याच्या अगोदरपासून त्याचे मित्रमैत्रिणी त्याच्यासोबत आहेत, आणि त्यामुळे ते त्याच्या अस्तित्वाचा एक बराच महत्वाचा भाग आहेत. तुम्हाला ही माणसं तुमच्या आयुष्यात सुद्धा आल्याबद्दल कृतज्ञता वाटते आणि तुमच्या नवऱ्याला त्यांच्यासोबत काही वेळ घालवायचा असल्यास त्याला तुमची हरकत नसते.

तसंच, जर तुमच्या नवऱ्याच्या मित्रमैत्रिणींना तुम्ही आवडत असाल तर तुम्ही एक आदर्श पत्नी असल्याचं ते पक्कं लक्षण आहे.

९. तुम्ही त्याला तुमची मदत करू देता

तुम्ही १० वर्षांच्या असताना कुणाचीही मदत न घेता ट्रीहाऊस बनवलं असेलही, पण तुम्ही आणलेल्या ‘आयकिया’ ब्रँडच्या बुक-शेल्फची जोडणी मात्र तुम्ही तुमच्या पतीलाच करू देता. आपली कुणाला तरी गरज आहे अशा भावनेची पतींना गरज असते आणि एक आदर्श पत्नी आपल्या पतीला आपली मदत करू देते.

१०. तुम्ही त्याला चिठ्ठ्या लिहिता

त्याच्या जेवणाच्या डब्याच्या थैलीवर एखादं रेखाटलेलं छोटंसं चित्र लावून, आरशावर लिपस्टिकने एखादा मेसेज लिहून किंवा त्याच्या खिशात त्याला लिहिलेलं पत्र ठेवून त्याच्यावर किती प्रेम आहे हे एक आदर्श पत्नी नेहमीच त्याला सांगत राहते. तुम्ही आणखी काही न करता रोज त्याला "आय लव यू" असा एक उत्स्फूर्त मेसेज पाठवलात तरी सुद्धा तुम्ही नक्की एक आदर्श पत्नी आहात हे सिद्ध होऊ शकतं.

११. तुम्ही त्याला डिवचत राहत नाही

त्याने एका उत्तम व्यक्ती बनावं असं तुम्हाला नक्कीच वाटतं, आणि कधीकधी त्याने त्याचे घाणेरडे बूट नीट जागेवर ठेवावेत असं तुम्हाला खूप वाटतं. पण तुम्ही हे जाणता की तुम्ही त्याची आई नाही आहात. तर एकमेकांमध्ये सुधार घडवून आणण्यात एकमेकांची मदत करणारे तुम्ही जोडीदार आहात. त्याच्या चुकांबद्दल किंवा त्याने ज्या गोष्टी करायला हव्यात त्यांबद्दल त्याला सतत डिवचत राहिल्याने तो आदर्श पती बनणार नाही किंवा तुम्ही आदर्श पत्नी बनणार नाही हे तुम्हाला माहिती आहे.

१२. तुम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करता

तुमच्या मनात विचारांची कितीही रेलचेल असली तरी तुम्ही देवाकडे तुमच्या पतीसाठी प्रार्थना जरूर करता. देवाकडे तुम्ही विशेषकरून ती वरदानं मागता जी तुमच्या पतीला हवी आहेत. ह्या निःस्वार्थ कृतीमुळे तुमचं नातं दररोज बळकट होत जातं.

१३. तुम्ही त्याच्यासोबत घालवायच्या वेळेची कदर करता

जेव्हा तुम्ही एकत्र असता तेव्हा तुम्ही फेसबुक चेक करत नसता किंवा तुमच्या ब्रेकफास्ट डिशच्या फोटोसाठी परफेक्ट फिल्टर शोधत नसता. तुम्ही एकमेकांसोबत घालवलेला वेळ मनाशी जपून ठेवता आणि लक्ष विचलित करणाऱ्या अनावश्यक गोष्टींपासून लांब राहण्याचा शक्य तितका प्रयत्न करता.

१४. काहीही झालं तरी तुम्ही नातं टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करता

तुम्हा दोघांकडूनही चुका होतात. फार मोठ्या चुका सुद्धा होतात. प्रेम आटू सुद्धा शकतं. पण एक आदर्श पत्नी ह्या लहान किंवा मोठ्या समस्यांतून मार्ग काढत नातं टिकवून ठेवते, बहरवते.

Translated by Anyokti Wadekar

loader